समाज संघटन

    दिनांक  01-Aug-2019दासबोधाच्या सुरुवातीस जरी समर्थ रामदास स्वामी म्हणाले की
, ‘बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले।तरी त्यांच्या मनात लोकांना केवळ अध्यात्मज्ञान सांगावे, असा उद्देश नव्हता. त्यांना लोकांना शहाणेकरायचे होते. आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका।असे स्वामींनी म्हटले आहे. वस्तुतः प्रपंचआणि परमार्थयांचा अभ्यास स्वतंत्रपणे केल्यास अनेक अडचणी उपस्थित होतात. कारण, ते एकमेकांना पूरक आहेत. प्रपंच नेटका करायचा तर चांगले काय आणि वाईट काय, हे समजून घ्यावे लागते. त्यानंतर चांगले स्वीकारून वाईटाचा त्याग करायचा असतो. त्याने मनुष्य प्रपंचात यशस्वी होतो. तोच सारासार विवेक परमार्थात दाखवला, तर परमार्थ साधता येतो. स्वामींच्या मते, ज्यांना प्रपंच नेटकाकरता येत नाही, त्यांना परमार्थ साधता येत नाही. दासबोधातील पहिले काही समास लिहिताना समर्थांच्या मनात या शिष्य-महंतांना प्रथम अध्यात्मविद्येची जाणीव करून द्यावी, असे असेलही. त्यामुळे सातव्या दशकानंतर समर्थांना थांबायचे होते की काय, अशा शंकेला जागा आहे. कारण, दासबोधातील सातव्या दशकातील दहाव्या समासातील एक ओवी तसे सूचित करणारी आहे.


सरली शब्दांची खटपट ।

आला ग्रंथाचा शेवट ।

येथे सांगितले पष्ट । सद्गुरुभजन ॥ (७.१०.४२)

दासबोध कथन करीत असतानाही अंतर्मुख होऊन चिंतन करण्याची स्वामींना सवय असल्याने ग्रंथाचा शेवट जवळ आला असे त्यांना वाटले असेल. परंतु, तेथे न थांबता त्यांना जाणवले की, शिष्यांसाठी, महंतांसाठी, लोकांसाठी त्यांना शहाणे करून सोडावे, असे अनेक विचार सांगायचे राहून गेले. आपले भाग्य थोर म्हणून स्वामी सातव्या दशकाच्या शेवटी थांबले नाहीत. पुढे विसाव्या दशकापर्यंत दासबोधग्रंथ सांगत गेले. त्यावेळी समर्थशिष्य कल्याणस्वामी दासबोधासाठी लेखनिकाचे काम करीत होते. हे दासबोधलेखनाचे काम बरीच वर्षे चालले असावे. समर्थांच्या अमोघ वाणीतून निघालेली शब्दरत्ने कल्याणस्वामींनी अक्षर रुपात पकडून आपल्यापर्यंत पोहोचवली. माघ वद्य नवमीला शनिवारी शके १६०३ रोजी समर्थांनी अवतार कार्य संपवले. संशोधकांच्या मते, ती तारीख २२ जानेवारी इ.स. १६८२ अशी होती. निवार्णाच्या केवळ दोन महिने आधी म्हणजे मार्गशीर्ष शके १६०३ ला स्वामींनी दासबोधाचा शेवटचा विसावा दशक पूर्ण केला. त्या अखेरच्या धावपळीत सातव्या दशकातील ग्रंथाचा शेवट आल्याची वरील ओवी तेथून काढण्याचे भान कुणाला राहिले नाही.

आपल्या प्रदीर्घ पायी तीर्थाटनाच्या काळात स्वामींनी भारतीय समाजाचे जवळून अवलोकन केले होते. तत्कालीन हिंदू समाजाची दैन्यावस्था पाहून त्यांचे हृदय कळवळले. त्याकाळीचा समाज इतका दुबळा झाला होता की, तो कशाच्याही उपयोगाचा राहिला नव्हता हे स्वामींना जाणवले. लोक हताश, दुर्बल, थोड्या पैशासाठी भांडणारे, फितुरी करणारे झाले होते. धर्माच्या बाबतीत बोलायचे तर लोकांनी आपल्या देवाचे भजन-पूजन सोडून ते तामसी उपासनांच्या नादी लागले होते. कामनिक व्रतवैकल्यावर ते तुटून पडत होते. (लोक कामनेच्या व्रताला । झोंबोनि पडती ॥) मुसलमानी सत्तेला व त्यांच्या जाचाला कंटाळून लोक लाचारीने त्यांच्या धर्माचे आचार, रिवाज पाळू लागले होते. कित्येकांनी स्वतःहून म्लेंच्छांचा धर्म स्वीकारला होता. धर्माच्या अशा पडत्या काळात विशिष्ट हेतू मनात ठेवून स्वामी एकामागून एक तीर्थक्षेत्रांना भेटी देत मार्गक्रमण करीत होते. या प्रवासात ते तेथील साधूसंतांच्या भेटीगाठी घेत चालले होते. त्या प्रवासात मोक्षाचे अधिकारी असलेल्या साधू पुरुषांनाही स्वामी भेटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, जुलमी परकीय सत्ता उलथवून तेथे स्वधर्माची स्थापना करणे आणि आपली पवित्र तीर्थक्षेत्र त्यांच्या तावडीतून मुक्त करणे अशा ओजस्वी विचारांचे अधिकारी पुरुष स्वामींना भेटले नसावेत. त्यांना भेटलेले बहुतेक अध्यात्मज्ञानी पुरुष स्वतःला मोक्षप्राप्ती कशी मिळवता येईल, या कल्पनेत रमणारे होते. त्यांना इतर जनसामान्यांशी काही देणेघेणे नव्हते. समाज संघटन करून लोकांच्या उद्धारासाठी काहीतरी करावे, अशी तळमळ कोणाच्या ठिकाणी नव्हती. तेव्हा इतर कोणाचे साहाय्य घेण्यापेक्षा आपणच या लोकसंग्रहाच्या आणि समाज संघटनाच्या कामाला लागले पाहिजे, असे स्वामींनी तीर्थाटन काळातच ठरवले. समाज संघटनेचे महत्त्व त्या काळात समर्थांनी ओळखले होते. आजच्या राजकीय क्षेत्रातही समाज संघटनेला महत्त्व आले आहे.

आधुनिक काळाचा विचार करता, समाज कशा प्रकाराने संघटित करता येईल, हा पक्षश्रेष्ठींना पडलेला मोठा प्रश्न आहे. आपण पक्षीय राजकारणाची पद्धत स्वीकारली असल्याने आपल्या पक्षासाठी जास्तीत जास्त अनुयायी आणि कार्यकर्ते कसे मिळवता येतील, ही सर्व पक्षांसमोरील समस्या आहे. या संघटनेच्या जोरावर पक्षाला सत्ता हस्तगत करता येते अथवा टिकवता येते. समाज संघटनांची दिशा आज राजकारणासाठी ठरली असली तरी समाज संघटनेचा विचार समाज हितासाठीही करता येतो, हे समर्थकालीन संघटन अभ्यासल्यावर लक्षात येते. आजच्या राजकीय वातावरणात लोकसंग्रह व समाज संघटन सज्जनांच्या पातळीवर करता आले, तर आपल्या देशाची चारित्र्यसंपन्न अशी ओळख होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी समर्थांनी दासबोधांतर्गत केलेल्या विचारांतून काही मौलिक धागे शोधता येतील.

स्वामींनी त्यांच्या काळात महंतांद्वारा हिंदुस्थानभर संघटन उभारायचे ठरवले होते. मुस्लीम विचारांचे जेथे प्राबल्य होते अशी ठिकाणे निवडून स्वामींनी तेथे मठस्थापना केलेल्या दिसून येतात. तत्कालीन बिकट अवस्थेत लोकांना सावरणारा, समाजहितासाठी काम करणारा आदर्श पुढारी किंवा नि:स्पृह कार्यकर्ता राहिलेला नाही हे समर्थांनी तीर्थाटन काळातच अनुभवले होते. योग्य नेतृत्वाच्या अभावाने हिंदू समाजाची दुर्दशा झाली होती. ज्या समाजाला चांगले नेतृत्व लाभत नाही, जेथे चांगले कार्यकर्ते नसतात, त्या समाजाची घडी विस्कटली जाते, अशी अवस्था प्राप्त झाल्यावर त्या समाजात सर्वत्र अंदाधुंदी, बेशिस्तपणा, भ्रष्टाचार यासारखे दुर्गुण पोसले जाऊन समाजाची एकंदर स्थिती खालावते. गुंडगिरी वाढून सामान्य माणसाला जीवन नकोसे होते. अशा समाजात स्थैर्य आणायचे असेल, तर त्या समाजाचे संघटन प्रथम अध्यात्मिक पातळीवर केले पाहिजे. त्या समाजाला श्रेष्ठ नेतृत्वाने चारित्र्यसंपन्न जीवनाची महती सांगितली पाहिजे. तामसिक गुणांपासून लोकांना दूर करून त्यांना सात्त्विकतेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. चारित्र्यसंपन्न जीवन आणि नैतिक मूल्ये यांची जपणूक करायला शिकवले पाहिजे. अर्थात, या परिवर्तनासाठी काम करणारे नेतृत्व तितकेच नीतिमान, चारित्र्यसंपन्न व बलवान असले पाहिजे. तलवारीच्या धाकापेक्षा या नेत्याच्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समाजमानसावर अधिक असतो. आपल्या चारित्र्यसंपन्न संस्कृतीची ओळख समाजाला असली पाहिजे. अशी उच्चदर्जाची संस्कृती हरिकथा निरुपणातून समाजासमोर ठेवली पाहिजे. त्यातून सज्जनपणाकडे लोकांचा कल होईल. समाजात सज्जन माणसांची टक्केवारी दुर्जनांच्या मानाने कमी असते. पण, एकदा समाजाने सज्जनांना मानायचे ठरवले, तर त्यांचा प्रभाव वाढून ते दुर्जनांवर मात करतात व समाज सुखी होतो. यासाठी स्वामींनी राजकारणापेक्षा हरिकथा निरुपणाद्वारा सज्जनांची संख्या वाढवण्याला जास्त महत्त्व दिले आहे.

मुख्य ते हरिकथा निरुपण ।

दुसरे ते राजकारण ।

तिसरे ते सावधपण । सर्व विषयीं ॥

चौथा अत्यंत साक्षेप ।

फेडावे नाना आक्षेप ।

अन्यायो थोर अथवा अल्प ।

क्षमा करीत जावे ॥

(दा. ११.५.4 व ५)

समाज संघटनासाठी हरिकथा निरुपणाला प्रथम स्थान देऊन संघटनेसाठी स्वामींनी इतर आवश्यक बाबींचा विचार केला आहे. ते सविस्तरपणे पुढील लेखात पाहू.

७७३८७७८३२२

सुरेश जाखडी

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat