मग 'त्या' धर्मस्थळांचे काय?

    दिनांक  01-Aug-2019   


 


जर खरेच मुस्लिमेतर धर्मीयांबद्दल पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपुलकी आहे, तर त्यांच्यावर होणार्‍या अन्याय-अत्याचारांचे काय? हजारोंच्या संख्येने अजूनही बंद पडून असलेल्या मंदिर आणि गुरुद्वारांचे काय?
 


पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत राहिला. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे आम्ही कशी काटकसर करून अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासात राहणार असल्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी व्हावे, इथपर्यंतच्या घडामोडी जगभरातील राजकारणाचा चर्चेचा विषय ठरला. साहजिकच यात दहशतवादाचाही मुद्दा आला आणि त्यावर काश्मीर, लादेन आणि इतर मुद्द्यांवर दिलेली इमरान खान सरकार स्थापन होण्यापूर्वीची पाकिस्तानातील सरकारे या सगळ्याला कशी पोषक होती याचे दाखले देत, 'आम्ही मात्र याहून नामानिराळे आहोत आणि नव्या पाकिस्तानचे पंतप्रधान,' असे भासवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला. आत्ताही पाकिस्तानात तसेच काहीसे होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

मुद्दा आहे पाकिस्तानातील सियालकोट भागात फाळणीनंतर सुरू केलेल्या हिंदू मंदिराचा. दिवंगत लेखक आणि इतिहासकार रशीद नियाज यांनी त्यांच्या 'हिस्ट्री ऑफ सियालकोट' या पुस्तकात उल्लेख केल्यानुसार, हे मंदिर हजार वर्षे जुने आहे. लाहोरपासून शंभर किमी दूर असलेल्या धारोवाल या भागातील हिंदूंची संख्या लक्षात घेत या मंदिराचे दरवाजे उघडल्याचे 'इवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड'चे म्हणणे आहे. फाळणीनंतर या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते. मंदिर खुले झाल्यानंतर या ठिकाणी आता विधीवत पूजाही करण्यात आली आहे.

 

या प्रकारानंतर आम्ही हिंदू धर्मीयांसाठी कसे हितकारक निर्णय घेतले, याचा प्रचार प्रसार पाकिस्तान भारतासह जगासमोर करत आहे. त्यातच, पाकिस्तानातील हिंदूंचे बळजबरीने होत असलेले धर्मपरिवर्तनही इस्लामविरोधी असल्याचा उल्लेख इमरान खान यांनी केला. पाकिस्तान मुस्लीमेतर समाजाला संरक्षण मिळावे, यादृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत, अशी शपथही त्यांनी घेतली. कोणत्याही भेदभावाशिवाय पाकिस्तानात हिंदू, शीख आणि इतर धर्मीय लोक सुरक्षित वावर करू शकतात, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला आहे. त्याचबरोबर देशातील इतर धार्मिक स्थळांना विकसित करणार असल्याचेही म्हटले. आमचा नवा पाकिस्तान, मजबूत पाकिस्तान असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

सध्या खुले मंदिर परिसर भागात तब्बल दीडशे हिंदू कुटुंबे राहतात. मंदिर खुले झाले, याचे श्रेय जरी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि 'इवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड' घेत असेल, तरीही यामागे त्या दीडशे हिंदू कुटुंबीयांचा लढाही तितका मोठा आहे. इथल्या हिंदूधर्मीयांच्या आग्रहामुळे आता या जागेच्या विकासासाठी निधीही मंजूर केला जाणार आहे. या लढाईला यश मिळाल्याने इथल्या समाजाच्या चेहर्‍यावर एक आनंदही आहे. मंदिरात अनेक देवी-देवतांच्या पुरातन मूर्ती आहेत. एक हजार वर्षे जुने मंदिर सरदार तेजा सिंह यांनी बांधल्याची नोंद आहे. मंदिराच्या भिंतींवर बारीक नक्षीकामही आहे. हे मंदिर जर पुरातन असेल, तर त्याचा देखभाल आणि एक पुरातन वास्तू म्हणून यापूर्वीच व्हायला हवा होता. त्यापेक्षा पाकिस्तान सरकारने १९४७ साली त्याला टाळे ठोकले.

 

१९९२ मध्ये या मंदिरात हिंदूंना प्रवेशबंदीही करण्यात आली होती. आता अचानक इमरान खान यांचा नवा पाकिस्तान इतका पुरोगामीवादी कसा झाला? एक मंदिर खुले करून जगाला पाकिस्तान सरकार काय संदेश देऊ इच्छित आहे? फाळणीनंतर आजवर अनेक गुरुद्वारे बंद अवस्थेत आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठीही कुणी नाही. जिथे अशी पुरातन मंदिरे होती, त्या ठिकाणी वाणिज्य संकुले उभारण्यात आली आहेत. 'इवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड'कडे अशा धार्मिक स्थळांची जबाबदारी असते. पाकिस्तानात जेव्हा हे बोर्ड स्थापन झाले, त्यावेळी एकूण १ हजार, १३० मंदिरे आणि ५१७ गुरुद्वारा आहेत. त्यातील ३० मंदिरे आणि १७ गुरुद्वारे खुले झाल्याची अधिकृत आकडेवारी बोर्डाकडे आहे.

 

मात्र, इतर दीड हजार धार्मिक स्थळांबद्दल काय? प्रत्येक मंदिर खुले करण्यासाठी तिथल्या हिंदूंना वारंवार सरकारकडे आर्जव करावे लागणार का? पाकिस्तानातील संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी खासदार रमेश वांकवानी यांनी 'इवेक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड'वर हिंदू अध्यक्ष असावा, अशी मागणी केली आहे. या सार्‍या गोष्टींचा सारासार विचार केल्यास हे हिंदूप्रेम आणि पुरोगामित्व केवळ दिखावा आहे का, असा प्रश्न पडतो. जर खरेच मुस्लिमेतर धर्मीयांबद्दल पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपुलकी आहे, तर त्यांच्यावर होणार्‍या अन्याय-अत्याचारांचे काय? हजारोंच्या संख्येने अजूनही बंद पडून असलेल्या मंदिर आणि गुरुद्वारांचे काय?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat