चरणदासांची गोची

    दिनांक  11-Aug-2019 20:21:28काँग्रेसने लोकशाही प्रक्रियेने अध्यक्ष निवडल्याचे दाखवले. परंतु, सोनियांची निवड लोकशाहीने नव्हे तर केवळ 'गांधी' नावामुळेच झाल्याचे स्पष्ट दिसते. 'गांधी' आडनाव हेच त्यांचे कर्तृत्व, हीच त्यांची अध्यक्षपदाची पात्रता! तसेच हा प्रकार कार्यकारिणीने वगैरे केल्याचे दिसत असले तरी काँग्रेसमध्ये सर्वाधिकार गांधी घराण्यालाच हे उघड सत्य. इथे अंतिम शब्द गांधी घराण्याचाच!

 

'वाडवडिलांपासून चालत आलेली दुकानदारी घरातल्या कर्त्या व्यक्तीने पुढल्या पिढीकडे सोपवावी, अधिकाधिक समृद्धीच्या आशेने. परंतु, नव्या वारसांनी कर्तृत्वशून्यतेचा वस्तुपाठच घालून द्यावा आणि आहे त्याचेही नुकसानच नुकसान करावे. अपयशाने पार तळ गाठावा. ज्येष्ठांनी लहानांची ही कामगिरी पाहावी, पण तरीही उसने अवसान आणावे नि प्रोत्साहन द्यावे. अखेरीस आपल्यात कर्तबगारी दाखविण्याची योग्यता नाही, हे ओळखून नव्यांनी सारे काही वार्‍यावर सोडून द्यावे, पलायन करावे. अशा परिस्थितीत घरातल्या वरिष्ठांनी काय केले पाहिजे? तर नक्कीच,उरल्यासुरल्या गल्ल्याचा ताबा घ्यावा आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत दुकानदारी करावी,' असेच कोणीही सांगेल.

 

सध्या काँग्रेसची अवस्था काहीशी अशीच झाल्याचे एकंदरीत चित्र दिसते. पदरात पडलेला पप्पूछाप मुलगा, जावयावर चोरीचे-भ्रष्टाचाराचे गुन्हे, मुलीची अवस्था कायमच सर्वज्ञान्यासारखी पण वस्तुस्थितीचे जराही भान नसलेली, अशा परिस्थितीत एखाद्या आईने काय करावे? तेच जसे वर लिहिले आहे आणि झालेही तसेच. सोनिया गांधींनी पुन्हा एकदा हाती घेतलेला काँग्रेसचा कारभार त्याचीच साक्ष देतो. तत्पूर्वी १७ व्या लोकसभेचा निकाल लागला आणि राहुल गांधींनी आपली मर्यादा ओळखून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तसेच राहुल गांधींनी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती असेल, असेही सांगितले. पण यामुळे गांधी घराण्याच्या चरणदासांची मोठीच गोची झाली.

 

कारण घराण्याच्या गुलामांना गांधी घराण्यातीलच व्यक्ती अध्यक्षपदी हवा होता. पुढे जवळपास अडीच महिने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचा तमाशा रंगला. कोणी राहुल गांधींनाच अध्यक्षपदी परतण्याची विनंती केली तर कोणी प्रियांका गांधींचेही नाव सुचवले. दुसरीकडे प्रसारमाध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून कधी सुशीलकुमार शिंदे, कधी ज्योतिरादित्य शिंदे, कधी सचिन पायलट तर आता आतापर्यंत मुकुल वासनिक वगैरे नावेही नाचवली गेली. पण एकमत काही होत नव्हते. शेवटी शनिवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक झाली, तिथे विचारविनिमय, चर्चा वगैरे झाल्याचा देखावा निर्माण केला गेला आणि रात्री उशिरा ती घडी आली. सोनिया गांधींची काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

 

अर्थात काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय तरणोपाय नसल्याचाच संदेश या निवडीतून दिला गेला. तसेच हे असेच घडणार, याची माहितीही सर्वांना होती. म्हणूनच सोनियांचे नाव अध्यक्षपदी नक्की झाल्यानंतर त्यावर टीकाटिप्पणीला उधाण आले. समाजमाध्यमातून तर काँग्रेसच्या या निर्णयाची यथेच्छ खिल्ली उडवली गेली, विनोद, मीम्स, चारोळ्यांचा पाऊस पडला. यावरूनच काँग्रेसच्या या सगळ्याच खेळाकडे जनता कोणत्या नजरेने पाहते, हे समजते. गेली अडीच महिने माथाफोड करून, ऊहापोह करून निवडून निवडले कोणाला तर त्याच सोनिया गांधींना, ज्यांनी २० महिन्यांपूर्वी आपल्या मुलावर विश्वास टाकत सक्रिय राजकारणातून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. २०१४ साली मोदींचे सरकार सत्तेवर आले आणि नंतर भाजपने एकामागून एका राज्यावर विजय मिळवला.

 

काँग्रेसने या निवडणुका सोनिया गांधींच्या अध्यक्षपदीच लढवल्या होत्या. मात्र, आपल्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुकांत पराभूत होत असल्याचे पाहून सोनियांनी मोठ्या उमेदीने राहुलकडे पक्षाचा ताबा दिला अन् त्याच राहुल गांधींनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या उफराट्या डावपेचांनी पक्षाची माती केली. म्हणून सोनियांनी पुन्हा पक्ष आपल्या हाती घेतला. हे म्हणजे असे झाले, आई निवडणुका हरली तर मुलगा पक्षाध्यक्ष आणि मुलगा निवडणुका हरला तर आई पक्षाध्यक्ष! अशाने पक्ष कसा चालू शकेल? तर नाहीच, उलट पक्षाची अवस्था आणखी बिकट आणि बिकटच होत जाईल. कदाचित पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात येईल. पण, हे लक्षात कोण घेईल? इथे तर गांधी घराण्यापुढे माना तुकवण्यासाठीच चढाओढ लागलेली, तसेच लोकशाही प्रणालीत विरोधी पक्ष असावा, पण त्याची गत काँग्रेससारखी एकाच घराण्याच्या दावणीला बांधल्यासारखी झालेली असेल तर, त्याचा लोकशाहीला काय उपयोग आणि कसला फायदा?

 

दुसरीकडे काँग्रेसने आपला अध्यक्ष लोकशाही प्रक्रियेने निवडल्याचेही दाखवले. परंतु, सोनियांची निवड लोकशाहीने नव्हे तर केवळ 'गांधी' आडनावामुळेच झाल्याचे स्पष्ट दिसते. 'गांधी' आडनाव हेच त्यांचे कर्तृत्व, हीच त्यांची अध्यक्षपदाची पात्रता! तसेच हा प्रकार कार्यकारिणीने वगैरे केल्याचे दिसत असले तरी काँग्रेसमध्ये सर्वाधिकार गांधी घराण्यालाच हे उघड सत्य. इथे अंतिम शब्द गांधी घराण्याचाच. त्याचमुळे काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड-सोनिया गांधींनी सोनिया गांधींचे नाव पक्षाध्यक्षपदासाठी सुचवले. नंतर सोनिया गांधींनी सोनिया गांधींशी यावर चर्चा केली व त्याला अनुमोदन दिले.

 

पुढे सोनिया गांधींनी सोनिया गांधींची पक्षाध्यक्षपदी निवड करण्यावर शिक्कामोर्तब केले व सोनिया गांधींनी सोनिया गांधींच्या नावाची घोषणा केली-असाच हा घटनाक्रम, हीच ती लोकशाही प्रक्रिया! सोनियांच्या निवडीने आणखीही काही गोष्टी स्पष्ट झाल्या. काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकारिणीच्या सदस्यांना गांधी परिवाराच्या पाशात अडकून राहण्याचीच इच्छा असल्याचे यावरून दिसते. कारण कोणतीही जबाबदारी नको, पक्षाचा मेलेला पोपट महाराणीच्या देखरेखीखाली राहू द्यायचा आणि स्वतः मिळेल ती सत्तापदे भोगत राहायची, अशी ही स्थिती. सोबतच इथे काँग्रेसमधील तरुण तुर्क आणि म्हातार्‍या अर्कांतला संघर्षही पाहायला मिळाला.

 

ज्येष्ठ नेत्यांना गांधी घराण्यातील किंवा सोनियाच अध्यक्षपदी हव्या होत्या तर तरुणांना अन्य कोणीतरी तडफदार व्यक्ती हवा होता. मात्र, जगात आज सर्वाधिक युवकांची लोकसंख्या भारतात आहे, त्या देशातल्या एका राष्ट्रीय पक्षात तरुणांच्या मागणीला किंमतच दिली गेली नाही. आधुनिक युगात अडगळीत पडलेल्या, प्रभावहीन झालेल्या, जनमत फिरवण्याची शक्ती नसलेल्या वरिष्ठ नेत्यांचीच मर्जी चालली. म्हणजेच जुन्या-पुराण्या, अनुभवी वगैरे नेत्यांचा विजय झाला व तरुणांना नाकारले गेले. असा पक्ष आगामी काळात कसा तग धरेल? उलट काँग्रेसचा लोळागोळा-पालापाचोळाच होईल, असे वाटते.