मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आषाढी एकादशीला पंढरपुरात

    दिनांक  09-Jul-2019

 

 
 
मुंबई : आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते विठ्ठलाचे दर्शन घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे बोलले जात आहे.
 
 

आषाढी एकादशीचा अविस्मरणीय सोहळा १२ जुलै रोजी संपन्न होत आहे. प्रथेनुसार राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याची परंपरा चालत आली आहे. यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस हे विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. त्याचवेळी प्रथमच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हे महापूजेला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेल्या यशानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सर्व विजयी खासदारांना घेऊन जसे अयोध्येत गेले होते. तसेच पंढरपूराला देखील जाण्याचे शिवसेनेचे नियोजन होते. मात्र दिल्लीत अधिवेशन सुरू झाल्यामुळे सर्व खासदारांना घेऊन जाता आले नव्हते. आता आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकृत दौरा अद्यापही आला नसून महापूजेसाठी उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सुरेश खाडे, दिवाकर रावते, जयकुमार रावल, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी मंत्री प्रकाश मेहता, हर्षवर्धन पाटील, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे पंढरीत येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat