कौतुकास्पद : मोटरस्पोर्ट्स वर्ल्डकप जिंकणारी देशातील पहिलीच महिला

    दिनांक  13-Aug-2019 17:22:55


 


मुंबई : बंगळुरूच्या ऐश्वर्या पिसेने 'एफआयएम' वर्ल्ड कपमधील महिलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. मोटरस्पोर्ट्समध्ये वर्ल्डकप मिळवणारी ऐश्वर्या पहिलीच भारतीय ठरली. मोटरस्पोर्ट्ससारख्या खेळात आपल्या देशातील खेळाडू कमीच दिसतात. या क्रीडा प्रकारात भारताच्या २३ वर्षीय महिला खेळाडूने वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला आहे.

 

ऐश्वर्याने दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत बाजी मारली होती, तर पोर्तुगालमध्ये झालेल्या फेरीत तिसऱ्या स्थानी राहिली होती. तसेच, ती स्पेनमधील फेरीत पाचव्या, तर हंगेरीत चौथ्या क्रमांकावर राहिली. तिच्या खात्यात एकूण ६५ गुण झाले आणि तिचे जेतेपद निश्चित झाले. पोर्तुगालची रिटा ६१ गुणांसह उपविजेती ठरली. ज्युनियर गटात ऐश्वर्या ४६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली.

 

"मला शब्दच सुचत नाही. गेल्या वर्षी स्पेनमध्ये माझा अपघात झाला होता. त्या वेळी दुखापतीमुळे कारकीर्दच संपुष्टात येण्याची भीती होती. मात्र, त्यातून मी बाहेर आले आणि आता जेतेपदाला गवसणी घातली. तो काळ खूप कठीण होता. मात्र, मी जिद्द सोडली नाही आणि पुन्हा बाइकवर स्वार झाले. वर्ल्डकप जिंकणे हे खूप मोठी गोष्ट आहे," अशा भावना तिने व्यक्त केल्या.