राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी भाग-१

    दिनांक  10-Aug-2019 20:59:17


 


संस्कृत शब्दांचा अनोखा विलास असलेली एक नक्षी टिळकांच्या नोंदवहीत सापडते. पोरवयातून तारुण्याकडे झेपावताना संस्कृतच्या वाचनाने टिळक 'सु-संस्कृत' होत होते. प्राचीन भाषेबद्दलच्या व्यासंगातून, ग्रंथांच्या अभ्यासातून स्वधर्म, संस्कृती आणि स्वराष्ट्र याबद्दलच्या ठाम निष्ठा टिळकांच्या मनात निर्माण झाल्या. त्याला इतिहासाच्या अभ्यासाची योग्य जोड मिळाली. गतकाळातील पूर्वजांचा पराक्रम आणि वर्तमानातील समाजाला आलेले शैथिल्य यांच्या तुलनेतून टिळकांच्या जाणिवा जागृत झाल्या. यातून त्यांना कार्यप्रवण होण्याची प्रेरणा मिळाली. अवघ्या विशी-पंचविशीच्या वयात टिळकांना कृतिशीलतेकडे नेणारा 'विचारप्रेरणे'चा हा प्रवास अतिशय रंजक आहे.


"बंडवाल्यांचा पराभव झाल्यानंतर तर इंग्रजी राज्याची अधिकच छाप बसली गेली. जुन्या सरदार घराण्यातील पुरुषांना राजकारणात पडण्याची जरूर नसल्यामुळे त्यांच्या अंगचे गुण लुप्तप्राय झाले व पुणे पाठशाळेतून तयार झालेले नवीन विद्वान, सरकारी नोकरीत आणि त्यामुळे प्राप्त झालेल्या 'माना'तच दंग होऊन राहिले. जी पुण्याची, तीच सगळ्या महाराष्ट्राची स्थिती होती." 'केसरी'तील रानड्यांच्या मृत्युलेखात टिळकांनी काढलेले हे उद्गार १८५७ नंतरच्या आणि टिळक राजकारणात उतरण्यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन करतात. टिळकांच्या मते, थंड, गोळा वगैरे होऊन पडलेल्या महाराष्ट्रात वासुदेव बळवंतांचा आवाज अधेमध्ये थोडाफार ऐकू आलाही. पण, उतू गेलेले दूध शेवटी आगीत पडते तशी पहिल्या दोन-तीन पिढ्यांतील चळवळीची स्थिती झाली. "नुसत्या बुद्धिमत्तेपेक्षा पुढारीपणास इतर काही अधिकार लागतो, ही गोष्ट उघड दिसून आली," असेही टिळकांनी एके ठिकाणी नमूद केले आहे. अशा भोवतालात टिळक मोठे होत होते, त्यांचे विचार पक्के होत होते. टिळकांच्या वैचारिक जडणघडणीच्या आरंभकाळात डोकावून बघणे गरजेचे आहे. लग्नाच्या वेळी 'आषाढपाटीच्या वस्तूंऐवजी पुस्तके घेऊन द्या' असा हट्ट धरणाऱ्या बाळ टिळकांनी महाविद्यालयात जाण्यापूर्वीच संस्कृतचे अध्ययन करताना हिंदू धर्मातील महत्त्वाच्या ग्रंथांचा अभ्यास सुरू केला होता. टिळकांनी महाविद्यालयीन काळात केलेली तालीमबाजीच आज मुख्यत: आठवली जाते. शालेय पुस्तकात लिहिलेला 'मेरी' आणि 'एलिझाबेथ'चा इतिहास बाजूला ठेवून इतर पुस्तकांच्या साहाय्याने इतिहासाचे स्वतंत्र टिपण असलेल्या वह्या, तसेच संस्कृत कवितांच्या वह्यासुद्धा टिळकांच्या पहिल्या चरित्रकारांना सापडल्याची नोंद आहे. या अभ्यासाच्या बळावरच 'मॉरिशचा' इतिहास कसा चुकीचा आणि एकतर्फी लिहिलेला आहे, हे टिळक आपल्या मित्रांना समजावून सांगत. बडोद्याचे मल्हारराव गायकवाड आणि त्यांची सरकारने केलेली चौकशी, १८७६-७७चा दुष्काळ, राणीचा दरबार, त्या काळातल्या दुष्काळामुळे झालेले शेतकऱ्यांचे दंगे, या सगळ्याचा परिणाम टिळकांच्या तरूण मनावर झाल्याखेरीज राहिला नाही. एलएलबीची तयारी करत असताना टिळकांनी हिंदू धर्मशास्त्राचा प्रचंड अभ्यास केल्याच्या अनेक नोंदी सापडतात. सुमारे ५० हून अधिक ग्रंथांचा अभ्यास टिळक एकाच वेळी करत होते.

 

तत्कालीन रुढीप्रमाणे इंग्रजी पुस्तके वाचून वेदांचा अभ्यास न करता प्रत्यक्ष संस्कृत पुस्तके वाचून त्यांनी आपली मते बनवली. परक्यांच्या उसनवारीपेक्षा आपल्या पूर्वजांच्या विशुद्ध ज्ञानावर अवलंबून राहणे त्यांना अधिक पसंत असावे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात धर्म, परंपरा, संस्कृती, चालू आचारविचारांची ग्राह्याग्राह्यता, पेशवाईतील पराक्रम, मनुष्य हा असलेल्या परिस्थितीचा दास का ? आपल्या पराक्रमाने परिस्थितीला नवे वळण देणारा प्रभू, महाविद्यालयात नाव गाजवून गेलेले विद्यार्थी आणि प्राध्यापक यांवरच बहुधा वादविवाद चालत, असे फाटकांनी टिळक चरित्रात सांगितले असले, तरी 'आपण भले आणि आपला अभ्यास भला' असा विचार करणारे विद्यार्थीच बव्हंशी टिळकांचे सोबती होते. टिळकांसोबत वाद घालायला फार कुणी पुढे येत नसे. दाजीसाहेब खरे यांनी महाविद्यालयातील तरुण टिळकांचे केलेले वर्णन महत्त्वाचे वाटते. "He had the gift of reaching the core of problem in a flash. He could explain any problem with all its pros and cons in his direct and logical style and support his arguments by irrefutable ancient authorities." अशातच आगरकरांची भेट झाल्याने आपल्या विचारांना प्रतिसाद देणाऱ्या आणि प्रसंगी वादही घालणाऱ्या एका विद्वान मित्राचा सहवास लाभला आणि दोघांची पुढील कार्याविषयाची मते पक्की होऊ लागलीटिळक-आगरकर विचारभिन्नता, भांडणे आपल्याकडे फार रंगवून सांगितली जातात. पण, सुरुवातीची बरीच वर्षं टिळक-आगरकरांचे विचार बव्हंशी समांतर जाताना दिसतात. या जडणघडणीच्या काळातील आठवणी फार वाचनीय आहेत. आगरकरांच्या मृत्युलेखात टिळक म्हणतात, "प्रथमतः दृढनिश्चयाने त्यांनी व आम्ही काही विशिष्ट लोकोपयोगी कार्य करण्याचे मनात आणले व त्यानंतर ती कार्ये सिद्धीस नेण्याकरिता एकदिलाने घरी, दारी, किंबहुना कारागृही जे बेत व उद्योग केले, त्यांचे तीव्र स्मरण पुन्हा पुन्हा जागृत होऊन आमची बुद्धी व लेखणी गोंधळून जाते. एका विद्यालयात एक प्रकारच्या विशिष्ट शिक्षणाचा संस्कार झाल्यामुळे पुढे आयुष्य कोणत्या तर्‍हेने घालवायचे, याचा विचार करता करता एक विशिष्ट उद्योग करण्याचे व त्यात आपले सर्व आयुष्य घालवण्याचे ठरवून ज्यांनी आपल्या आयुष्याच्या उमेदीची पहिली दहा-बारा वर्षे आपले इष्ट हेतू तडीस नेण्याकरिता कोणत्याही संकटाकडे लक्ष न देता खर्च केली..." हा मजकूर जरी अर्धवट दिला असला तरी या वाक्यांवरून टिळक-आगरकरांच्या ध्येयनिश्चितीची कल्पना येते. 'डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस' या आत्मचरित्रात आगरकर म्हणतात, "मी एमएकरिता आणि टिळक एलएलबीकरिता अभ्यास करण्यासाठी कॉलेजात राहिलो असता सरकारी नोकरी न पत्करिता देशसेवेत आयुष्य घालविण्याचा ज्या दिवशी निश्चय केला, त्या दिवसांपासून आम्ही जे जे बोललो चाललो होतो, त्याची पुन: पुन: आठवण होऊन अनेक वेळा पुनरावृत्ती होत असे."

 
 
 

काहीही झाले तरी सरकारी नोकरी करायची नाही, पण समाजासाठी खूप काही करायचे अशी ऊर्मी दोघांच्या मनात होतीच. लोकांमधील अज्ञान नाहीसे करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी 'ज्ञानप्रसार' म्हणजेच शाळा काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला असल्यास फार नवल नाही. हा संकल्प पुढेही त्यांनी तसाच निभावून दाखवला, यात विशेष आहे. तत्कालीन शिक्षणातील दोष टिळकांना दिसत असावेत, म्हणूनच शिक्षणाला त्यांना प्राधान्यक्रम द्यावासा वाटला. पुढे १९०१च्या एका व्याख्यानात शाळा काढण्याचा विचार मनात आला हे सांगताना, त्या काळच्या लोकस्थितीचे वर्णन टिळक स्वतः करतात. "...शाळातून धर्म व नीती यांचे शिक्षण मिळण्याची सोय केलेली नव्हती. त्यामुळे पहिल्या पिढीच्या सुशिक्षित लोकांची मन:स्थिती भयंकर व शोचनीय झाली. जुन्या सामाजिक बंधनांबद्दल त्यांच्या मनातील आदर नाहीसा झाला. शिक्षण सदोष व थोडे, पण तेवढ्याच्याने संसार थाटण्याएवढा पगार व सरकारी मान्यता मिळू लागल्याने इकडे अधिकारमद वाढला व तिकडे समाजाची टवाळी करण्याची बुद्धीही वाढली." म्हणूनच बुजुर्गांना एकत्र करून उपदेश करण्यापेक्षा नव्या दमाच्या तरुणांना शिक्षणाच्या माध्यमातून भविष्याच्या योग्य वाटा दाखवणे टिळकांना इष्ट वाटले असावे. टिळक महाविद्यालयात असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकरांची 'निबंधमाला' तत्कालीन सुशिक्षित, विचारी वर्गात लोकप्रिय होती. शास्त्रीबुवांच्या आक्रमक राष्ट्रवादाचा, चारित्र्याचा आणि स्वगौरवाचा टिळकांच्या विचारसरणीवर या वयात चांगलाच परिणाम झाला व मराठी भाषेच्या या शिवाजीशी त्यांची जवळीक वाढल्याचे दिसते. शास्त्रीबुवांनी याच सुमारास सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता आणि ते नवीन शाळा काढणार अशी चर्चा पुण्यात होती. नव्या शाळेसाठी टिळक -आगरकर उत्सुक होतेच.

 

"शाळेच्या संबंधाने विष्णुशास्त्रींशी बोलणे लावावयास गावात गेलो असता परत येताना थंडीने कुडकुडलो...." असं आगरकर लिहितात. यासंदर्भात चिपळूणकरांनी आपल्या भावाला लिहिलेले एक दुर्मिळ पत्र वाचनीय आहे. दि. १३ सप्टेंबर, १८७९ रोजी ते आपले धाकटे बंधू लक्ष्मणराव यांना लिहितात- 'The memorable १st of October is approaching. I shall enjoy the pleasure of kicking of my chains that day. Mr. Agarkar (going for M.A.) Mr. Tilak (going for L.L.B.) Mr. Bhagwat and Karandikar (appering for B.A.) have tendered proposals for joining me in the enterprise. This they have done of their own accord. We have settled 1st of January for the hosting of the standard. Such a battery must carry the high school instantaneously before it." वेद आणि प्राचीन ग्रंथांच्या व्यापक अभ्यासातून एक आगळी अध्ययनपद्धती टिळकांना समोर दिसत असावी. भारतीय विद्यापीठे सर्वांगीण विद्वत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या निर्मितीची स्थाने बनली पाहिजेत, हा विचार या अभ्यासातूनच निर्माण झाल्याचे दिसून येते. शिक्षणक्षेत्रात सर्वांगीण प्रगतीसाठी निष्णात अध्यापक, मोठेमोठी ग्रंथालये, विद्याव्यासंग असणारे विद्यार्थी, यांत्रिक उपकरणे याची गरज टिळकांना जाणवू लागली होती. टिळक-आगरकरांच्या मतैक्याची शक्ती शाळा काढण्याच्या त्यांच्या निर्णयात पूर्णपणे दिसते. आमचे शिक्षण क्षेत्रात उतरण्याचे विचार किती पक्के झाले होते, हे १९१९ साली टिळक स्वतःच सांगतात. "आम्ही निकृष्ट देशस्थितीच्या विचाराने भणाणलेल्या डोक्याची माणसे होतो आणि पुष्कळ विचारानंतर शिक्षणातच आमच्या देशाचा उद्धार आहे, असे आमचे ठाम मत बनले होते." (टिळक भारत- शि. ल. करंदीकर - पान १७) पण, केवळ शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राची उन्नती साधली जाणार होती का? 'शहाणे करून सोडावे सकळ जन' या ध्येयाने सुरू झालेला हा प्रवास भविष्यात आपल्याला आणि आपल्या देशाला कुठवर घेऊन जाईल, याची कल्पना खुद्द टिळकांना तरी असेल का ?

 

- पार्थ बावस्कर

९१४६०१४९८९