संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ साठे

    दिनांक  01-Aug-2019संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ या दोघांना एकमेकांपासून वगळताच येणार नाही. अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाचा, वैचारिकतेचा आणि साहित्यिकतेचाही कस शाहिरी रूपात पुढे आला, तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये.

 

सांदीपानी ऋषी (मातंग) होते. कृष्णाचे गुरू रामायण-महाभारत काळात मातंग ऋषी होऊन गेले. त्यांनी ब्राह्मण्य मिळावे म्हणून 100 वर्षे घोर तपश्चर्या केली. भुकेलेल्या ससाण्याला स्वतःच्या शरीराचे मांस देणाऱ्या शिबीराजाची आई मांग कुळातील. असे महान ऋषी मातंग समाजात होऊन गेले. हिंदवी स्वराज्याचे भगवे निशाण उतरत होते आणि इंग्रजाचा युनियन जॅक चढत होता. त्याचवेळी ’जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी’ ही शपथ घेऊन टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले असे अनेक क्रांतिकारक घडविणारे आद्यक्रांती गुरू लहुजी साळवे हे ही मातंगाचे पुर्वज. लहुजीचे वडील राघुजी इंग्रजाबरोबर लढताना धारातीर्थी पडले होते. त्यांचे वडील लहुजी किल्ले पुरंदरवर होते. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा खारीचा वाटा या समाजाने उचलला होता. हा समाज त्यागी होता, भोगी नव्हता. आईचे, बाईचे, निर्जीव सुईचेदेखील प्राणपणाने रक्षण करणाऱ्या या मुशीतल्या अण्णा भाऊंनी लिहिलेले साहित्य अजरामर आहे. मांगांची मगधराज कुळ, कोसल राज कुळ, वैशालीतील राजकुल, वंशराज कुल, अवंती राजकुल, मगध राजकुल, कुरू राजकुल, मैथिली राजकुल अशी राज्ये होती. त्या कुलात जन्माला आलेले अण्णा.

 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भव ती भारत ।

अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम।

 

याचा सरळ सरळ अर्थ असा आहे. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा मी धर्म वाचवण्यासाठी जन्म घेतो. . हिंदवी स्वराज्याच्या काळात छत्रपतींसाठी गुरुस्थानी व सामाजिक सनातनता वाढीस लागली, तेव्हा तुकाराम महाराजांनी जन्म घेतला व हिंदवी स्वराज्याला,धर्माला सावरले. धर्म बुडू दिला नाही. वारकरी संप्रदायाची उभारणी केली, तर मुंबई राज्याची राजधानी गुजरात गिळंकृत करायलानिघाला. गिरण्याचं साम्राज्य असणारी मुंबई धनदांडग्यांच्या कब्जात गेली होती. कामगारांचे शोषण होत होते. अशा वेळी राजधर्माला कामगार क्षेत्राला ग्लानी आली होती. नियतीची रचना अशी की, मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी लढा उभारता यावा म्हणून वाटेगावचे तुकाराम म्हणजेच अण्णाभाऊ साठे मुंबईला आले.

 

अण्णा कामगार लढ्यात आघाडीवर असायचे. आई मुलाला भरवते, तसे विचार मनामनात भरवित होते. ‘क्रांतिकारी’ शब्दाची एक ओळ 10 वर्षांची क्रांती घडवित असते. अण्णांनी तेच केले. गावाकडील नाळ काय, मुंबई शहरात कामगाराशी जोडलेली नाळ अण्णांनी कधीच तोडली नाही. अण्णांच्या हयातीत मिलचे भोंगे कधीच बंद झाले नाही. ऑक्टोबर 1948च्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेत डफाच्या कडकडातून तर कहरच केला. प्रत्येक लोकनाट्य विनोदाची उधळण करू लागले. लाल बावटा कलापथकाने, तर अवघा महाराष्ट्र घुसळून काढला होता. अण्णा भाऊंच्या ‘माझी मुंबई’ मधील सवाल जबाबाच्या रूपाने लोकांना लढ्यातला अर्थबोध होत होता. शिवतीर्थ नायगाव, परळ, भायखळा ते थेट गिरगावपर्यंत लोक गनिमी काव्याने लढत होते. क्रांतीचे बंड कोठे, किती पेटते ठेवायचे, हे शाहिरांना माहीत होते. त्यामुळे प्राणावर बेतणारे बोटावर निभावले होते. मोरारजीच्या जुलमी मनसुब्यापुढे हजारो निष्पाप जीव गेले असते तरी आमचे ‘वेड्यात दौडले सात’ असे निष्पाप जीव दौडले होते. 105 हुतात्मे झाले अर्थात आमचेच राज्य मिळवायला ही मनुष्यहानीदेखील कधीही भरून न निघणारी अशीच आहे. खटकेबाज संवाद, बदलत्या चाली, पोटतिडकीने पहाडी आवाजात गायलेली शाहिरी व अकलेची गोष्ट या वगनाट्याने मोरारजी सरकारचीअक्कल ठिकाणावर येत होती. अण्णा भाऊंच्या कवनापुढे मोरारजी देसाईच्या दांडुकेशाहीची क्रांती गर्भगळीत झाली, ज्या गर्भातमुंबई बळकावण्याचे मनसुबे रचले होते, त्या मनसुब्याची राखरांगोळी झाली. आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आहे.

 

अण्णा भाऊ लिहीत, होते गात होते. ‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णा भाऊ अंगी येई बळ.’ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले शाहिराचे स्थान हे मोठे होते व त्यात अण्णा भाऊ अग्रणी होते. शाहिरी म्हणजे लोकजागृती, लोकशिक्षण या दृष्टीनेच शाहिरी रचना सादर होत असतात. शिवशाहीत जी क्रांती शाहिरीने केली, तीच क्रांती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत झाली. अनेक सभांचा सार हा एका कवनातून सामान्य माणसापर्यंत पोहोचवला जातो. ही ताकद शाहिरी कवनात असते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा तो आत्मा होता म्हटले, तर वावगे ठरणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही उभी राहिली ती सकल मराठी बोलणाऱ्या लोकांचे भाषावार प्रांत रचनेच्या तत्त्वाच्या आधारावरएकराज्य स्थापन करण्यासाठी करण्यात आलेली चळवळ. 1950 ते 1960 या काळात महाराष्ट्रातसर्वात व्यापक असे स्वरूप या चळवळीने घेतले होते. एकूण 31 हजार, 092 लोकांना अटक करण्यात आली.19 हजार, 445 लोकांवर खटले भरले. 18 हजार, 419 लोकांना सजा झाली. मुंबई व अन्य भागात दंगली उसळल्या. 537 वेळा गोळीबार झाला. 105 बांधव हुतात्मे झाले. त्या हुतात्म्याच्या स्मरणात ‘फ्लोरा फाऊंटन’जवळ स्मारक उभारले. महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्याची म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारी चळवळ 12 मे, 1946 रोजी बेळगावात भरलेल्या साहित्य संमेलनातून पुढे आली. डिसेंबर 1948 मध्ये प्रसि द्धझालेल्या समितीने भाषावार प्रांत रचनेला विरोध दर्शविला. महाराष्ट्रातील लोकांची अवहेलना करणारी टिपणी केली. पुढे जे.व्हि. पी. कमिटीने महाराष्ट्र कर्नाटक मागणीला पाठिंबा दिला. मात्र, मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध केला. डिसेंबर 1953 ला फाजल अली यांच्या अध्यक्षतेखालील राज्यपुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात आली. दि. 10 ऑक्टोबर, 1955 संयुक्त महाराष्ट्राचा अहवाल सादर करण्यात आला. ही चळवळ जनतेचा एल्गार होता. ही एकमेव चळवळ अशी होती की, सर्व राजकीय पक्ष आपले मतभेद विसरून एक झाले होते. अण्णांचे शब्द, अण्णांचा शाहिरी बाणा या लढ्याचा दिपस्तंभ होता. त्यांच्या शाहिरीने उभा महाराष्ट्र पेटला. त्यांच्या कवनांनी त्यावेळी चळवळीची एक फळी उभी केली. सरते शेवटी मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. अण्णांनी केवळ साहित्यच घडविले नाही, तर अनुयायीदेखील घडविले. विचारांचा वसा हा जीवंत राहत आहे. अण्णांच्या साहित्यावर अनेकजण विद्यावास्पती झाले. मृगाच्या नाभीतल्या कस्तुरीप्रमाणे आज केवळ समाज या वलयातच पुण्यतिथी, जयंती या महान दिनी अण्णाभाऊ अडकले आहेत. तेव्हा ‘अरे कोंडला कोंडला देव राऊळी कोंडला’ असे समाजानेदेखील करून अण्णांना सीमित ठेवू नये. नाभी बाहेर कस्तुरी आली, तर आसमंतात तिची महती कळते.

 

- अण्णा धगाटे

9850766233