प्रारंभ नव्या इंटरनेट पर्वाचा

    दिनांक  12-Aug-2019 21:20:11'कर लो दुनिया मुठ्ठी में' म्हणत टेलिकॉम क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविणार्‍या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (आरआयएल) 'जिओ'ने सोमवारी इंटरनेटच्या नव्या पर्वाचा प्रारंभ केला. 'रिलायन्स जिओ फायबर', 'जिओ फोन-३', 'जिओ सेट टॉप बॉक्स' आणि 'जिओ गिगा टीव्ही' यासोबतच अन्य महत्त्वाच्या सेवांची घोषणा करत इंटरनेटचा वापर आता प्रकाशाइतक्या वेगाने वाढणार असल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. टेलिकॉम क्षेत्रात नवक्रांतीच्या दृष्टीने पाऊल टाकण्याची रिलायन्स समूहाची ही काही पहिली वेळ नाही. भारतात १९९५-९६ सालादरम्यान मोबाईल सेवेला सुरुवात झाली. सुरुवातीला जवळपास प्रतिकॉलसाठी २० रुपयांचा दर मोजावा लागत असल्याने ही सेवा केवळ बड्या उद्योगपतींचीच मानली जात असे. कालांतराने हे दर कमी झाले तरी मोबाईल वापरकर्त्यांची संख्या भारतात जेमतेमच होती. जवळपास २००२ साली रिलायन्सनेच टेलिकॉम क्षेत्रात पहिली नवक्रांती घडवली. ९९९ रुपयांत 'अनलिमिटेड इनकमिंग'ची योजना आणत रिलायन्सने अनेकांच्या हातावर मोबाईल ठेवले. टेलिकॉम क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी इतर कंपन्यांनीही ही योजना स्वीकारण्यास भाग पाडले. कालांतराने मोबाईलचेही स्वरूप बदलत गेले. त्यात कॅमेरे आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टी जोडल्या गेल्यानंतर आजघडीला अनेकांच्या हातात स्मार्टफोन उपलब्ध आहेत. २०१७ साली जिओची 'फोर-जी' सेवा मोफत देत रिलायन्स जिओने इंटरनेट क्षेत्राचा बाजारच आपल्या नावावर केला. सुरुवातीचे काही महिने जिओला तोटा सहन करावा लागला. मात्र, जिओची नवक्रांती यशस्वी ठरली असून सध्या कंपनीकडे ३१ कोटींच्या घरात ग्राहक आहेत. कंपनीने दोन वर्षांत ११ हजार, ६७९ कोटींचा नफा कमावला असून मुकेश अंबानी यांनी सोमवारी २४ कोटी नवे इंटरनेट वापरकर्ते आपण निर्माण केल्याचा दावा केला. सध्याच्या घडीला भारतात जवळपास ६८ कोटी इंटरनेटचे वापरकर्ते आहेत. सध्या आपण २ ते ५० एमबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरत आहोत. मात्र येत्या काळात 'जिओ फायबर'ची सुविधा १०० एमबीपीएस ते १ जीबीपीएस या वेगाने उपलब्ध होणार आहे. सध्या मिळणार्‍या इंटरनेटसेवेच्या जवळपास दुपटीपेक्षा अधिक वेगाने ही सेवा मिळणार असून हा इंटरनेटच्या नव्या पर्वाचा प्रारंभ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

'डीटूएच'ही मुठीत?

 

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी 'रिलायन्स जिओ फायबर', 'जिओ फोन-३', 'जिओ सेट टॉप बॉक्स' आणि 'जिओ गिगा टीव्ही' या अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली. 'फोर-जी' इंटरनेट सेवा माफक दरात उपलब्ध करत जिओने टेलिकॉम क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण केल्याचे सर्वश्रुत आहे. इंटरनेट सेवा पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक पटीने वेगवान उपलब्ध करून देण्याची घोषणा करताना कंपनीने 'जिओ सेट टॉप बॉक्स' आणि 'जिओ गिगा टीव्ही' या दोन प्रमुख घोषणाही केल्या. 'जिओ सेट टॉप बॉक्स' ग्राहकांना उपलब्ध करून देत टेलिकॉमप्रमाणेच 'डीटूएच' क्षेत्रातही आपण नव्याने गुंतवणूक करत असल्याची घोषणा कंपनीने केली. 'डीटूएच' क्षेत्रातील जिओची ही सेवा इंटरनेट क्षेत्रातील फोर-जी सेवेप्रमाणेच क्रांती करणारी ठरेल, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. एक वर्षासाठी 'जिओ फायबर'ची सेवा घेणार्‍या ग्राहकांना मोफत एलईडी टीव्ही आणि 'सेट टॉप बॉक्स' देण्यात येणार आहे. 'जिओ सेट टॉप बॉक्स'च्या सुविधेसह ग्राहकांना 'हॉटस्टार', 'नेटफ्लिक्स' आदी वेबसिरीजच्या सुविधाही घरबसल्या आपल्या टीव्हीवर सहज उपलब्ध होणार आहेत. यासोबतच जिओच्या ग्राहकांना नवे प्रदर्शित होणारे सिनेमेही घरबसल्या त्याच दिवशी पाहता येतील. 'जिओ फर्स्ट-डे-फर्स्ट-शो'ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. सध्या डीटूएच क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीला या सेवा ग्राहकांना अशा पद्धतीने उपलब्ध करून देता आलेल्या नाहीत. आगामी काळात त्यांना या सेवा उपलब्ध करून द्याव्या लागणार; अन्यथा बाजारात त्यांचे अस्तित्व कितपत टिकेल, हे येणारा काळच सांगेल. 'जिओ'च्या आधी एखाद्या 'डीटूएच' कंपनीने याबाबत मोठे निर्णय घेतल्यास त्या कंपनीचे ग्राहक वाढतील, ही नाण्याची दुसरी बाजू. मात्र आत्तापर्यंत जे शक्य झाले नाही, ते यानंतर तरी कसे शक्य होणार? हेही एक न उलगडलेले कोडेच. मोफत आणि माफकदरांत मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देत संबंधित क्षेत्रावरच संपूर्ण आपले वर्चस्व निर्माण करण्यात रिलायन्स उद्योग समूह आत्तापर्यंत आघाडीवर राहिला आहे. अनेक क्षेत्रांत रिलायन्सने अशाच प्रकारे क्रांती घडविली असून ग्राहकांनीही त्याला भरपूर प्रतिसाद दिला आहे. 'जिओ फायबर' सेवा उपलब्ध करून देताना रिलायन्स उद्योग समूहाने डीटूएच आणि सिनेसृष्टी या दोन्ही क्षेत्रांमध्ये खळबळ माजवली, हे निश्चित.

- रामचंद्र नाईक