लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

01 Aug 2019 12:25:33



अण्णा भाऊंच्या शाहिरीचा बाज हा माणसाच्या जगण्याचा विषय होता. हा विषय धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणिवेचा जागर होता. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या नावापुढे आपोआपच ‘लोकशाहीर’ ही उपाधी लागली.

समाजावर होत असलेला अन्याय, अमानुष पिळवणूक, गिरणी कामगारांच्या हाल-अपेष्टा, ससेहोलपट हे सर्व अण्णा भाऊंनी जवळून पाहीलं होतं. स्वत: ते भोगलं होतं आणि तेच त्यांच्या दैवी प्रतिभेतून त्यांच्या लेखणीतून शाहिरीच्या रुपाने उतरत होतं. जसे फाळणीच्या वेळी पंजाबमध्ये उसळलेल्या जातीय दंग्यावर रचलेल्या पोवाड्यात ते म्हणतात,

माणुसकी पळाली पार...

होऊनी बेजार पंजाबातून

सुडाची नशा चढून,

लोक पशुहून बनले हैवान...

पुढे अत्यंत मार्मिक शब्दांत अण्णा भाऊ लोकांना आव्हान करतात की,

द्या फेकून जातीयतेला,

करा बंद रक्तपाताला,

आवरुनी हात आपुला

 

वैचारिक आणि सामाजिक बांधीलकी अण्णा भाऊंच्या शाहिरीतून पावलो पावली जाणवते. अण्णा भाऊ हे केवळ बंद खोलीत शाहिरी लिहिणारे शाहीर नव्हते, तर लोकांचे कष्ट, त्यांचा संघर्ष, त्यांची जीवन जगण्याची धडपड हे सर्व त्यांच्यात राहून त्यांच्याच सारखे जगत शाहिरी करणारे लोकशाहीर होते आणि म्हणूनच त्यांची प्रत्येक शाहिरी जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एकही सभा अशी नसेल की, जिथे अण्णा भाऊंची शाहिरी खणखणली नाही, डफली वाजली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या या चळवळीत अण्णा भाऊंच्या शाहिरीचे महत्त्व कालातीत आहे. म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होत असताना

 

माझी मैना गावाकडं राहिली

माझ्या जीवाची व्हतीया काहिली

 

या लोकप्रिय लावणीचा जन्म झाला. आपली तरुण सुंदर पत्नी गावाकडे राहिल्याने तिच्या विरहात जळणारा तिचा पती म्हणजे जणू मुंबई महाराष्ट्राला दूरावणार म्हणून महाराष्ट्रच आपली व्यथा मांडत आहे, असं लोकांना जाणवावे आणि मग त्या विरहाच्या तीव्र भावनेने लोक पेटून उठावे ही ताकद या लावणीमध्ये होती, अजूनही आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शिलेदारांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अण्णा भाऊंनी रक्ताचे पाणी केले. आपल्या पहाडी आवाजाच्या बुलंद शाहिरीतून आणि कलापथकांच्या माध्यमातून या क्रांतिकारी लोकशाहिराने आपला आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पेरला.

 

महाराष्ट्र राज्यनिर्मितीत या शाहीर मंडळींचा बहुमोल असा वाटा आहे, हे आपण विसरता नये. शाहिरीच्या जोडीला तमाशातील, अकलेची गोष्ट, निवडणुकीतील घोटाळे, बेकायदेशीर, माझी मुंबई, शेठजींचे इलेक्शन असे कितीतरी वग धावून आले आणि म्हणूनच सरकारने तमाशावर बंदी आणली. आणि तेव्हा या समाजप्रबोधनाच्या प्रभावी साधनाला अण्णा भाऊंनी आपल्या कल्पकतेने आणखी प्रभावी बनवत, त्याचे रूप बदलून त्याला लोकनाट्याचे रूप दिले आणि तमाशाला पारंपरिक शृंगारीक जोखडातून बाहेर काढत, त्याला लोकप्रबोधनाची झुल चढवली, गणेश वंदनेच्या जागी रयतेचे राजे छत्रपती शिवराय आणि समाजपुरुषांना वंदन करून लोकनाट्याची सुरुवात व्हायला लागली, हा त्यावेळेचा खूप मोठा क्रांतिकारी बदल ठरला होता.

 

लोकांनी हा बदल डोक्यावर घेतला. तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करता या चळवळीला जन आंदोलनात रूपांतरीत करण्याचे मोठे काम अण्णा भाऊ आणि त्या वेळच्या कलापथकांनी, त्या वेळच्या बुलंद आवाजाच्या शाहिरांनी केले त्यात सिंहाचा वाटा होता. तो अर्थात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अण्णा भाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या शाहिरीतून घराघरात पोहोचवले, जलस्याच्या रूपाने जनतेला सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याचा उत्सव त्यांनी निर्माण केला.

 

कामगार स्तवन या त्यांच्या कवनात ते म्हणतात,

प्रारंभी मी आजला,

कर ज्याचा येथे पूजला ।

जो व्यापूनी संसाराला,

हलवी या भूगोला ।

तर एकजुटीचा नेता या रचनेत ते म्हणतात,

एकजुटीचा नेता झाला कामगार तैय्यार ।

बादलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार ।

 

याच रचनेत ते शेवटी म्हणतात, पूर्ण लोकशाहीला आणूनि, गाऊ मग यशगान ।निंनादून अस्मान, अंती वर्गविहीन, हिंद करू निर्माण म्हणूनच अण्णा भाऊ हे खरे समरस साहित्यिक होते. देशाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी स्वत: उपाशी असतो आणि कापड गिरणीमध्ये काम करणारा कामगार कायम नागवाच राहतो, हे वास्तव त्यांनी कायम त्यांच्या साहित्यातून मांडले. लोकशाहीर अण्णा भाऊ आपल्या देशाची शान आहे. त्यांच्या विचारांची कास धरून ते विचार जनमानसात रुजवायचे आहेत आणि ते रुजवत असताना अण्णा भाऊंच्या स्वप्नातला एकसंघ, जातीविरहीत भारत साकार करण्याचा ध्यासही बाळगायचा आहे त्यांची शाहिरी समाजाला जोडणारी राष्ट्राला मानणारी आहे, असा लोकशाहीर पुन्हा होणे नाही.

- काशिनाथ पवार

9765633779

Powered By Sangraha 9.0