राधेयचा मृत्यू- भाग १

    दिनांक  01-Aug-2019


अर्जुनाच्या बाणांच्या अविरत वर्षावाने राधेय खूप संतापला. राधेयच्या रथाभोवतीचे संरक्षक या बाणांमुळे सैरावैरा पळू लागले. त्यामुळे राधेय एकटा पडला. दुर्योधनही या पळपुट्या सैनिकांवर संतापला. त्यांनी पुन्हा रणांगणात आघाडीवर यावे म्हणून दुर्योधनानेशर्थ केली. परंतु, सगळेच भीतीने गारठले होते. शेवटी राधेयने अर्जुनावर एक दिव्य अस्त्र सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने महाभयंकर असे ‘नाग’ अस्त्र निवडले. हे अस्त्र म्हणजे त्याच्याकडील एक अनमोल ठेवा होता. क्षणभर त्याला वासवी शक्तीची आठवणही आली, जी त्याला घटोत्कचावर वापरावी लागली. या क्षणी जर वासवी शक्ती हाती असती, तर अर्जुनाचा वध निश्चित होता. आता त्याला पश्चाताप करण्यास पण फुरसत नव्हती. ती शक्ती इंद्राकडे परत गेली होती. त्याने ‘नाग’ अस्त्राचा नेम अर्जुनाच्या मानेवर ठेवून ते अस्त्र सोडले. शल्य म्हणाला, “अर्जुनाच्या छातीवर नेम धर.” परंतु, त्याने ऐकले नाही. एकदा धरलेला नेम कुशल योद्धे बदलत नाहीत. त्या अस्त्राच्या तेजाने सारा आसमंत दीपून गेला. विजेप्रमाणे लखलखत आणि आगीचे लोळ ओकत ते अस्त्र अर्जुनाकडे झेपावले. सारेजण श्वास रोखून पाहत होते. पांडवांनाही क्षणभर वाटले की, आता अर्जुन काही वाचत नाही.

इतक्यात अर्जुनाचा सारथी श्रीकृष्णाने रथाचा वेग वाढवला आणि घोड्यांना गुडघ्यावर वाकून बसविले. त्यामुळे अर्जुनाचा रथ पुढून झुकला व राधेयने धरलेला नेम हुकला. अर्जुनाच्या मानेऐवजी ते अस्त्र त्याच्या मुकुटावरती येऊन आदळले व तो सुंदर मुकुट भूमीवर पडला. हा मुकुट अर्जुनाच्या मस्तकी स्वतः इंद्राने ठेवला होता. तो स्वर्गातील कारागिरांनी त्याच्यासाठीच खास बनवला होता. त्या मुकुटावर एक हजार रत्ने जडविली होती. या मुकुटामुळे अर्जुनाला ‘किरीटी’ असे नामाभिधान मिळाले होते. ‘नाग’ अस्त्राचा आघात होऊन हा मुकुट जमिनीवर पडला.

एकदम हृदय दुभंगून जाईल एवढा सुस्कारा राधेयने सोडला. आता अर्जुनाला ठार करण्यासाठी आपल्याकडे एकही दिव्य अस्त्र उरलेले नाही, हे त्याला प्रकर्षाने जाणवले. कृष्णाच्या युक्तीमुळे हा नेम हुकला होता. अर्जुनाचा वध करून या जगावरती राज्य करण्याचे दुर्योधनाचे स्वप्न आता धुळीला मिळाले होते. राधेयच्या मनात क्रोध आणि निराशा दोन्ही भाव दाटून आले व डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. सारे अंधुक झाले.

त्याने डोळे पुसले व पुन्हा लढण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी अर्जुनाचा मुकुट पडला होता, त्या जमिनीतून एक भयंकर विषारी नाग बाहेर येत होता. राधेयला तो दिसला. तो नाग राधेयकडे येऊन म्हणाला,“ माझ्याकडे पाहून एकदा ‘नाग’ अस्त्र तू अर्जुनावरती सोड. कारण, मला अर्जुनाचा बदला घ्यायचा आहे. माझे नाव अश्वसेन. खांडव वन जाळून खाक केले, तेव्हा या अर्जुनाने माझ्या मातेचाही वध केला होता. त्याचे दुःख मी या हृदयात साठवून ठेवले आहे. मला त्याचा प्रतिशोध घ्यायचा आहे. म्हणून मी तुझ्या नकळत या अस्त्रात प्रवेश केला होता. तू पुन्हा एकदा ते अस्त्र सोड व मला मदत कर.” हे ऐकून राधेय त्या नागावरच संतापला व म्हणाला,“मला तुझी लुडबूड नको आहे. आपल्या शत्रूचा वध करण्यासाठी मला तुझी मदत नको. मी इतका असाहाय्य कधीच नव्हतो व होणारही नाही. त्यापेक्षा मी मरण पत्करेन. इथे प्रवेश करून तू एक प्रकारे माझा अपमानच केला आहेस. दूर हो!” हे ऐकून अश्वसेन नाग पण संतप्त झाला. त्याने ठरविले की, आपण एकट्याने जाऊन अर्जुनाला ठार करावे. तो अर्जुनाच्या दिशेने निघालेला कृष्णाने पाहिला. कृष्णाने अर्जुनाला सावध करून सांगितले,“अर्जुना, हा सर्प तुला ठार करण्यासाठी येतो आहे. तू त्याला अगोदरच ठार मार.” अर्जुनाने विचारले,“हा मध्येच कोणीही न बोलवता कसा आला?” तेव्हा कृष्णाने त्याला सारा इतिहास सांगितला. शेवटी त्या नागाने हवेत आपले शरीर पसरून अर्जुनावर हल्ला केला आणि अर्जुनाने सहा बाण त्याच्यावरती सोडून त्याला ठार केले. मग अर्जुन व राधेय यांचे द्वंद्वयुद्ध पुन्हा सुरू झाले. दोघेही एकमेकांच्या बाणांनी विद्ध झाले होते. जखमांतून खूप रक्त वाहत होते. शल्य व कृष्ण या सारथ्यांनाही खूप जखमा झाल्या. परंतु, कोणीही तमा बाळगली नाही व युद्ध सुरूच ठेवले. (क्रमश:)


९८२१९६४०१४
सुरेश कुळकर्णी
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat