मेट्रो होणार स्वयंचलित : वर्षभरात येणार चालकरहित गाड्या

    दिनांक  01-Aug-2019मुंबई मेट्रो प्रकल्पांकरिता सहा डब्यांची पहिली मेट्रो रेल्वे गाडी जुलै, २०२० पर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईतील तीन मेट्रो प्रकल्पांकरिता मेट्रोचे डबे बनविण्याच्या पहिल्या वेल्डिंग कामाला नुकतीच बंगळुरू येथे सुरुवात करण्यात आली. या कामाची पाहणी 'मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण' (एमएमआरडीए) आणि 'गृहनिर्माण व शहरी कामकाज विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी केली. या कामाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ६३ मेट्रो रेल्वे गाड्या बनविण्यात येणार आहेत.
 

 

शहरात सध्या मेट्रो मार्गिकांचे जाळे विणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतातील पहिल्या पूर्णत: भुयारी मार्गिका असलेल्या 'मेट्रो-३'चे काम वेगाने सुरू आहे. तर 'एमएमआरडीए' अंतर्गत 'दहिसर ते डी.एन.नगर' (मेट्रो २ अ), 'डी.एन.नगर ते मंडाले' (मेट्रो २ ब), 'वडाळा-घाटकोपर-कासारवडवली' ( मेट्रो ४) आणि 'दहिसर (पू) ते अंधेरी (पू)' (मेट्रो ७) या मेट्रो मार्गिकांचे काम सुरू आहे. यामधील 'मेट्रो ७' मार्गिकेचे बांधकाम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता मेट्रो गाड्यांच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. 'एमएमआरडीए' यासंबंधीचा करार 'मे.बी.ई.एम.एल' या कंपनीशी केला आहे. 

 

हा करार ३०१५ कोटी रुपयांचा आहे. मुंबई मेट्रोकरिता ट्रेन बनविण्याच्या कामाला कंपनीने नुकतीच बंगळुरू येथील कार्यशाळेत सुरुवात केली. या कामाची पाहणी 'एमएमआरडीए'चे आयुक्त आर.ए.राजीव, 'गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालया'चे सचिव दुर्गा मिश्रा आणि 'दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळा'चे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंग यांनी केली. या कामाअंतर्गत ६ डब्यांच्या ६३ रेल्वे गाड्या बनविण्यात येणार असून सप्टेंबर, २०१९ पर्यंत डब्याचा नमुना तयार होणार आहे. पहिली मेट्रो रेल्वे जुलै, २०२० मध्ये मुंबईत दाखल होईल.
 

 

या ६३ गाड्यांशिवाय प्राधिकरणाने अतिरिक्त मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण लक्षात घेऊन आणखी २१ गाड्यांचे कंत्राट कंपनीला दिले आहे. मेट्रोचे डबे बनविण्याची ही भारतातील सर्वात मोठी मागणी आहे. 'एमएमआरडीए'ने अद्यावत मेट्रो रेल्वे गाड्यांची मागणी केली आहे.

 

स्वयंचलित गाड्या

मेट्रोचे डबे हलके आणि ऊर्जा वाचविणारे असतील. या गाड्या पूर्णपणे स्वयंचलित व चालकरहित आहेत. त्यामध्ये ३३४ प्रवाशांना बसण्याची आसनव्यवस्था असेल. एकूण २०९२ प्रवासी एका गाडीमधून प्रवास करू शकतील. डब्यामध्ये व्हीलचेअरसाठीही जागा उपलब्ध असेल, तर डब्यांबाहेर सीसीटीव्ही असतील. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोच्या चालकाशी संवाद साधता येईल. तशी यंत्रणा उपलब्ध असेल. प्लॅटफॉर्मवर स्क्रीन डोअर लावण्यात येतील.