भारताची 'टायगर राजकुमारी'

01 Aug 2019 22:15:43



नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त देशभरातील वाघांची संख्या वाढल्याचे आकडेही समोर आले. तेव्हा, अशाच एक व्याघ्रअभ्यासक आणि वन्यजीव शास्त्रज्ञ लतिका नाथ यांच्याविषयी...


लतिका नाथ त्यांच्या आयुष्यात अनेकविध भूमिका जगत आहेत. संवर्धनवादी, विचारवंत आणि एक कर्तव्यदक्ष पत्नी. मात्र, त्यांची या सगळ्यापेक्षा एक अत्यंत वेगळी ओळख म्हणजे 'भारताची टायगर राजकुमारी.' लतिका नाथ या वाघांचा अभ्यास करुन त्या विषयात 'डॉक्टरेट' मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. लतिका नाथ यांचे बालपण काश्मीर, आसाम आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेले. दिल्ली विद्यापीठातील मैत्रेयी महाविद्यालयातून त्यांनी पर्यावरण विज्ञान विषयात पदवी संपादन केल्यानंतर, वेल्स विद्यापीठातील स्कूल ऑफ फॉरेस्ट्रीसाठी शिष्यवृत्तीची संधी मिळविली. दचिगम नॅशनल पार्कमधील एक प्रकारचे हरीण असलेले हंगुल आणि अस्वलाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना उत्तम संधी मिळाली असताना काश्मीरमधील वाढत्या दहशतवादाने सर्वत्र हाहाकार माजविला होता. त्या म्हणतात की, "माझ्या आजोबांचे घर आग लावून बॉम्बने उडवून देण्यात आले. गोळी झाडून अनेक लोकांची हत्या करण्यात आली. यात आम्ही सर्व काही गमावले. त्यानंतर मी भारतीय वन्यजीव संस्थेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, जिथे संचालक डॉ. एच. एस. पवार यांनी मला वाघांवर डॉक्टरेट करण्याचा सल्ला दिला. कारण, आजपर्यंत भारताच्या राष्ट्रीय प्राण्यावर कोणताही समग्र वैज्ञानिक अभ्यास झाला नव्हता."

 

शिक्षक डॉ. जुडिथ पालोट यांनी लतिका यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात नामांकित जीवशास्त्रज्ञ डेव्हिड मॅकडोनाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्यासाठी आमंत्रित केले. ऑक्सफर्ड येथे वन्यजीव संरक्षण संशोधन युनिटची स्थापना करण्यात आली होती. अशाप्रकारे तिने आपले डॉक्टरेट संशोधन पूर्ण करून पीएच.डी प्राप्त केली. वन्यजीव शास्त्रज्ञ म्हणून नोकऱ्या फारच कमी असतात. त्या परिस्थितीतही त्यांनी या क्षेत्रात येण्याचा ठाम निर्णय घेतला, हा निर्णय अत्यंत धाडसी होता. लतिका आपल्या धाडसी कामाविषयी अनेक अनुभव सांगतात. वन्यजीवशास्त्रज्ञ म्हणून, जंगलांमध्ये संशोधन करण्यासाठी त्या आठवडेच्या-आठवडे घालवितात. त्या दररोज काही तास प्राण्यांबरोबर घालवून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे निरीक्षण करतात. "जंगलात राहताना त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. कोणत्याही मनोरंजनाशिवाय इथे राहावे लागते. अनेक दिवस आमच्या कुटुंबीयांशी आमचा संपर्क होत नाही. फक्त जंगल आणि जंगलच आमचं आयुष्य असतं," असं त्या सांगतात. "कोरडे रेशन आणि मूलभूत सुविधा यांच्यावरच आम्ही इथे राहतो. याच्या अगदी उलटे म्हणजे मी जगातील अनेक सुंदर ठिकाणी वर्षे घालविली आहेत. या ठिकाणी राहून अनेक वेगळ्या गोष्टी बघावयास मिळणे, हे माझे भाग्य आहे." लतिका यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'इंटेक' या संस्थेतून केली. जिथे त्यांनी 'इको-डेव्हलपमेंट ऑफिसर' म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी वाघांचे जीवशास्त्र, वागणूक आणि त्यांची संख्या जाणून घेण्याकरिता ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधन विभागात प्रवेश घेतला. बांधवगढ नॅशनल पार्क 'लॅण्डस्केप इकॉलॉजी' या विषयामुळे सर्वांचे आकर्षण ठरले आहे. १९९४-९५ मध्ये 'डब्ल्यूआयआय' या संस्थेत वन भूगर्भातील विस्तृत माहिती, वाघांच्या लोकसंख्येचा अंदाज आणि नमुन्यासह पूर्व मध्य प्रदेशातील वन्यजीव कॉरिडोरवर त्यांनी संशोधन केले. या संशोधनात बांधवगड, कान्हा आणि अचानकमार राष्ट्रीय उद्याने या ठिकाणी असणाऱ्या वाघांच्या संख्येविषयी आणि त्यांच्या नैसर्गिक प्रश्नाविषयी बरीच माहिती समोर आली. लतिका नाथ यांनी वाघांच्या संख्येत वाढ करण्याच्या उपायांवर काम सुरू केले आहे.

 

नेपाळमधील तराई वेटलँड कॉन्झर्वेशनच्या प्रोजेक्ट डिझाईनमध्येही त्या सहभागी होत्या. ज्या ठिकाणी त्यांनी वाघांच्या पिण्यासाठी बनविलेल्या पाण्याची छोटी डबकी आणि वाघांचे नवीन क्षेत्र तयार करण्यावर उत्तम काम केले. सप्टेंबर २००३ मध्ये लतिकाने मुलांसाठी वाघांविषयी पुस्तक लिहिले. ज्यात 'तकदीर' नावाच्या वाघाच्या बछड्याविषयी माहिती दिली आहे. चेन्नईच्या तुलिका बुक्स यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ भाषांमध्ये ते प्रकाशित केले आहे. २००५ मध्ये, देशभरात मॉडेल इको रिसॉर्ट्स स्थापित करण्याच्या उद्देशाने लतिकाने कान्हा वन परिसंस्थेबद्दल शिकवलेल्या सर्व गोष्टींचा उपयोग करून 'वाईल्ड इंडिया रिसॉर्ट्स (कान्हा) प्रायव्हेट लिमिटेड'ची स्थापना केली. मुंकीमधील सिंगिनवा जंगल लॉज, कान्हा ही त्यांची पहिली पायरी होती. त्यानंतर, २००८ मध्ये त्यांनी 'सिंगिनवा फाऊंडेशन'ची स्थापना केली. सध्या त्या कान्हा व्याघ्र प्रकल्पात काही शाळकरी मुलांसमवेत पर्यावरणविषयक प्रकल्पांवर काम करत आहेत. लतिकाने आपले जीवन वन्यजीव संवर्धनासाठी आणि वाघांविषयीच्या प्रकल्पांसाठी समर्पित केले आहे. खरंतर, जेव्हा नॅशनल जिओग्राफिक चॅनेल भारतात सुरू करण्यात आले, तेव्हा हृतिक रोशन, गेरी मार्टिन आणि लतिका यांची एक जाहिरात तयार करण्यात आली होती. यानंतरच त्यांच्या आयुष्यावरील लघुचित्रपटात त्यांना 'इंडियाज टायगर प्रिन्सेस' असे नाव देण्यात आले आहे. एअरसेल कंपनीच्या 'सेव्ह द टायगर' टेलिव्हिजन मोहिमेसाठी लतिका राजदूतदेखील होत्या आणि कान्हा येथे त्यासंदर्भात कला शिबिरेदेखील घेण्यात आली आहेत. २०१५ पासून, लतिका नाथ फोटोग्राफी, कॉफी टेबल बुक आणि संवर्धन पर्यावरणशास्त्र प्रकल्पांवरही कार्यरत आहेत.

- कविता भोसले 
 
Powered By Sangraha 9.0