धबधब्यांच्या ठिकाणी कचऱ्याचा पूर

    दिनांक  09-Jul-2019प्रबळगड-माची धबधब्यामधून ६०० किलो कचऱ्याचा उपसा


मुंबई (प्रतिनिधी) : निसर्गाच्या सान्निध्यात पावसाचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यांसारख्या नैसर्गिक पर्यटनस्थळांकडे धाव घेणारे पर्यटकच निसर्गाच्या मुळाशी उठले आहेत. एन्व्हायर्नमेन्ट लाइफया स्वयंसेवी संस्थेने रविवारी प्रबळगड-माची धबधब्याजवळ राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमधून तब्बल ६०० किलो कचरा गोळा केला. यामध्ये थर्माकोल व प्लास्टिकच्या डिश आणि मद्याच्या बाटल्यांचे प्रमाण भरपूर आहे. यामुळे नैसर्गिक पर्यटनस्थळांची स्वच्छता वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.

 

 
 
 

पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईनजीकच्या कर्जत, कल्याण, खोपोली जवळच्या धबधबे, नद्या अशा पर्यटनस्थळी जाण्याला अनेकजण पसंती देतात. मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील अनेक पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी अशा वर्षांसहली आयोजित करतात. परंतु निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक याठिकाणी कचरा करून निसर्गाचे नुकसान करत असल्याचे समोर येत आहे. पर्यटकांकडून याठिकाणी मद्यप्राशन केले जात असल्याने या परिसरांमध्ये दारुच्या बाटल्या विखुरलेल्या पाहावयास मिळतात. तसेच याचठिकाणी भोजनाचा बेत होत असल्याने पेपरप्लेट किंवा थर्माकोल डिश, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या टाकून पर्यटक परतीच्या प्रवासाला निघतात. या गोष्टी अविघटनशील असल्याने त्या याठिकाणी साचून राहतात. रविवारी एन्व्हायर्नमेन्ट लाइफया संस्थेने पनवेलपासून १२ ते १५ किमीवर असलेल्या प्रबळगड-माची धबधब्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हे काम केवळ ५५ ते ६० स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने पार पडले. मोहिमेअंती स्वयंसेवकांनी ६०० किलो किलो कचऱ्याचे संकलन केले. या कचऱ्यात प्रामुख्याने दारूच्या बाटल्यांचे प्रमाण जास्त असून थर्माकोल डिश, प्लास्टिकच्या बाॅटल, रॅपर यांचा समावेश आहे.

 
 

 
 

या संस्थेमार्फत २०१६ पासून मुंबईनजीक असणाऱ्या धबधब्यांच्या स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मान्सूनदरम्यान १४ धबधब्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविली असून ८ टनापेक्षा अधिक कचरा गोळा केला असल्याची माहिती 'एन्व्हायर्नमेन्ट लाइफचे धर्मेश बरई यांनी दिली. यामध्ये भिवभुरी, कोंडेश्वर, आनंदवाडी, जुमापट्टी, टपालवाडी, चिंचोटी, झेनिथ, पांडवकडा या काही धबधब्यांचा समावेश आहे. मुंबई नजीक असलेल्या धबधब्यांची अवस्था बिकट असून त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत बरई यांनी मांडले. तसेच पर्यटकांनी जबाबदारीच्या नात्याने या परिसरातून परतताना स्वत: केलेला कचरा उचलून आणल्यास धबधबे नक्की स्वच्छ राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat