सीमेवरील घुसखोरी ४३ टक्के घटली

    दिनांक  09-Jul-2019
नवी दिल्ली : सीमेपलीकडून भारतात होणार्‍या घुसखोरीबाबत केंद्र सरकारने राबवलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे परिणाम आता जाणवू लागले असून भारत-पाकिस्तान सीमेवरून भारतात होणारी घुसखोरी ४३ टक्क्यांनी घटली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी याबाबत लोकसभेत माहिती दिली. सीमेवर घालण्यात आलेले विद्युत कुंपण आणि भारतीय सैन्यदलांनी केलेली कडक कारवाई, यामुळे २०१८ च्या तुलनेत यावर्षी घुसखोरीचे प्रमाण ४३ टक्के घटले असल्याचे राय यांनी सांगितले.

 

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील बालाकोट येथे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या दणक्यातून पाकिस्तान व पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना अद्याप सावरलेल्या नाहीत. त्यामुळेच, आता जैश व लष्कर-ए-तोयबा या पाकने खतपाणी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे तळ भारतीय सीमेपासून दूर अफगाणिस्तानात हलविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

 

काही इंग्रजी वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तांनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, लष्कर-ए-तोयबा आणि जैशने अफगाणी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसोबत हातमिळवणी केली असून पाकिस्तानने या लष्कर आणि जैशचे तळ भारतीय सीमेपासून दूर अफगाणिस्तानात हलवले आहेत. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटांच्या मोठ्या गर्तेत सापडला असून त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली आहे.

 

अशातफायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ या समितीने पाकिस्तानला ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकू नये, म्हणून पाकिस्तानने दहशतवादी तळ अफगाणी हद्दीत हलवले असण्याचीही शक्यता आहे. पाकिस्तान सध्या या समितीच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांचे तळ अफगाणिस्तानात हलवल्याच्या या माहितीमुळे काबूल व कंदाहारमधील भारतीय दूतावासांच्या सर्व कार्यालयांना अतिदक्षतेचा इशारादेखील देण्यात आला असल्याचे वृत्त आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat