गुगल, फेसबुक, ट्विटरवर कर आकारणार?

01 Aug 2019 16:23:52



 


नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुगल, फेसबुक आणि ट्विटर आदी आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कर आकारण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू केला आहे. या कंपन्यांची महसूल आणि ग्राहक मर्यादा निश्चित करून भारतातून त्यांना मिळणाऱ्या नफ्यावर या कंपन्यांना प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्स) भरावा लागण्याची शक्यता आहे.

 

नवी दिल्लीतील केंद्र सरकारमधील सूत्रांकडून याबाबत अनौपचारिक वार्तालापात टिप्पणी करण्यात आल्याचे वृत्त काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यानुसार, भारतातून मिळणाऱ्या ऑनलाईन जाहिरातींद्वारे या आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रचंड प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवतात व अत्यंत कमी प्रमाणात कर भरतात, असा आरोप या कंपन्यांवर नेहमीच करण्यात येतो.

 

यामध्ये गुगल, फेसबुक, ट्विटर आदींचा प्रामुख्याने समावेश होतो. अशा स्थानिक पातळीवर भरघोस उत्पन्न घेऊन नफा मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर जगात अनेक देश कर आकारण्याबाबत हालचाली करत आहेत. यामध्ये मुख्यतः युरोपीय देशांची संख्या अधिक आहे.

 

याच पार्श्वभूमीवर भारतदेखील या निर्णयाबाबत गांभीर्याने विचार करत आहे. गतवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पातही सरकारकडून ‘सिग्निफिकंट इकॉनॉमिक प्रेझेंस’ ही संकल्पना मांडण्यात आली होती. या संकल्पनेचा समावेश प्रत्यक्ष कर कायद्यात करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. तसेच, याबाबतचा प्रस्तावही लवकरच केंद्रीय वित्त मंत्रालयाला सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

Powered By Sangraha 9.0