अण्णा भाऊंच्या साहित्यातील समाजदर्शन

    दिनांक  01-Aug-2019माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय, समूहाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे.हे अण्णा भाऊ जाणतात आणि माणसाला केंद्रस्थानी लिखाण करताना त्यांच्या आसपासच्या सर्व गोष्टींची नोंद अण्णा भाऊ घेताना दिसतात. त्यामुळे विविध समाजगटाचे दर्शन अण्णा भाऊंच्या साहित्यात होते.

 

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊंचे साहित्य बहुरंगी आणि बहुढंगी आहे. ज्या काळात अण्णा भाऊंचे साहित्य प्रकाशित होऊ लागले, त्याकाळात पुण्या-मुंबईच्या प्रस्थापित साहित्यिकांचे अधिराज्य मराठी साहित्य विश्वावर होते. खांडेकर, फडके यांच्या कथा-कादंबऱ्या गाजत होत्या. त्याकाळात एक वेगळे वास्तवातील जग अण्णा भाऊंनी मराठी साहित्याच्या प्रांगणात अवतीर्ण केले आणि या वास्तववादी साहित्याने शहरी वाचकांना, समीक्षकांना धक्के दिले. मराठी साहित्य विश्वात अपवादाने दिसणारे जग अण्णा भाऊंच्या साहित्यात विपुल प्रमाणात दिसू लागले. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्याबद्दल म्हटले आहे, “मी कल्पनेच्या जगात वावरत नाही, माझी माणसं वास्तवातील आहेत. त्यांना कधीना कधी मी भेटलो आहे.” आपल्या साहित्यातून वास्तवातील जग आणि माणसं अण्णा भाऊंनी उभी केली. एका अर्थाने अण्णा भाऊंचे साहित्य हे माणसाला केंद्र मानून प्रकट होणारे साहित्य आहे. अण्णा भाऊंच्या साहित्याचा आत्मा ‘माणूस’ असल्यामुळे मानवी जीवनातील चढ-उतार, गुण-दोष, राग-लोभ, प्रेम-ईर्षा अशा साऱ्याच गोष्टी विपुल प्रमाणात दिसून येतात. असे असले तरी अण्णा भाऊ हे केवळ ‘माणूस’ या एककाला केंद्र करून लिखाण करत नाहीत.

 

अण्णा भाऊंच्या साहित्यातील ‘माणूस’ हा संघर्षशील आहे. पण संघर्ष हा त्यांच्या जगण्याचा अंतिम पर्याय नाही. खरंतर संघर्षरहित समाजजीवन हेच अण्णा भाऊंच्या लेखनाचे अंतिम ध्येय आहे आणि ते गाठण्यासाठी त्यांची माणसं शर्थीने प्रयत्न करताना दिसतात. अण्णा भाऊंचे साहित्य आणि त्यामागची भूमिका समजून घेण्यासाठी अण्णा भाऊंच्या एका वाक्याचे बोट धरून आपल्याला प्रवास करावा लागतो. अण्णा भाऊ लिहितात, ‘‘पुरुषाचा स्वाभिमान, स्त्रीचे शील आणि देशाचे स्वातंत्र्य यामध्ये तडजोड होऊ शकत नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा संविधानसभेत हीच भूमिका मांडली आहे. अण्णा भाऊंना कशाप्रकारचा समाज अपेक्षित होता, हे या वाक्यातून स्पष्ट होते आहे आणि या मूलभूत तत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या समग्र साहित्यावर पडलेले दिसते. समाजातील म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखं लयाला जावीत, माणसाला स्वाभिमानाने जगता यावे, माणूस म्हणून मिळालेले मूलभूत अधिकार त्याला उपभोगता यावेत, ही अण्णा भाऊंची तळमळ आहे. समाजजीवनात बदल व्हावा, ही त्यांची केवळ सदिच्छा नसून त्या दिशेने समाजाचे मार्गक्रमण व्हावे. यासाठीचे त्यांचे प्रयत्न आहेत. समाज हा नेहमीच बहुपेडी असतो. विविध जाती, जमातीच्या एकत्रिकरणातून आणि अदृश्य पण शाश्वत सूत्राच्या बंधनामुळे समाजाची निर्मिती होते. त्यामुळे समाज म्हणजे केवळ एक घटक लक्षात घेता येत नाही, ज्या ज्या गोष्टींमुळे ‘समाज’ ही संकल्पना साकार होते, ती विचारात घ्यावी लागते. किंबहुना, त्या सर्व घटकांचे परस्परातील व्यवहार हा सामाजिक व्यवहार म्हणून ओळखला जातो. अण्णा भाऊंच्या साहित्यात हा सर्व समाजव्यवहार मांडला गेला आहे. अण्णा भाऊंच्या साहित्यातील समाजदर्शन समजून घेताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, अण्णा भाऊंचे साहित्य हे एका जातीचे चित्रण करणारे, गुणगौरव करणारे साहित्य नाही, तर संपूर्ण समाजाला आपल्या कवेत घेऊन आईच्या ममतेने गुणदोष दाखवताना उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने पेरणारे साहित्य आहे.

 

अण्णा भाऊंच्या कथा-कादंबऱ्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असे लक्षात येते की, समाजातील एकही घटक असा नाही की, त्याला अण्णा भाऊंच्या साहित्यात स्थान नाही. डोंबारी, पारधी, गोसावी, माकडवाले, दरवेशी,वैदू, गारूडी, कोल्हाटी, वडार अशा भटक्या-विमुक्त समाजातील असंख्य व्यक्तिरेखा अण्णा भाऊंच्या साहित्यात येतात. भटकेपणाचा शाप भोगताना गावगाड्यांशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती आपसातील संघर्ष एकमेकांवर केलेल्या कुरघोडी याचे चित्रण अण्णा भाऊंनी समर्थपणे केले आहे. गावकुसाच्या बाहेरचे हे जग अण्णा भाऊंनी मांडताना माणूसपणावरचा विश्वास अधिक अधोरेखित केला आहे.स्वातंत्र्य, सन्मान, स्वाभिमान या मूल्यांना जपणारी आणि त्यासाठी जगणारी ही माणसं आहेतअण्णा भाऊंच्या साहित्यातून 12 बलुतेदार आणि गावगाडा चालवणारे प्रमुखही दिसतात. मांग, महार, चांभार, रामोशी, बेरड इ. उपेक्षितांबरोबरच कुंभार, न्हावी, साळी, सुतार, शिंपी, माळी, तेली, तांबोळी अशा बलुतेदारांच्या जगण्याचा पसारा अण्णा भाऊंनी शब्दातून साकार केला आहे. गावगाडा चालवणारे पाटील, कुलकर्णी, चौघुले यांचाही मानमरातब अण्णा भाऊंच्या साहित्यातून दिसून येतो. त्याचप्रमाणे महानगरी मुंबईत जगणारे कामगार, हमाल, भिकारी, झोपडपट्टी दादा, दगडखाणीत दगड फोडू न जगणारे लोक असे विविध प्रकारचे समाजगटही दिसतात. कोणतीही ओळख नसलेली आणि मरण येत नाही म्हणून जगणारी ही माणसं अण्णा भाऊंनी अनुभवली आणि त्यांना आपल्या साहित्यात स्थान दिले.

 

गावाच्या सन्मानासाठी मरण पत्करणारा राणोजी, मानलेल्या बहिणीला दिलेला शब्द खरा करण्यासाठी मरणारा सत्तू, क्रांतिकार्यात सहभागी झालेल्या पतीची पाठराखण करणारी मालन, ‘तू माझे शरीर जिंकू शकतोस, आत्मा, प्रेम नाही’ असा निग्रह व्यक्त करणारी वैजयंता, उपासमारी, दुष्काळाने हैराण झालेला मांगवाडा जगला पाहिजे, यासाठी मठ लुटण्याची परवानगी देणारा विष्णुपंत कुलकर्णी, निष्पाप प्रेम करणारा वसंत, स्वतःच्या शील रक्षणासाठी पेटून उठणारी दुर्गा, विज्ञानवादी भूमिका घेणारी मुरळी सीता, नातेवाईकांकडून पसवले गेल्यामुळे वेश्याव्यवसायात आलेली चित्रा अशा असंख्य व्यक्तिरेखा अण्णा भाऊंनी साकार केल्या आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या समाजगटाच्या प्रतिनिधी आहेत. तरीही त्या परस्परपूरक आहेत. समाजजीवनात दिसणारे वास्तव अत्यंत खुबीने अण्णा भाऊ साहित्यात साकार करतात. त्याचबरोबर समाजजीवनात जे अमंगल आहे, समाजविघातक आहे ते लयाला जाण्याचा ते मार्ग दाखवतात. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून जे समाजदर्शन चितारले आहे, त्याचा पट पाहिला की, अण्णा भाऊंच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा आणि समाजाविषयी असणाऱ्या कळवळ्याचा आपण अंदाज बांधू शकतो. हा समाज सुखी,समाधानी, समृद्ध व्हावा या भावनेने अण्णा भाऊ लिखाण करतात. त्यामुळे आपापसातील वैर, दुरावा, संशय, गैरसमज यापासून दूर राहिले तर आपले कसे भले होते, हे समाजमनावर ठसवण्याचा प्रयत्न असतो. अण्णा भाऊंच्या साहित्यातून दिसणारा संघर्ष हा परिवर्तनाची बीजे पेरणारा संघर्ष आहे. संघर्ष करून उच्छेद करण्याऐवजी नवनिर्मितीवर त्यांचा विश्वास आहे. समाजजीवनात अस्तित्वात असणाऱ्या रूढी-परंपरांचे मूल्यमापन करून जुन्या पण चांगल्या प्रथा जोपासल्या पाहिजेत, असा अण्णा भाऊंचा आग्रह आहे. समाज जाती-जातीत न विभागता एकसंघ असावा आणि समाजावर येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून सामना करावा, अशी भूमिका घेत अण्णा भाऊंनी लिखाण केले आहे.

 

अण्णा भाऊंच्या साहित्यातून ज्या समाजाचे दर्शन होते तो समाज, ती माणसं येथील मातीतील आहेत. त्यांनी या मातीतील संस्कार आणि जीवनमूल्य सोबत घेऊन परिस्थितीशी झगडा मांडला आहेअण्णा भाऊंच्या साहित्यातून दिसणाऱ्या समाजदर्शनाचे एका वाक्यात वर्णन करायचे, तर असे म्हणता येईल की, ‘समाजजीवनाचा प्रत्यय देणारे सप्तरंगी इंद्रधनू म्हणजे अण्णा भाऊंचे साहित्य होय.’

 

- रवींद्र गोळे

9594961860