नमस्ते शारदेदेवी काश्मीरपुरवासिनी...

    दिनांक  10-Aug-2019 18:53:10


समस्त भूमंडळात अत्यंत पवित्रभूमी म्हणून भारताचे विशिष्ट स्थान आहे. भारताचे हे स्थान अगणित ऋषिमुनी, संत-महंत, अवतार आणि विद्वतजनांच्या कार्यामुळे प्राप्त झाले आहे. जगातील सर्वात सुसंस्कृत अशा आर्यसंस्कृतीचा विकास भारतातच झाला. असा सुसंस्कृत भारत हा आपला श्वास आहे आणि येथील हिंदू संस्कृती हा आत्मा आहे. नकाशात दिसणारा भारत राष्ट्रपुरुषाचा देह भासतो. अशा राष्ट्रपुरुषाचा मुकुट म्हणजे काश्मीर! काश्मीर म्हणजे शारदापीठ. माता सरस्वतीचे स्थान. शारदादेश म्हणजेच काश्मीर म्हणजे ज्ञान आणि बुद्धीचे माहेरघर आहे. म्हणूनच म्हणतात

नमस्ते शारदेदेवी काश्मीरपुरवासिनी।

त्वामहं प्रार्थये नित्यं

विद्यादानं च देहि मे॥

ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली त्यानंतर मानवाला पृथ्वीवर पाठवले. मानवाने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की, मानवजातीचा उत्कर्ष व्हावा यासाठी आपल्यासारखे देवदेवता यांना आमच्यासोबत पाठवावे. मानवाची ही प्रार्थना ऐकून विविध देवीदेवता यांनी पृथ्वीवर आपले स्थान निर्माण केले. ज्ञानदेवता माता सरस्वतीने जे स्थान निवडले ते म्हणजे काश्मीर होय. म्हणूनच काश्मीरला शारदादेशम्हणतात. याच ठिकाणी आदी शंकराचार्य स्वामींचे शारदापीठ (सध्या पाकिस्तानात)आहे. भारतीय संस्कृतीत म्हटल्या जाणार्‍या नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी...या श्लोेकात आपण शारदेच्या रूपाने काश्मीरचे नित्यस्मरण करीत असतो. अर्थात, हे काश्मीरवासिनी सरस्वती माते आपण आपले ज्ञान आम्हाला द्यावे, यासाठी आम्ही नित्य प्रार्थना करतो. भारतीय हिंदू समाज मुळातच वैदिक ज्ञानोपासक आहे. त्याअर्थाने आम्ही सरस्वतीपुत्र आहोत. काश्मीरचा इतिहास पौराणिक आहे. नागवंशीय कश्यपऋषी यांच्या नावावरून काश्मीरहे नाव प्राप्त झाले. असुरांचा नाश करून सज्जनांना अभय प्रदान करणारे कश्यप ऋषी यांनी काश्मीर शारदादेशाला नवे रूप दिले. भारतातील सुसंस्कृत विद्वान आणि सुविद्य पंडितांना देशातून बोलावून कश्यप ऋषींनी काश्मिरात वसविले. महाभारत धर्मयुद्धात तत्कालीन काश्मीर नरेश राजा गोकर्ण याने सहभाग घेतला नाही. त्यामुळे योगेश्वर श्रीकृष्ण यांनी त्याचा वध करून त्याची पत्नी यशोमतीला राज्यावर बसवले. जगाच्या इतिहासात एका महिलेला राज्यपद देण्याची ही पहिली घटना होती. यशोमतीच्या राज्याभिषेकाच्यावेळी गोपाळकृष्ण स्वतः हजर होते. त्यावेळी योगेश्वर म्हणतात, “काश्मीरभूमी साक्षात पार्वतीचे रूप आहे. म्हणूनच काश्मिरात शिवतत्त्व विराजमान आहे.अनेक हिंदू धर्मग्रंथात काश्मीर-शारदादेशाचा उल्लेख आला आहे. शक्ती-संगमतंत्रया ग्रंथात दिलेल्या श्लोेकानुसार,

शारदामठमारभ्य कुडःकुमाद्रितटान्तकम्।

तावत्काश्मीरदेशः स्यात्पन्चाशद्योजानात्मकः॥

अर्थात, शारदामठापासून केशर पर्वतापर्यंत ५० योजने हा भूभाग म्हणजे काश्मीर देश होय. महाभारतात याचा निर्देश काश्मीरमंडळात आला आहे. युधिष्ठिराच्या राज्याभिषेकात काश्मीर नरेश राजा गोनंद उपस्थित असल्याचा उल्लेख आढळतो. सम्राट अशोकाने आपल्या राज्याची राजधानी म्हणून श्रीनगरी (आजचे श्रीनगर) शहर वसविले. हिंदू संस्कृतीत १६ संस्कारांना महत्त्व आहे. उपनयन झाल्यावर बटूला सात पावले उत्तरेकडे जाण्यास सांगतात. उत्तरेला अर्थात काश्मीरकडे-ज्ञानभूमी शारदापीठाकडे. काश्मीर प्रदेशात शिवतत्त्व असल्याने येथील संस्कृती नागपूजक आहे. जागोजागी नागदेवतांची मंदिरे काश्मिरात आजही विद्यमान आहेत. नीलनाग, अनंतनाग, वासुकीनाग, कोकरनाग, नारानाग, कौसरनाग इत्यादी. नाग हे शिवगणातील असल्याने नागदेवता काश्मीर संरक्षक आहे. सांस्कृतिक दृष्टीने प्राचीन काळापासून काश्मिरात भारतीय वैदिक संस्कृतीचे जतन केले आहे. विद्या आणि कला यांचा समुच्चय म्हणजे काश्मीर! क्षेमेंद्र, मम्मट, अभिनवगुप्त, रुद्रट, कल्हण या काश्मिरातील ऋषींनी अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, संगीत या क्षेत्रात काश्मिरातील लोकांनी प्रशंसनीय कार्य केले. अनेकांना माहिती नसेल, परंतु पंचतंत्रहा बोधप्रद ग्रंथ काश्मिरात लिहिला गेला. ललितादित्य, अवंतिवर्मा, यशस्कर, हर्ष या राजांनी अनेक विद्वान आणि कलाकारांना आश्रय देऊन काश्मीर संस्कृती विकसित केली.

प्रत्यभिज्ञादर्शननामक एक नवीन दर्शन आचार्य अभिनवगुप्त यांनी याच शारदादेशात निर्माण केले. हे दर्शन काश्मिरीयनावाने प्रसिद्ध झाले. काश्मीरम्हणजे देववाणी संस्कृतची कन्याअसेही म्हटले जाते. नैसर्गिक विविधतेने नटलेले काश्मीर म्हणजे कैलासावरील सर्वोत्तम स्थान आणि नंदनवन असे महाकवी कालिदासाने म्हटले आहे. ३७०आणि ३५ अहे कलम घटनेतून हटविल्याने भारताचा मुकुटमणी अशी ख्याती असलेले काश्मीर शारदापीठ पुन्हा एकदा भारतवर्षात खर्‍या अर्थाने संमिलीत झाले आहे. सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत धाडसी आणि प्रभावशाली असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह समस्त संसद सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!

९६५७७२०२४२

प्रा. भालचंद्र हरदास