भारतीय चित्रपट महामंडळाच्या नवीन वास्तूचे जावडेकर यांच्या हस्ते उदघाटन

10 Aug 2019 17:08:28


केंद्रीय माहिती आणि प्रसारण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचे उदघाटन पुणे येथे केले. मुंबई पुणे नागपूर येथे कार्यरत भारतीय चित्रपट महामंडळअनेक नवोदित कलाकारांना लेखन, अभिनयापासून ते नैपथ्य पर्यंतच्या सर्व संधी उपलब्ध करून देत असते.

उदघाटन प्रसंगी जावडेकर म्हणाले की, भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने अत्यंत विपरीत परिस्थितीतून चित्रपट महामंडळाचा विकास केला असून, २०१६ मध्ये केवळ १८०० सदस्य असलेल्या महामंडळाचे आता चाळीस हजार नोंदणीकृत सदस्य झाले आहे. उपेक्षित असलेल्या या क्षेत्राचे अनेक प्रश्न आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवलेत आणि आज महामंडळाच्या मालकीची वास्तू उभी केलीत यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन! त्यांनी सिने सृष्टीला आव्हान केले की, निर्मित राष्ट्रीय निधीतून काही भाग चित्रपट महामंडळाच्या विकासासाठी द्यावा.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणालेत की, या अंदाज पत्रकात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठी सरकारने नवीन पेन्शन योजना चालू केली आहे. यामध्ये सभासदाच्या सहभागानुसार सरकार समआर्थिक सहभाग देऊन सभासदाच्या ६० व्या वर्षांपासून पेन्शन चालू करते. त्यांनी महामंडळाच्या सर्व सदस्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले भविष्य सुरक्षित करावे असे आव्हान दिले.

कार्यक्रमात बोलतांना जावडेकर पुढे म्हणाले की, 'आयुष्यमान भारत' हि अत्यंत दर्जेदार आरोग्य योजना असून सर्व प्रकारच्या आजारांसाठी रामबाण योजना असल्याने जास्तीत जास्त चित्रसृष्टीतील लोकांनी याचा लाभ घ्यावा. योजना चालू झाल्यापासून जवळपास एक लाख लोकांनी याचा फायदा घेतला असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

काल ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेत त्यामध्ये मराठी चित्रपट 'भोंगा' ला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार तर 'चुंबक' या चित्रपटात साहाय्य अभिनेता म्हणून स्वानंद किरकिरे , महेश पोफळे, आदिनाथ कोठारे इत्यादी कलाकारांना मिळालेल्या त्यांच्या यशाबद्दल जावडेकरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी 'चित्रशारदा' मराठी त्रैमासिकाचे उदघाटन जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, चित्रपट महामंडळाचे मान्यवर उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0