आम्ही श्रीराम पुत्र कुशचे वंशज : भाजप खासदार दिया कुमारी यांचा दावा

    दिनांक  11-Aug-2019 21:33:40
 


जयपूर : श्रीराम पुत्र कुशचे आम्ही वंशज आहोत, असा दावा जयपुरातील राजघराण्याच्या सदस्य आणि भाजपाच्या खासदार दिया कुमारी यांनी रविवारी केला. रघुवंशातील कुणाचे अयोध्येत वास्तव्य आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे.

 

प्रभू श्रीरामचंद्राचे वंशज जगभरात आहेत, असे सांगतानाच, अयोध्येतील वाद लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. रामाचे वंशज कुठे आहेत, असा प्रश्न न्यायालयाने केला. मात्र, आमच्यासह रामाचे वंशज जगभरात आहेत. आम्ही कुशचे वंशज आहोत, असे त्यांनी सांगितले. त्या राजसमंद येथील भाजप खासदार आहेत.

 

रघुवंशातील कुणी अद्याप अयोध्येत राहते का, हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केली होती. याबाबत मला माहिती नाही. पण, ते शोधण्यासाठी प्रयत्न करू, असे या वेळी ‘रामलल्ला विराजमान’च्या वतीने युक्तिवाद करताना विधिज्ञ पारासरन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रमुख असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठाला सांगितले.

 

श्रीरामावर प्रत्येकाचा विश्वास आहे. राममंदिरावरील सुनावणी त्वरित व्हावी आणि यावर न्यायालयाने लवकरच निर्णय द्यावा, अशी आमची विनंती असल्याचे दिया कुमारी यांनी सांगितले. गरज भासल्यास आपण कुशचे वंशज असल्याचे दस्तावेज न्यायालयात सादर करू. मात्र, यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयात असलेल्या अयोध्या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.