अण्णा भाऊ कम्युनिस्ट नव्हते!

    दिनांक  01-Aug-2019


 


अण्णा भाऊ कम्युनिस्टच होते,’ असे सांगण्याची धडपड काही लोक सातत्याने करताना दिसतात. हेतू हाच की, अण्णा भाऊंना मानणाऱ्या समाजाने ‘लाल बावटा’ हातात घ्यावा. अण्णा खरोखरच कम्युनिस्ट होते का? त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर उत्तर स्पष्ट येते की, ते कम्युनिस्टांसोबत होते, पण ते कधीही कम्युनिस्ट नव्हते.

 

मुंबईमध्ये काँग्रेसचे आंदोलन, कम्युनिस्टांची कामगार चळवळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू होती. डॉ. आंबेडकरांची चळवळ दलितवस्ती, झोपडपट्टी व कामगार वस्तीमध्ये जोरात वाढत होती. त्यांच्या सभेमध्ये भाषणापूर्वी जलसा प्रेरणादायी गीतचळवळी गीताचे कार्यक्रम होत व या कार्यक्रमाला जनता मोठ्या प्रमाणावर येत असत. यावर कशा प्रकारे मात करावी, या शोधात कम्युनिस्ट चळवळ असतानाच त्यांना ‘अण्णा भाऊ साठे’ नावाचा हिरा गवसला. कम्युनिस्टांनी आपली चळवळ दलितवस्ती, झोपडपट्टी व कामगार वस्तीमध्ये वाढविण्यासाठी अण्णा भाऊंचा पुरेपूर वापर करून घेतला. असंघटित, निरक्षर, पिचलेल्या, हरलेल्या श्रमिकांमध्ये भाषणे कमी चालायची आणि अण्णा भाऊंची गाणी अधिक चालायची. अण्णांची त्यावेळी एक गंमतीने ‘माटुंगा लेबर कॅम्प’मध्ये वाढलेल्या ‘मच्छरां’वर एक पोवाडा लिहिला. त्याविषयी अर्जुन डांगळे पहिले अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, कोल्हापूर (30, 31 मे, 2008)च्या अध्यक्षीय भाषणात म्हणतात किंवा ‘मच्छरां’वरील पोवाडा ऐकून कॉ. हरी जाधव व कॉ. शंकर पगारे यांनी तो पोवाडा अन्य कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना ऐकवला. त्यांनी अण्णा भाऊंच्या शब्दावरील सामर्थ्य हेरले आणि अण्णा भाऊंना लिहिते करण्यासाठी लाल बावट्याची खोली. यात पोस्टर्सच्या ढिगाऱ्यावर बसून किंवा झोपून मेणबत्तीच्या प्रकाशात अण्णा भाऊंची लिहिण्याची सोय करण्यात आली होती. अण्णांचा मूळचा पिंड हा भारतीय संस्कृती व परंपरा मानणाराच होता. अण्णा म्हणत की, मला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे. व्होल्गासारखे लाल नव्हे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे.

 

त्यावेळेपासूनच कम्युनिस्ट चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होती. अशातच 1952 ची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये कम्युनिस्टांनी आपले खरे दात दाखविले. त्यांनी संविधानकर्त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेबाहेर ठेवण्याचे षड्यंत्र तडीस नेले. तेव्हा कॉ. डांगे म्हणाले की,“ आपली मते कुजवा, पण आंबेडकरांना देऊ नका.” कम्युनिस्ट पार्टीच्या अशा विविध कृतींमुळे त्यापासून दूर जाणाऱ्या अण्णा भाऊंच्या मनात हळूहळू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा आदर क्रमाक्रमाने वाढू लागला.

 

जग बदल घालुनी घाव

मला सांगुन गेले भीमराव

 

असे म्हणून ते थांबले नाहीत. त्यांनी 1959 साली ‘फकिरा’ ही त्यांची मराठी साहित्य विश्वातील एक मौलिक कलाकृती. त्यांच्या मते, प्रतिभेची सर्वश्रेष्ठ सर्जना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. कार्लमार्क्स यांना नव्हे. तोपर्यंत कम्युनिस्टांच्या फोल विचारांची जाणीव अण्णांना झाली होती. त्यातच ‘फकिरा’ कादंबरीवर जेव्हा चित्रपट निर्माण झाला तेव्हा त्यांच्या सोबत असणाऱ्या कम्युनिस्ट कार्यकत्यांनी त्यांची आर्थिक फसवणूक केली. इतकेच काय कम्युनिस्टांनी अण्णांच्या पडत्या काळात त्यांना साथ देणे तर दूरच उलट त्यांच्या संसार मोडण्याचे काम केले. 1967च्या या कम्युनिस्टी कला पथकात अण्णांना सहभागी व्हायचे नव्हते. तसे त्यांनी आपली पत्नी व मुलगी यांनाही सूचना केली होती. परंतु, कम्युनिस्ट कार्यकर्ते आणि कॉ. डांगे यांनी अण्णांचे म्हणणे न जुमानता, त्यांच्या पत्नीला आणि मुलीला फूस लावून कलापथकामध्ये घेऊन गेले. यावरून अण्णांचे आणि त्यांच्या पत्नीचे भांडण झाले. यावर अण्णांच्या पत्नीने कॉ.डांगे यांनी दिलेली चिठ्ठी अण्णांना दिली. त्यानंतर तिने घर सोडले, अण्णांना सोडले. कारण, त्या बाईला बाकी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी सांगितले की, “तुम्ही अण्णांना बिलकूल भिण्याचे कारण नाही. आमच्या पुढे अण्णा काही करणार नाही.” परंतु, याचा परिणाम अण्णांच्या मनावर झाला. शेवटी हे कम्युनिस्टांचे कलापथक व कॉ. डांगे यांची चिठ्ठी हे अण्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.

 

अण्णा भाऊंनी जीवंतपणे कम्युनिस्टांचे कलापथक सोडले होते. परंतु, कम्युनिस्ट मात्र त्यांना सोडण्यास तयार नाहीत. गोचिड तर जीवंत प्राण्याचे रक्त पिते. परंतु, कम्युनिस्ट अजूनही अण्णा भाऊंचे त्यांच्या विचाराचे शोषण करीत जगत आहेत. गेली दहा वर्षे तुकाराम (अण्णा) भाऊ साठे यांचे कॉ. अण्णा भाऊ साठे म्हणून संमेलन भरवली जात आहेत. याचाच एकभाग म्हणून त्यांनी श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर प्रकाशनातर्फे मे 2010 ला ‘फकिरा’ कादंबरी प्रकाशित केली. यामध्ये 21 मे, 2010 रोजी निवेदन म्हणून कॉ. गोविंदराव पानसरे यांचे दोन पानी निवेदन छापले आहे. परंतु, ही कादंबरी अण्णा भाऊंनी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली आहे. त्या दोन ओळी जाणून बुजून काढण्याची दक्षता मात्र घेण्यात आली आहे. त्यामुळे अण्णा भाऊंच्या मृत्यूस जबाबदार असणारी कम्युनिस्ट मंडळी आता आपल्या स्वार्थासाठी शहरी नक्षलवाद म्हणून शहरातील दलितांचे डोके फिरवण्याचे कृत्य करीत आहेत. त्यासाठी अण्णा भाऊंचे हे मारेकरी आज अण्णा भाऊंचे साहित्य विकृत पद्धतीने प्रकाशित करीत आहेत. सभा-संमेलन घेत आहेत. जीवनाच्या एका टप्प्यावर अण्णा भाऊंनी स्टॅलिनचा पोवाडा लिहिला आहे किंवा रशियाचा प्रवास केला आहे. त्यामुळे ते कम्युनिस्टच होते असे म्हणणे म्हणजे कम्युनिस्टांचा स्वार्थी संधिसाधूपणा आहे. कारण, अण्णा भाऊंचे जीवन किंवा साहित्यनिर्मिती ही अस्सल भारतीय मातीतल्या भारतीय संस्कृतीचा वसा घेतलेली आहे. कम्युनिस्ट परंपरेचा प्रवाह ना अण्णांच्या जीवनात होता, ना साहित्यात. त्यामुळे अण्णा कम्युनिस्ट होते असे म्हणणे कम्युनिस्टांच्या खोटारडेपणाचा कळस आहे. अण्णा भाऊंना जे निर्मळ गंगेसारखे साहित्य हवे होते, ते राष्ट्रप्रेमी धर्मतत्त्वाचा प्रेरक प्रवाह निरंतर चालू ठेवणे, त्यातून समाजाला देशाला एकसंध ठेवणे आणि हीच अण्णा भाऊंना वंदना ठरेल...!

 

- विजय इंगळे

8655690786