चिंतातूर जंतू महाराष्ट्रातही

    दिनांक  12-Aug-2019 12:37:04   कवी गोविंदाग्रजांच्या कवितेमधील चिंतातुर जंतू म्हणतो, "तेज रवीचे फुकट सांडते, उजाड माळावर उघड्या, उधळणूक ती बघवत नाही," तेव्हा कवी म्हणतो, 'डोळे फोडूनी घेच गड्या', मग तो चिंतातुर जंतू म्हणतो, 'हिरवी पाने उगाच केली, झाडावर इतकी काही? मातीत त्याचे काय होतसे?' कवी म्हणतो, 'मातीस मिसळून जा पाही' शेवटी चिंतातुर जंतूबाबत कवी गोविंदाग्रज देवाला विनवतात की, देवा तो विश्वसंसार राहू द्या. राहिला तरी, या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ती द्या परी... पण हाय रे दैवा, गोविंदाग्रजांसारख्या महान कवींनी चिंतातुर जंतूंना म्हणजे सदैव फालतू चिंता करणाऱ्या वृत्तींना त्या चिंतेमधून मुक्ती द्यायची प्रार्थना केली तरीसुद्धा देवाने त्यांची इच्छा पूर्णच केली नाही. चिंतातुर जंतू आजही आहेत. त्यांच्या फालतू चिंता संपल्या नाहीत, कुठेही काहीही झाले तरी या चिंतातुर जंतूला महाराष्ट्राबाबत काही तरी अभद्र होणार, अशी चिंता व्याकुळ करते. मराठी माणसं देशोधडीला लागणार, महाराष्ट्राचे तुकडे तुकडे होणार, परप्रांतीय (म्हणजे महाराष्ट्र सोडून, भारताच्या इतर राज्यातील संवैधानिक भारतीय नागरिक) महाराष्ट्रावर कब्जा करतील वगैरे आशंकेने हा जंतू तडफडतो. काही नतद्रष्टांच्या मते त्यांचे हे नाटक आहे. कारण कोणे एकेकाळी परप्रांतीयांना क्रूरपणे मारहाण करणारे त्यांचे अनुयायी होते. पण कालांतराने काही महिन्यांपूर्वीच हे महाशय गंगाकिनारी मुलुख असणाऱ्यांच्या संमेलनाला गेले होते. (तेव्हा गंगाकिनारी मुलुख असणारे उत्तर भारतीय त्यांना परप्रांतीय वाटले नव्हते) असो, तर तेवढ्यापुरती, 'सारे भारतीय माझे बांधव आहेत', ही प्रतिज्ञा त्यांनी स्वीकारली. त्यामुळे कधी काय बोलतील (बोलतीलच, कारण ते काही करण्याची त्यांची इच्छा नसते. अगदी राजकीय पक्षाचे नेता असून आपल्या पक्षाने निवडणूक लढवावी, अशी देखील त्यांची इच्छा नसते.) तर महाराष्ट्रात गोंविदाग्रजांच्या कवितेतील अजरामर चिंतातुर जंतू पुन्हा नव्या जोमाने, नव्या रूपाने, नव्या रंगात आणि नव्या भूमिकेत पुन्हा अवतरला आहे. देशहितासाठी काश्मीरचे विभाजन आवश्यकच होते. पण या चिंतातुरला चिंता पडली की महाराष्ट्राचे तुकडे पडतील. आता काय म्हणावे? कारण चिंता करून वाट्टेल ती भयस्वप्ने पाहणाऱ्या चिंतातुरांची चिंता दूर कशी करावी?

 

गोट्या खेळायला भिडू हवा...

 

'आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून,' ही म्हण तशी बोलीभाषेतली. एखाद्याच्या नाकाला मिरच्या झोंबावी इतकी तिखट म्हण आहे. याचे प्रत्यंतर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुरेपूर येत आहे. यामध्ये आपले धाकटे राजकुमार आघाडीवर आहेत. याचाही आनंदच आहे म्हणा. कारण कुणी आघाडी करेल का आघाडी, कच्चा भिडू म्हणून तरी घ्या रे.. असं विनवूनही कुणीही आघाडी केली नाही. अगदी बारा वाजलेल्या घड्याळकाकांनीही. भरवशाच्या म्हशीला अक्षरशः टोणगा मिळाला. त्यामुळे आपलं काय चाललंय हे न पाहता दुसरा, त्यातही भाजप काय करतोय, हे पाहून आपला दिनक्रम ठरवण्यात तरी सध्या धाकटे राजकुमार आघाडीवर आहेत. कुठे नसलो तरी इथे आघाडीवर आहोत, हे पाहून त्यांचे त्यांनाच मनसे समाधान वाटते, यात शंकाच नाही. पूरपरिस्थितीनंतर स्वतः लोकांकडे कशी मते मागणार, याबाबत शून्य शून्य नियोजन असताना, धाकट्या राजकुमारांना प्रश्न पडला आहे की, भाजपवाले कोणत्या तोंडाने लोकांकडे मत मागतील? आता भाजपवाले बघून घेतील कोणत्या तोंडाने मते मागायची ते. पण नाही, धाकट्या राजकुमारांना हा प्रश्न सध्या छळतोय. किती ती भाजपची काळजी, असो. ते असेही म्हणाले की, "भाजप युतीने २२० जागा मिळवल्या तर आम्ही काय गोट्या खेळायच्या का?" यावर काय म्हणावे? तुम्ही काहीही खेळा. मराठी माणूस-मराठी भाषा वगैरे वगैरेची फोडणी देऊन स्थानिक मराठी माणसाला खळ्ळ्खट्ट्याक् फट्याक्चे खेळ शिकवायचा खेळ तुम्ही मागे केला होतात. पण टोलचा खेळ करताना तो खेळ अंगाशी आला. त्यामुळे तो खेळ खेळण्यात मजाच नाही. तुम्ही, मीच एकला राजाचा खेळ करण्यात नेहमीच गुंग असता म्हणे. पण तो खेळ खेळण्यातही आता गंमत उरली नाही. कारण तुम्ही खेळ खेळला तरी आता खेळात सामील व्हायला प्रजा तर पाहिजे ना? नगरसेवक, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते वगैरे वगैरे तुम्हाला मनसे टाटा बाय बाय करून केव्हाच दूर गेले. त्यामुळे तुम्ही कोणता खेळ खेळणार? लावा रे तो व्हिडिओ खेळा चाही निवडणुकीनंतर खेळ झाला. आता तुम्ही कोणता खेळ खेळावा, हे काय सांगायचे? मोठे राजकुमार म्हणजे दिल्लीचे सोनियांचे राहुल, मधले राजकुमार म्हणजे वंबआचे प्रकाश आंबेडकर सध्या काय करताहेत ते पाहा. कारण तुम्हाला लाख गोट्या खेळायची इच्छा असेल पण भिडू तर पाहिजेच ना?