मंगळसूत्र गहाण ठेवून आज कोटींची उलाढाल करणारी 'भैरीभवानी इंटरप्रायजेस'

    दिनांक  01-Aug-2019   'भैरीभवानी' हे गंगाराम सनगले यांच्या कुलदैवतेचे नाव. देवीचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे, अशी श्रद्धा गंगाराम यांची असल्याने त्या कृतज्ञतेपोटी त्यांनी कुलदैवतेच्या नावाने कंपनीचे नामकरण केले. कंपनी छोटी मोठी कामे करू लागली. पुढे मोबाईल कंपन्या टॉवर उभारण्याचं काम खाजगी कंपन्यांना देऊ लागल्या. त्यातल्या एका कंपनीसाठी गंगाराम यांची कंपनी काम करू लागली. एका कामगाराच्या मदतीने सुरू झालेल्या या कंपनीत प्रत्यक्षरित्या २७ कर्मचारी कार्यरत आहेत, तर ५५ जणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळतो. संपूर्ण मुंबई मध्ये 'भैरीभवानी' विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स उभारणे, त्यांची देखभाल करणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आदी सेवा पुरविते.


"अजून काही पैसे कमी पडत आहेत. सुचत नाही कुठून आणू?" गंगारामचे ते शब्द ऐकून त्यांची पत्नी भाग्यश्री उठल्या आणि गळ्यातलं मंगळसूत्र त्यांनी काढून दिलं. "हे मंगळसूत्र सोनाराकडे गहाण ठेवा आणि जे पैसे येतील, त्यातून व्यवसाय उभा करा." आपण आपल्या बायकोचा दागिना कसा गहाण ठेवू शकतो, हे गंगारामच्या डोळ्यातील भाव त्यांच्या पत्नीने वाचले. त्या म्हणाल्या, "या मंगळसूत्राच्या पैशाने माझ्या पतीचं उद्योजक बनण्याचं स्वप्न पूर्ण होत असेल तर ती स्वप्नपूर्तताच माझ्यासाठी अनमोल ठेवा असेल." आपण पुराणातल्या सत्यवानाचे प्राण वाचविणाऱ्या सावित्रींची कथा जाणतो. मात्र, आपल्या पतीचं स्वप्न साकारण्यासाठी अशा अनेक आधुनिक सावित्री प्रचंड कष्ट घेतात. त्यांना मात्र आपण ओळखत नाही. आपल्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून भांडवल उभारत काही कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आधुनिक सावित्रीच्या सत्यवानाची ही कथा आहे. ही कथा आहे 'भैरीभवानी इंटरप्रायजेस'च्या गंगाराम सनगले यांची.

 
 
 

रत्नागिरीमधील देवरुख तालुक्यातील वांझोळे या गावात गंगारामचं बालपण गेलं. आई-बाबा दोघेही शेती करायचे. दहावी झाल्यावर गंगाराम त्यांना शेतात मदत करू लागला. गुरं, शेळ्या राखू लागला. अशी अडीच वर्षे गेली. गंगारामला हे जगणं काही रुचलं नाही. १९९० साली गंगाराम मुंबईत आपला भाऊ शांतारामकडे राहण्यास आला. त्यावेळी त्याचं वय होतं २२ वर्षे. कोकणी चाकरमान्याप्रमाणे एका कापडाच्या ट्रेडिंग कंपनीत ऑफिसबॉय म्हणून तो कामाला लागला. पगार होता ७०० रुपये महिना. गंगारामचा प्रामाणिकपणा पाहून मालकाने त्याला ४०० रुपये दिले आणि टेलरिंग शिकण्यास सांगितले. तिकडे काही वर्षे काम केल्यानंतर गंगाराम ताज केटरर्समध्ये कामाला लागला. कंत्राटी पद्धतीने काम असल्याने ते देखील काम काही वर्षांतच संपुष्टात आलं. याचदरम्यान गंगारामचा विवाह भाग्यश्री यांच्यासोबत झाला आणि जणू भाग्यच बदललं. लग्नानंतर काहीच दिवसांनी मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपनीत गंगाराम कामास लागला. या कंपनीत गंगारामने १३ वर्षे काम केले. कंपनीच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा होता. त्या काळात मोबाईल कंपन्यांनी नुकताच भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. त्यामुळे अनेक टॉवर्स उभारावे लागत असे, सोबतच त्यांची देखभालसुद्धा करावी लागे. एकदा तर ऐन होळीमध्ये जवळपास ३६ तास सलग गंगारामने काम केले होते. गंगारामची ही मेहनत मोबाईल कंपन्यांचे अधिकारी पाहत होते. त्याची धडपड, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती यांची कंपनी कदर करत नाही तर शोषण करत आहे, हे त्या अधिकाऱ्यांना जाणवत होतं. त्यातील काही अधिकाऱ्यांनी थेट गंगारामलाच एक टॉवर उभारण्यासंदर्भात विचारले. तत्पूर्वी गंगाराम यांनी मालकांना खोली घेण्याविषयी मदतीची विचारणा केली होती. मात्र, मालकांनी ते गांभीर्याने घेतले नाही. तसेच मालकास गंगारामला त्या अधिकाऱ्यांनी केलेल्या ऑफरची माहिती मिळाल्यानंतर "जो रस्त्यावर राहतो, त्यास तुम्ही कसं काय काम देण्याविषयी विचारता?" असा अपमानजनक प्रश्न विचारला. प्रामाणिक गंगारामसाठी हा प्रसंगच आयुष्याचा टर्निंग पाईंट ठरला आणि त्यांनी ती नोकरी सोडून दिली. हा प्रसंग कथन करताना गंगाराम भावूक झाले होते.

 

त्या मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम दिले, पण ते काम करण्यासाठी १० हजार रुपये आवश्यक होते. ३ हजार रुपयांच्या आसपास पैशांचा बंदोबस्त झाला होता.आणखी ७ हजार रुपये कमी पडत होते, तेव्हा गंगारामच्या पत्नी भाग्यश्री यांनी मंगळसूत्र आणून दिले. यातून भांडवल उभं राहिलं आणि पहिलं काम पूर्ण झालं. 'भैरीभवानी इंटरप्रायजेस' उदयास आली. 'भैरीभवानी' हे गंगाराम सनगले यांच्या कुलदैवतेचे नाव. देवीचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे, अशी श्रद्धा गंगाराम यांची असल्याने त्या कृतज्ञतेपोटी त्यांनी कुलदैवतेच्या नावाने कंपनीचे नामकरण केले. कंपनी छोटी मोठी कामे करू लागली. पुढे मोबाईल कंपन्या टॉवर उभारण्याचं काम खाजगी कंपन्यांना देऊ लागल्या. त्यातल्या एका कंपनीसाठी गंगाराम यांची कंपनी काम करू लागली. एका कामगाराच्या मदतीने सुरू झालेल्या या कंपनीत प्रत्यक्षरित्या २७ कर्मचारी कार्यरत आहेत, तर ५५ जणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळतो. संपूर्ण मुंबई मध्ये 'भैरीभवानी' विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स उभारणे, त्यांची देखभाल करणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आदी सेवा पुरविते. हे काम करताना शनिवार, रविवार वा सुट्टीचे दिवस जास्त सतर्क राहावे लागते, कारण याच दिवशी मोबाईलचा सर्वांत जास्त वापर केला जातो आणि त्याचा ताण या यंत्रणेवर पडतो. गंगाराम यांचा मुलगा श्रेयस 'भैरीभवानी'मध्ये आता लक्ष देऊ लागला आहे. तसा शाळेत असल्यापासूनच श्रेयस कंपनीच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकत होता. मात्र, वाणिज्य शाखेची पदवी मिळविल्यानंतर पूर्णत: त्याने या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले आहे. गंगारामचे दोन पुतणे आज वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत आहेत. दिलीप फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो तर दुसरा पुतण्या, दीपक रिक्रूटमेंटचा व्यवसाय करतो. गंगाराम त्यांच्यासाठी आदर्श आहेत. चाकरमानी सोडून उद्योजक बनलेल्या गंगारामांनी घरातच तीन उद्योजक घडविले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. भाग्यश्री गंगाराम सनगले या सुद्धा आपल्या पतीच्या व्यवसायात योगदान देत आहेत. मंगळसूत्र गहाण ठेवून सुरू झालेली ही कंपनी आज काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे, हे कौतुकास्पद आहे. किंबहुना, उद्योजक होऊ पाहणाऱ्या प्रत्येक विवाहित जोडप्यासाठी आदर्शवत आहे.