पाकडे बिथरले, आता पार भैसटले... इमरान खान आता थेट रा. स्व. संघावर घसरले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019
Total Views |




म्हणे, संघ विचारसरणीमुळे काश्मिरात संचारबंदी





इस्लामाबाद : भारत सरकारने कलम ३७० रद्द करून तसेच जम्मू-काश्मीरचे विभाजन करून केंद्रशासित प्रदेश बनवल्यामुळे काश्मीर खोर्यातील दहशतवादी तसेच फुटीरतावाद्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. यामुळे त्यांना आजवर खतपाणी घालत आलेला पाकिस्तानही पुरता बिथरला आहे. भारताच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर आरडाओरड करूनही कुणीच भीक न घातल्यामुळे आता पाकिस्तान सरकार पुरते ‘भैसटले’ असल्याचे दिसत आहे. याच नैराश्यातून पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायला सुरुवात केली आहे.

 

रविवारी इमरान यांनी ट्विटरवरून ट्विट करत रा. स्व. संघावर आरोप केले. ते म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील संचारबंदी, नाकेबंदी आणि काश्मिरींचे होऊ घातलेले शिरकाण हे नाझी विचारधारेतून प्रेरित होऊन बनलेल्या आरएसएसच्या विचारधारेमुळेच होत आहे. वांशिक सफाई करून काश्मीरची लोकसंख्या बदलून टाकणे, हीच त्यांची विचारसरणी आहे. तरीही जग शांतच राहणार आहे का?,” असा सवाल इमरान यांनी विचारला. तसेच, यानंतर केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये “मला आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादी विचारसरणीची भीती वाटते,” असे विधान त्यांनी केले. “या विचारसरणीतूनच भारतातील मुस्लिमांचे दमन होईल आणि शेवटी पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल,” असाही जावईशोध इमरान खान यांनी लावला.

 

भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरला आहे. एकीकडे स्वतः आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला असतानाच भारताशी व्यापारी संबंध तोडणे वगैरे उद्योग यातूनच सुरू झाले आहेत. दुसरीकडे, इमरान खान यांच्यासकट अनेक पाकिस्तानी नेते भारताच्या विरोधात वाट्टेल तसे बडबडताना दिसत आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवर कांगावा करण्याच्या पाकच्या प्रयत्नांना काही केल्या यश मिळत नसून अनेक देश हे भारताचेच समर्थन करत आहेत. इमरान खान यांनी नुकतेच पाकिस्तानच्या संसदेत बोलताना संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचा उल्लेख करत संघावर टीका केली होती. या सगळ्या घटना पाहता जागतिक पातळीवर एकटा पडलेला आणि दिवसेंदिवस आर्थिक दिवाळखोरीच्या गर्तेत चाललेला पाकिस्तान आणि तेथील नेतेही नैराश्याच्या गर्तेत चालले असल्याचे दिसत आहे.

 

पाकिस्तानातील धार्मिक दहशतवाद संपवू शकाल का?

इमरान खान यांच्या या ट्विटला भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. राम माधव आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, जगभरात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान किती सैरभर झाला आहे, हेच यातून दिसते. सार्‍या जगाला पाकपुरस्कृत दहशतवादाचा धोका आहे. आम्ही मोहम्मद अली जिना यांच्या द्विराष्ट्रवादाचा आणि शेख अब्दुल्ला यांच्या तीन राष्ट्रांचा सिद्धांत संपवला असल्याचे सांगत, “इमरान खान पाकिस्तानातील धार्मिक दहशतवाद संपवतील का?,” असा प्रश्न राम माधव यांनी उपस्थित केला आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@