अयोध्या रामजन्मभूमी प्रकरण : मध्यस्थ समितीचा अहवाल न्यायालयास सुपूर्द

01 Aug 2019 19:29:06


 


नवी दिल्ली : अयोध्या-रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ समितीने गुरूवारी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सुपूर्द केला. सीलबंद पाकिटातून हा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात आला. या अहवालानंतर या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ शुक्रवार, दि. २ रोजी पुढील सुनावणी घेऊन अहवालावरील कारवाईविषयी पुढील निर्णय घेणार आहे.

 
या मध्यस्थ समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एफ. एम. आय. खलीफुल्ला, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर, मद्रास उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पांचू यांचा समावेश आहे. मध्यस्थ समितीने आपला प्रगती अहवाल दि. १ ऑगस्टपर्यंत सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार, हा अहवाल न्यायालयाच्या घटनापीठापुढे सादर करण्यात आला.
 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील व न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. ए. नझीर आदी सदस्य असलेले घटनापीठ आता शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी घेणार आहे. यावेळी मध्यस्थ समितीच्या अहवालाबाबत करावयाची पुढील कारवाई निश्चित करण्यात येणार आहे.

Powered By Sangraha 9.0