'पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करणार': पालकमंत्री दीपक केसरकर

12 Aug 2019 14:11:10

 

 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. पालकमंत्री केसरकर यांनी कुडाळ,  वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

 

पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. घरात धान्य नाही, साहित्य नाही, अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, "पूरग्रस्तांना शासनाकडून ग्रामीण भागासाठी 10 हजार रुपये आणि शहरी भागासाठी 15 हजार रुपये तातडीची मदत दिली जाणार आहे. तसेच स्थलांतरितांना प्रतिदिनी प्रति व्यक्ती प्रौढांसाठी 60 रुपये आणि मुलांसाठी 45 रुपये दैनिक भत्ता दिला जाणार आहे. ही रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर मंगळवारपर्यंत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत. पडलेल्या घरांचेही पंचनामे सुरू आहेत. तसेच मातीच्या घरांमध्ये पाणी शिरले असेल तर त्याचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

 
 

मातीची घरे पाणी शिरल्याने लगेच कोसळत नाहीत. पण, नंतर ती कोसळतात. त्यावेळी पाऊस नसेल तर त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा घरांचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून नंतर जरी घर कोसळले तर त्याची नुकसानभरपाई देण्याविषयी कार्यवाही करता येईल, शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे करून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी करता येईल, याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.

 
 

दोडामार्ग तहसील कार्यालयातील समारंभामध्ये पालकमंत्री केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील पूरपरिस्थितीवेळी लोकांना वाचवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. यावेळी खासदार विनायक राऊत, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

                  facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0