पाणीपुरी विक्रेता ते 'यशस्वी' क्रिकेटपटू

    दिनांक  09-Jul-2019


अगदी शून्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पायरी चढणार्‍या 'यशस्वी' जयस्वालच्या जीवनाची कहाणी उलगडून सांगणारा हा लेख...

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर एक यशस्वी क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावण्याचे अनेकांचे स्वप्न. मात्र, त्यासाठी क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेणे सर्वांनाच परवडण्यासारखे नसते. त्यामुळे अनेकांची मोठा क्रिकेटपटू होण्याची स्वप्न खुलण्याआधीच कोमेजतात. परंतु, याला अपवाद ठरला, तो मुंबईतील १७ वर्षीय 'यशस्वी' जयस्वाल. पाणीपुरी विक्रेता असणार्‍या या यशस्वी जयस्वालने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्रिकेट खेळाडू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्णही केले. शून्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पायरी चढणार्‍या जयस्वालच्या 'यशस्वी' जीवनाची कहाणी सांगणारा हा लेख...

 

जीवनात अनेक सुखसोयी असतानाही जगणे सुखकारक नसल्याच्या तक्रारी अनेकजण करतात. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची उणीव असतानाही विविध अडचणींवर मात करून जे ध्येय गाठण्यात यशस्वी होतात, तेच खरे नायक ठरतात. १७ वर्षीय यशस्वी जयस्वाल हा त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. यशस्वी हा मूळचा उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील रहिवासी. २८ डिसेंबर, २००१ साली भदोईतच त्याचा जन्म झाला. वडील भूपेंद्र कुमार जयस्वाल यांचे घरातच छोटेसे दुकान. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. दुकान आणि शेतीतून तीन मुलांचे पालनपोषण करणे अवघड होत असल्याने घरात सर्वात लहान असणार्‍या यशस्वीला मुंबईतील त्याच्या काकांनी आपल्या घरी आणले.

 

काकाचीही परिस्थिती फार चांगली नाही. सांताक्रुझ-वाकोला येथील कदमवाडीत १० बाय १०च्या घरात आधीच सात माणसे दाटीवाटीने राहत असल्याने यशस्वीच्या नशिबी येथेही निराशाच आली. कसेबसे काही दिवस काढल्यानंतर काकांनी त्याची सोय आझाद मैदानावरील मोकळ्या तंबूत केली. यशस्वीचा काका तेव्हा आझाद मैदानावरील युनायटेड क्लबमध्ये मॅनेजर होता. तेथील मालकांना विनंती करून त्यांनी यशस्वीला मोकळ्या मैदानात एका छोट्या प्लास्टिकच्या तंबूत राहाण्याची परवानगी मिळवली आणि वयाच्या ११व्या वर्षी यशस्वीचा मैदानातील प्रवास सुरू झाला. मैदानावर राहायला तर मिळाले, पण जर क्लबमध्ये राहून क्रिकेट खेळायचे असेल तर पैशांची गरज भासणारच.

 

हे ओळखून ११व्या वर्षीच यशस्वीने कामासाठी शोधाशोध सुरू केली. एका डेअरीमध्ये रात्रपाळीचे कामही त्याने मिळवले. मात्र, का कुणास ठाऊक, येथेही त्याच्या पदरी पुन्हा निराशाच पडली. दिवसभर मैदानावर सराव, त्यात खेळाडूच्या तुलनेत खाणे-पिणेही व्यवस्थित नाही. त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीत रात्रपाळी करणे त्याला अवघड होऊन बसले. झोप सहन न झाल्याने एक दिवस डेअरीमध्ये काम करता करताच त्याचा डोळा लागलेला असताना मालकाने पाहिले. या प्रकारावर संतापलेल्या मालकाने यशस्वीला त्याच्या सामानासकट डेअरीमधून बाहेर फेकले. पैसे कमावण्याचा एकमेव आधारही यशस्वीच्या हातून निसटला. त्याला रडू कोसळले. पण, सांगणार कुणाला? आई-वडील तर उत्तर प्रदेशमध्ये.

 

पैशांची सोय काकांकडूनही न होण्यासारखी. अशा परिस्थितीत आझाद मैदानाबाहेरच पाणीपुरी विकण्याचा त्याने निर्णय घेतला. ज्या मैदानात दिवसा सराव करायचा, त्या मैदानाबाहेरच पाणीपुरी विकण्याची वेळ त्याच्यावर परिस्थितीने आणली. यावेळी अनेकांनी त्याला डिवचले, परंतु तो खचला नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्याने आपली 'यशस्वी' वाटचाल सुरूच ठेवली. त्याच्या या मेहनतीची दखल घेतली, ती क्रिकेट प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी. ज्वाला यांनी क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठी यशस्वीला मदत केली. 'दिवसा सराव आणि रात्री काम' या संघर्षातून यशस्वीने आपले जीवन सावरले. मुंबईत तो काहीसा स्थिरावला. १४व्या वर्षी त्याने आपल्या खेळीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

 

यशस्वीने एकाच सामन्यात त्रिशतक आणि १० पेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम करत, वयाच्या १४व्या वर्षी 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'च्या यादीत आपले नाव कोरले. त्याचा पराक्रम असाच सुरू होता. २०१८ साली त्याच्या खेळाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. भारताच्या 'अंडर-१९' खेळाडूंच्या संघासाठी त्याची निवड झाली आणि सर्वत्र तो प्रकाशझोतात आला. एशिया कप, अंडर १९ विश्वचषक आदी स्पर्धांमध्येही त्याने चांगली कामगिरी करत एक 'यशस्वी' क्रिकेटरच्या यादीत आपले नाव कोरण्यात यश मिळवले आहे. आजही त्याचा क्रिकेटचा सराव याच जोमाने सुरू असून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्याने केला आहे.

 

मुंबईला 'क्रिकेटची पंढरी' म्हटले जाते. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, अजित आगरकर, संदीप पाटील, प्रवीण आम्रे, दिलीप वेंगसरकर असे अनेक दिग्गज खेळाडू मुंबईने घडवले. मुंबईतील क्रिकेट खेळाडूंचा संपूर्ण जगभरात दबदबा राहिला.त्यात आणखी एक भर पडते आहे ती, अंडर १९ मध्ये खेळण्यासाठी निवड झालेल्या यशस्वी जयस्वालची. मुंबईकर यशस्वीने आपल्या कठीण परिश्रमाच्या जोरावर जगभरात आपली नवी ओळख निर्माण केली. त्याच्या या यशाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडवू इच्छिणार्‍या अनेक तरुण-तरुणींसाठीच नावाप्रमाणे हे 'यशस्वी' उदाहरण आदर्शवतच म्हणावे लागेल.

 
 - रामचंद्र नाईक 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat