दूर, तरीही सोईचे!

01 Aug 2019 14:43:09


 


‘पार्किंग’ ही मुंबईतील मोठी समस्या आहे. त्यामुळेच वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. त्यावर ‘पार्किंग सेंटर’चा उपाय शोधला तरी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे तो कमीच पडत आहे. मात्र, समस्येची तीव्रता कमी होत आहे हे नक्की. बोरिवलीचे पार्किंग सेंटर रेल्वेस्थानकापासून थोडे लांब आहे, पण पर्यटक आणि स्थानिकांना फारच उपयोगी आहे.

 

मुंबई (अरविंद सुर्वे) : बोरिवली हे मुंबईच्या उत्तर टोकाकडचे महत्त्वाचे आणि साहजिकच जास्त गर्दीचे ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोराईचे एस्सेल वर्ल्ड, त्यापासून जवळच असलेले पॅगोडा, कान्हेरी गुंफा अशी महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळेही पाहण्यासाठी बोरिवलीतूनच जावे लागते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ जास्त आहेत. शिवाय २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या पाच लाखांहून जास्त आहे. साहजिकच येथे स्थानकाच्या आसपास पार्किंग सेंटर असणे आवश्यक होते. पण मुंबईत जागेचा प्रश्न असल्याने पार्किंग सेंटरसाठी स्थानकानजीक जागा उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही महापालिकेने हार न मानता क्लब अ‍ॅक्वरिया, वॉर्ड क्र. ८, देवीदास लेन, दहिसर (प.) येथे पार्किंग सुविधा उपलब्ध करून घेतली. क्षेत्र दहिसरचे असले तरी बोरिवलीहून जवळ आहे.

 

भाजपचे खा. गोपाळ शेट्टी, आ. मनीषा चौधरी आणि नगरसेवक हरिश छेडा यांच्या मतदारसंघात ही पार्किंग सुविधा आहे. येथे सुमारे ३०० वाहनांची सोय होऊ शकते. रेल्वेस्थानकापासून अंतर थोडे दूरचे असल्याने वाहनांची संख्या कमी आहे. मात्र, येथील इमारतींमधल्या रहिवाशांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. शिवाय येथे ‘अदानी’ विद्युतपुरवठा कंपनीचे कार्यालय आहे. तेथील कर्मचार्‍यांसाठीही पार्किंगची उत्तम सोय झाली आहे. त्याचप्रमाणे ‘एस्सेल वर्ल्ड’ किंवा ‘पॅगोडा’ला जाऊन येण्यासाठी पूर्ण दिवस खर्च होऊ शकतो. अशा वेळी आपले वाहन येथे आपण निर्धास्त ठेवू शकतो. सध्या येथे ‘फ्री पार्किंग’ आहे. मात्र, ठेकेदार नियुक्त होताच पार्किंगचे दर आकारण्यात येतील.

 

रेल्वेस्थानक, मार्केट, मॉल, चित्रपटगृहे आणि कॉर्पोरेट कार्यालये ही मुंबईतील हमखास गर्दीची ठिकाणे. तेथे उच्च वर्ग आणि मध्यमवर्गीय माणूस सारख्याच हक्काने वावरतात. रेल्वेचे प्रवासी दुचाकी घेवून स्थानकापर्यंत येतात. त्यांना दुचाकी पार्क करण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या आसपास पार्किंग सेंटर असणे आवश्यक आहे. तेथे सुविधा नसेल तर ते खासगी पार्किंगचा आधार घेतात. तीही सुविधा नसेल, तर कोपर्‍यात कोठे जागा मिळेल तेथे दुचाकी उभी करतात. नंतर ती जागा त्यांच्या हक्काचीच होऊन जाते. मार्केटमध्ये सहकुटुंब येणार्‍यांकडे शक्यतो चारचाकीच असते. बाजारहाटासाठी उतरल्यानंतर फिरता फिरता दीड-दोन तास सहज जातात. मार्केटच्या ठिकाणी पार्किंग सुविधा नसेल, तर बाजारहाट होईपर्यंत गाडी रस्त्यात उभी करायची झाली तर वाहतूककोंडी हमखास होतेच.

 

साहजिकच वाहतूक पोलीस ती गाडी टोईंग करून घेऊन जाणार. बाजारहाट करून आल्यानंतर गाडी जागेवर नसेल तर सहकुटुंब फिरल्याचा आनंद क्षणार्धात मावळून जातो आणि तडजोड रक्कम भरण्यासाठी वाहतूक पोलीस चौकी गाठावी लागते. मॉल, चित्रपटगृहात शिरल्यानंतरही पार्किंग सुविधा नसेल, तर गाडी टोईंग करून नेणार याचीच धाकधूक जास्त असते. हा सारा ताप टाळण्यासाठी पार्किंग सुविधा हा एकच उपाय आहे. मात्र, जवळपास जागा नसेल तर स्थानकापासून काही अंतरावर ही सुविधा उपलब्ध केली जाते. त्याचा सर्वच फायदा घेतात असे नाही, पण त्या सुविधेचा लाभ घेणे आवश्यक आहे.

 

पार्किंगसाठी जागा नसतानाही वाहन बाळगणारे रस्त्यात कुठेही वाहन उभे करतात आणि वाहतूककोंडीला आमंत्रण देतात. दंडात्मक कारवाईमुळे त्यांना शिस्त तरी लागेल. बेकायदा पार्किंगला दंड केला हे उत्तम झाले. त्यामुळे दंड रकमेच्या भीतापोटी वाहन चालक-मालकांच्या अंगात थोडी शिस्त तरी येईल.

- सुभाष पटेल, व्यावसायिक, दहिसर

 

पार्किंग सेंटर ही चांगली सुविधा आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. बेकायदा पार्किंगला दंडात्मक शासन योग्य आहे. त्यामुळे कुठेही गाड्या उभ्या करून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्‍यांना धडा मिळेल आणि वाहतूकही सुरळीत होईल.

- तेजस मोरे, व्यावसायिक, बोरिवली

 
 
Powered By Sangraha 9.0