समाजपुरुषाला विनम्र अभिवादन

    दिनांक  01-Aug-2019
समाजपुरुष लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने त्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला वंदन. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आज अभिमानाने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. महामंडळावर अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अण्णा भाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाचे हित साधायचे आहे. आज महामंडळापुढे अनेक प्रश्न असले तरी त्या प्रश्नांचा मागोवा घेताना मला एकटे वाटत नाही. कारण, महामंडळासोबत माझ्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अपूर्व नेतृत्व आहे. तसेच मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य आहे. यामुळे महामंडळाचे काम करताना समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास साधणे नक्कीच शक्य होणार आहे.

 

आज महामंडळाचे काम समाजाभिमुख होण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करायच्या आहेत. महामंडळाची कर्जवाटप योजना आहे. मात्र, या योजनेची कार्यवाही होण्यासाठीही मुख्य बँकांकडून सहकार्य हवे असते. त्यानुसार सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रमुखांशी संपर्क, चर्चा करायची. महामंडळाचा अध्यक्ष म्हणून या बँकांशी समन्वय साधत समाजाच्या गरजूंना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यायची, हे महामंडळाने लक्ष ठरवले आहे. बँकांशी चर्चा करून मी त्यांच्याकडून एक वर्ष मागेन. या एका वर्षाच्या कालावधीत ज्या गरजूंना अर्थसाहाय्य दिले जाईल, त्यांच्याकडून निश्चितपणे परतफेड केली जाईल. त्यासाठी विशेष लक्ष देणार आहे. मुळात सगळ्या कारभारामध्ये पारदर्शकता आणून सगळे व्यवहार हे समाजाच्या भल्यासाठी होतील, अशा प्रकारचे काम मला करायचे आहे.

 

याआधी मातंग आणि तत्सम १२ पोटजातीच्या विद्यार्थ्यांना एमपीएससीचे शिक्षण घ्यायचे असेल, तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र’ अर्थात ‘बार्टी’कडूनच आर्थिक साहाय्य मिळत असे. सर्वानुमते, मी पहिल्यांदा निर्णय घेतला की, मातंग आणि तत्सम १२ पोटजातीतील एमपीएससी परीक्षा देणार्‍या ५० विद्यार्थ्यांना अण्णा भाऊ साठे महामंडळाकडून अर्थसाहाय्य करण्यात येईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामंडळातर्फे समाजासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण तर असेलच, पण त्यासोबतच व्यक्तीचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल, याचेही प्रशिक्षण दिले जाईल. काही वर्षांपूर्वी मंडळातर्फे महिलांसाठीसुद्धा योजना होत्या. पण त्या बंद झाल्या. आता पुन्हा माताभगिनींच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उत्थानाकरिता महामंडळातर्फे योजना कार्यान्वित करणार आहे.

 

लोकशाहीर अण्णा भाऊ म्हणाले होते की, "ही पृथ्वी दलितांच्या श्रमावर तरली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक शोषित वंचित गटाला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्थैर्य मिळवून देणे यासाठी अध्यक्ष म्हणूनच नाही तर समाजाचा तरुण घटक म्हणून मी कटिबद्ध आहे.


"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला, त्या निमित्ताने मला अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. मी आपल्या समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी निःस्वार्थीपणे अहोरात्र काम करणार आहे. अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ व माझ्याशी जोडले जाण्यासाठी कृपया https://wa.me/919119445533?text=Hi वर आपले नाव, पत्ता व्हॉट्सअ‍ॅप करा. कृपया हे निवेदन आपल्या समाजबांधवांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा.

आपला नम्र,

अमित गोरखे