मनचक्षूंच्या चष्म्यातून...

    दिनांक  12-Aug-2019 21:46:27
ऐहिक जगात जीवन जगताना आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी असतात. वर्षानुवर्षे त्या जशा या जगात स्थिर असतात, तशाच त्या नव्या नवलाईने घडतही असतात. या नव्या-जुन्या गोष्टींप्रमाणेच अनेक घटना-प्रसंगही असतात. या गोष्टीत शहरं व शहरातील राहणीमान असतं. या गोष्टी गावाकडच्या नैसर्गिक जीवनाचा अशा रोजच्या जगण्याशी व माणसाच्या ‘असण्याशी’ जोडलेल्या असतात, त्या कधी श्रीमंती थाटाच्या, आर्थिक भरभराटीच्या असतात, कधी त्या झोपडपट्टीच्या स्वरूपात, गरिबीच्या अंधाराच्या असतात, कधी बजबजाटाच्या असतात, तर त्यात कधी स्मशान शांतता असते.

 

आपण एक सर्वसामान्य माणूस म्हणून काय करत असतो, तर अवतीभोवती या आयुष्याला, आपल्या वैयक्तिक जगण्याचा एक महत्त्वाचा घटक बनवून टाकतो. अर्थात, हा आपल्या सवयींचा एक भाग असतो, पण तो आपल्या जगण्याला खूप प्रभावित करतो, हे खरे. हे बाह्यजग आपल्यासाठी खरंच अस्तित्वात असते का? आपल्या वैयक्तिक आयुष्यात बाह्यजगाचे खरे असे काय अस्तित्व आहे? कारण, हे जग आपण स्पष्टपणे ‘अनुभवत’ असतो म्हणून ते ‘अस्तित्वात’ आहे. हे बाह्यजग आपल्या अनुभव घेण्याच्या क्षमतेचे असते. पण, तेवढेच कारण आपल्या अनुभवाच्या डोळ्यांनी आपण जे पाहतो ते खरे आहे का? हा प्रश्न अनेक तत्त्वज्ञानी माणसांना या जगात वेळोवेळी पडला आहे.

 

आपल्याला सर्वसाधारण माणूस म्हणून जगाचा काय ‘अनुभव’ आहे, असे कुणी विचारले, तर आपल्या पंचेन्द्रियातून जो काही अनुभव मिळतो तो म्हणजे आपण जे पाहतो, ऐकतो, चव घेतो, स्पर्शाने समजतो व वासाने समजतो तेवढाच! पण, तो तसा मूळ ‘अनुभव’ आपला ‘अनुभव’ असतोच का? नक्कीच नाही. आपल्याकडे असलेल्या पंचेन्द्रियांच्या अनुभवाचे आपल्या मनात एका वेगळ्या, अनोख्या प्रक्रियेत रुपांतर होत असताना आपला ‘अनुभव’ आपण घडवतो. अर्थात, हा ‘अनुभव’ पूर्ण बाह्य नाही व आंतरिकही नाही. कुठेतरी मानवी अस्तित्वाचा तो अनुभव आहे.

 

मानला तर आपला अन्यथा आपला नाही. नात्यामध्ये प्रेम, दुरावा, असमाधान व संतुष्टता अशा अनेक गोष्टी आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारांनी आपल्याला दिसू लागतात. म्हणून कुठे द्वेष आणि हिंसेचा भडका दिसतो, तर कुठे शांतीची भक्ती दिसते. बाह्यजगात धर्म, जात, रंग, वर्ण का असतात? कारण, ते माणसाच्या मनात असतात. ते माणसाच्या आंतरिक जगात असतात म्हणून तर आपल्याला प्रथम अंतर्मनात पाहता येईल का, याचा विचार करणे आवश्यक आहे.

 

आज समाजमाध्यमे आहेत, ऑनलाईन गेम्स आहेत. वाण्याच्या दुकानात न जाता ऑनलाईन सगळ्या गोष्टी अगदी गरबसल्या सहज मागविता येतात. बोअर झाले तर मोबाईलवर हवा तेवढा ‘टाईम पास’ करता येतो. म्हणजेच आपण सगळे बाहेरून करणार. कधीतरी आपल्यातच आपण आपला वेळ घालवू शकतोका? स्वत:ला स्वत:ची ओळख करून घ्यायला शिकवू शकतो का? रस्त्यावर चालताना प्रचंड गर्दीत आपण मार्ग काढत असतो, पण कधी आपल्याला स्वत:च्या अस्मितेबरोबर चालता येईल का? हेच आज माणसांसाठी आवश्यक आहे. धकाधकीचे जीवन आहे, पण ते कोणी बनविले? आपण स्वत:च ना! मग आता आपल्याला जशी विश्रांतीची गरज आहे, तशी स्वत:ला स्वत:बरोबर विसावण्याची खूप गरज आहे. आपल्यातील आपला जिवलग मित्र शोधण्याची खूप गरज आहे. हे समजावताना माझ्या मनात येतं...

 
 

ढुंढते रहे दुनियाभर,

मिला नही जो आजतक

खुद में ही कही,

ढूंढ पाओ तो अच्छा हैं।


- डॉ. शुभांगी पारकर