पुण्यातील ‘तो’ बेपत्ता तरूण बनलाय नक्षलवादी !

    दिनांक  09-Jul-2019 

‘शहरी नक्षलवादा’चे भयाण वास्तव पुन्हा एकदा उघड - कबीर कला मंचाशी संबंध असल्याची पोलिसांची माहिती

 

पुणे/मुंबई : शहरी नक्षलवादाचे भयाण वास्तव पुन्हा एकदा धक्कादायकपणे समोर आले आहे. संतोष वसंत शेलार नामक एक युवक पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. आता हाच युवक छत्तीसगढमध्ये चक्क नक्षलवादी बनला असून माओवादी संघटनेच्या एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर’देखील बनला आहे. तसेच, हा युवक पूर्वी ‘कबीर कला मंच’ या संघटनेशी संबंधित असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

 

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार, संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा हा पुण्यातील भवानी पेठ भागात कासेवाडीमध्ये राहत होता. नोव्हेंबर, २०१० मध्ये ‘पुढील दोन महिने एका कामासाठी मुंबईला जात आहे.असे सांगून संतोष घराबाहेर पडला तो परत आलाच नाही. कुटुंबीयांनी बरीच शोधाशोध केल्यानंतरही तो न सापडल्याने तीन महिन्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. परंतु, पुढे त्याचा काहीच शोध लागला नाही. त्यानंतर आता तो थेट नक्षलवादीच बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष उर्फ विश्वा सध्या २८ वर्षे वयाचा आहे. संतोष केवळ नक्षलवादीच नव्हे तर छत्तीसगढमधील राजनंदगाव जिल्ह्यात सीपीआय (माओवादी) संघटनेच्या ‘तांडा एरिया कमिटी’चा डेप्युटी कमांडर बनला आहे.

 

छत्तीसगढ पोलिसांच्या यादीतून मिळाली माहिती

संतोष शेलार हा नक्षलवादी बनल्याची माहिती छात्तीगढ पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी जारी केलेल्या राजनंदगाव जिल्ह्यातील सक्रीय नक्षलवाद्यांच्या यादीतून मिळाली आहे. या यादीमध्ये त्याचे नाव, वय, पत्ता आणि नक्षलवादी संघटनेतील पदाचा उल्लेख असून त्याचे छायाचित्रही देण्यात आले आहे. तसेच, त्याच्याकडे ३०३ रायफल असल्याचेही यामध्ये म्हटले आहे. पोलिसांनी सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेच्या तांडा एरिया कमिटीतील १४ नक्षलवाद्यांची नावे या यादीत दिली आहेत. या यादीतील विश्वा म्हणजेच पुण्यातील बेपत्ता झालेला युवक असल्याच्या माहितीला राजनांदगाव जिल्हा पोलीस उपनिरीक्षक (नक्षलविरोधी कारवाया) जी. एन. बघेल यांनीही दुजोरा दिला आहे.

 

कबीर कला मंचाशी संबंध

सदर वृत्तानुसार, संतोष शेलार हा पुण्यातील कबीर कला मंच या संघटनेशी संबंधित होता. कबीर कला मंच ही संघटना नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचा आरोप आहे. इयत्ता नववीपर्यंत शिक्षण घेतलेला संतोष चित्रदेखील काढायचा. संतोषसोबतच पुण्यातील ताडीवाला रस्ता येथे राहणारा प्रशांत कांबळे नामक युवकही सीपीआय (माओवादी) संघटनेत सामील झाल्याची माहिती मिळते आहे. कांबळे हा नक्षलवाद्यांच्या तंत्रज्ञानविषयक बाबी सांभाळणाऱ्या चमूत असून तो उत्तर गडचिरोली-गोंदिया डिव्हिजनमध्ये प्लाटून ‘बी’ मध्ये आहे, अशी पोलिसांची माहिती आहे.

 

पाहता पाहता संकट दाराशी..

भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर पोलिसांना जे धागेदोरे मिळाले, त्यानंतर महाराष्ट्रात शहरी माओवादाबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली. मुंबई, पुणे व अन्य मोठ्या शहरांतून, विशेषतः पुण्यातून वरून मानवाधिकार, संविधान, सामाजिक न्याय आदींची भाषा करत धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणाऱ्या अनेक डाव्या कंपुंचे वास्तवात नक्षलवादी संघटनांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धागेदोरे असल्याचे या विषयातील अभ्यासक गेली अनेक वर्षे सातत्याने सांगत आहेत, तेही पुराव्यांनिशी. मात्र, बघता बघता शहरी नक्षलवादाची पाळेमुळे आपल्या दारांपर्यंत येऊन पोहोचली असून यावर वेळीच कठोरात कठोर पावले उचलून ही पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे, हेच विश्वा व कांबळे प्रकरणांतून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat