आता झोमॅटोचे कर्मचारीच कंपनीच्या विरोधात

    दिनांक  11-Aug-2019 16:24:10 

कंपनी मांस पोहोचवण्याची जबरदस्ती करत असल्याचा आरोप 

 

कोलकाता : सोशल मीडियावर नेहमीच वादाचा विषय ठरणारी ऑनलाईन खाद्य पदार्थ पोहोचवणारी 'झॉमेटो' कंपनी पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य ठरली आहे. यावेळी कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच या प्रकरणी आवाज उठवला आहे. 'कंपनी आम्हाला गोमांस आणि डुक्कराचे मांस आदींची डिलिव्हरी करण्यासाठी जबरदस्ती करत आहे,' असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

 

'कंपनी आमचे म्हणणे ऐकून घेत नसल्याने आम्ही गेल्या आठवड्यापासून संपावर आहोत,' अशी माहिती त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री राजीब बॅनर्जी यांनी प्रतिक्रीया देत याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले आहे. 'कोणतिही कंपनी कर्मचाऱ्याला त्याच्या धर्माविरोधात वागण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही.', झोमॅटोच्याबद्दलही ही तक्रार माझ्या कानावर आली आहे, त्याकडे लक्ष देणार असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

 

यापूर्वीही झॉमेटोला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले होते. एका ग्राहकाने अन्नपदार्थ पोहोचवणारा कर्मचारी मुस्लीम असल्याने ऑर्डर रद्द केली होती, मात्र, कंपनीने त्याला तसे करण्यास नकार देत 'अन्नाला कोणताही धर्म नसतो', असे उत्तर दिले होते. यावरून संमिश्र प्रतिक्रीया उमटू लागल्या होत्या. तर, दुसऱ्या एका प्रकरणात वाजिद नावाच्या एका ग्राहकाने हलाल न मिळाल्यामुळे आपल्या ऑर्डरचे पैसे परत मागितले असता झोमॅटोने त्याची माफी मागून पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आणि एकीकडे मुस्लिम डिलिव्हरी बॉय नको असे म्हणणाऱ्या ग्राहकाला धर्माची शिकवण दिली होती. यावरून झोमॅटोला नेटीझन्सनी लक्ष्य केले होते.

 

दरम्यान, कंपनीने आम्ही भारतात विस्तार करत असताना तिथल्या संस्कृतीचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. संस्कृतीआड येणाऱ्या गोष्टींमुळे आमच्या नुकसानाबद्दल आम्हाला चिंता नाही, असे मत कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी व्यक्त केले होते.