अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका

    दिनांक  01-Aug-2019   
स्त्रीने कसे असावे, याचे ठोकताळे समाजमनाने त्याचे त्यानेच ठरवलेले असतात. ते कालही ठरवलेले होते, आजही आहे. मात्र, अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या 'ठरवलेपणाला' या 'साचेबद्धपणा'ला अलगद नाकारत स्वत:चे अवकाश निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणार्‍या आहेत. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत.

 

साहित्य कुणासाठी?' या प्रश्नाचे उत्तर शोधतानाही साहित्याच्या निर्मितीचे रंग बदलत जातात. या सगळ्या पार्श्वभूमीवर अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखांचे वेगळेपण आहे. ते वेगळेपण असे की, अण्णा भाऊंनी ज्या काळात साहित्यनिर्मिती केली, तो काळ पुरुषप्रधान संस्कृतीचाच. रूढी-परंपरांचे जोखड समाजमनावर रुतून बसलेले. त्या रुतलेपणामध्ये समाजातील स्त्रीच काय पुरूषसुद्धा भरडला गेलेला. या अशा काळात स्त्रीप्रधान साहित्यनिर्मिती एखाद्या पुरुषाने करणे हे नि:संशय कौतुकास्पद आणि अतिशय काळाच्या पुढचेच. अण्णा भाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये तर स्त्रीप्रतिमा ही 'प्रेयसी' या साच्यातच अडकलेली. मात्र, अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले.

 

त्यांच्या 'चित्रा,' 'वैजयंता,' 'आवडी,' 'चंदन,' 'तारा,' 'मयुरा' या कादंबर्‍यांमधील प्रमुख केंद्रबिंदू स्त्रीच आहे. त्या नायिकेच्या नावावरच ती कादंबरी आहे. इतकेच काय, काही कादंबर्‍यांची नावे दुसरी असली तरी त्या कादंबरीची पूर्ण गतिमानता त्या कादंबरीतील स्त्री नायिकेभोवतीच रेखाटलेली आहे. मग ती 'अलगुज' कादंबरीमधील 'रंगू' असू दे की 'माकडीचा माळ'मधील 'दुर्गा', 'गुलाम' कादंबरीमधील 'मीनाक्षी' असू दे. 'स्त्री जन्मा तुझी कहाणी हदयी, अमृत नयनी पाणी' वगैरे वगैरे या संकल्पनांमधून अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिकाही जगतात. मात्र, त्यांच्या हृदयात वात्सल्याच्या अमृतासोबतच अन्यायाविरुद्ध पेटण्याची आगही आहे. त्यांच्या डोळ्यात आसवं आहेत, पण ती आसवं स्वत:साठी नाहीत, तर ती आहेत कुटुंब, समाज जगवण्यासाठीच्या मूल्यांसाठी. मुळातच त्यांच्या साहित्यातील नायिका मुळूमुळू रडणार्‍या नाहीत.

 

अण्णांच्या साहित्यातील नायिका या देखण्या आहेत. त्या कुलिन, शालिन, सज्जन आहेत. त्यांचे देखणेपण हे कामुक किंवा अश्लिल पद्धतीचे नमुने नाहीत. अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिकांचे दु:ख कोणते, तर जगाच्या पाठीवर स्त्री म्हणून स्त्रीचे जे दु:ख आहे तेच दु:ख या नायिकांचे आहे. अण्णा भाऊंच्या सगळ्या नायिका या स्त्रिया आहेत. त्यांच्या स्त्रीदेहाची लालसा करणारे खलनायक हेच या स्त्रियांचे दु:ख आहे. त्याही माणूस आहेत, त्यांनाही भावना आहेत. मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभावदोषाचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दु:ख आहेत. 'चित्रा' कादंबरीतील सोना, चित्रा. बापाविना वाढलेल्या गरीब आईच्या मुली. पण मुलगी आहे, तिचे लग्न झालेच पाहिजे कसेही. त्यामुळे सोनाचे लग्न शरीर सडत चाललेल्या रोगी मनुष्याशी केले जाते. मात्र, तोच तिला नाकारतो. सोनाचा मामाच तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतो. तर चित्राचे नशीबही असेच.

 

नवरा लग्न होऊन पंधरा दिवस होत नाहीत, तर कानात गोम जाऊन मरतो. तिच्याही प्राक्तनात हेच भोग. नवर्‍याने सोडलेल्या किंवा विधवा झालेल्या स्त्रीने कसे जगावे? याच्या त्याच्या वासनेचा घास होऊन जगायचे की मरायचे? पण चित्रा हे प्राक्तन नाकारते. यात 'चित्रा' ही 'चित्रा' राहतच नाही, तर ती आजच्या घडीलाही एकट्या जगणार्‍या स्त्रीला मार्ग दाखवते. 'वैजयंता'ही अशीच. आवडीला तर स्वत:च्या मनाने जगली, तिच्या खालच्या जातीच्या प्रियकरासोबत लग्न केले म्हणून सख्खा भाऊ तिचा खून करतो. आजही समाजात हेच वास्तव आहे. मात्र, यातील आवडी मारून जगण्यापेक्षा जगत संदेश देते.

 

ते जगणे महत्त्वाचे. चंदनाचे तरी दुसरे काय? 'चंदना' विधवा, मात्र कुल-शील जपत ती तिच्या मुलासाठी जगते, संघर्ष करते. या स्त्रिया कोण्या एका जातीच्या नाहीत, तर भारतीय समाजातील समस्त स्त्रियांचे त्या प्रतिनिधित्व करतात. त्या गरीब घरच्याही आहेत आणि श्रीमंत घरच्याही आहेत. अण्णा भाऊंच्या नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाहीत, तर संयुक्त चळवळीमधील 'माझी मैना' ही जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा ही त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायिका आहे. ती 'मैना' संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई, कारवार, निपाणीसाठीची प्रतिमा आहे. मात्र, प्रतिमाच वास्तवतेला जीवंत करते. हे जे जीवंतपण आहे, तेच अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांचे वास्तव आहे.

 

9594969638