मुंबईकरांचा आजपासून स्वस्तात 'बेस्ट' प्रवास, किमान तिकीट ५ रुपये

    दिनांक  09-Jul-2019


 

 
मुंबई : मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. आजपासून बेस्टचा प्रवास स्वस्त झाला आहे. बेस्टचे किमान भाडे आठ रुपयांवरून पाच रुपये तर एसी बसचे किमान भाडे सहा रुपये असणार आहे. बेस्टने दिलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आज ९ जुलै पासून बेस्टच्या दरात कपात करण्यात आली आहे.
 
 

गेल्या महिन्यात २१ जूनला ‘बेस्ट’ उपक्रमाने प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी या नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. बेस्टने दिलेल्या प्रस्तावानुसार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाने केलेल्या शिफारशीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली. त्यानुसार ही अधिसूचना काढण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबईमध्ये स्वस्तात प्रवास करता येणार आहे. यापूर्वी बससाठी पहिल्या २ किमीला ८ रुपये तिकीट दर होता. मात्र आता पहिल्या ५ किमीला ५ रुपये मोजावे लागणार असल्याचे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. वातानुकूलित बसचे (एसी) दरही आता खिशाला परवडणारे असतील. एसी बसचे तिकीट ५ किमीपर्यंत ६ रु., १० किमीसाठी १३ रु., १५ किमीसाठी १९ रु. आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २५ रु. असणार आहेत.

 
 

सकाळच्या वेळेत शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी आज बेस्टने प्रवास केला. टॅक्सीने प्रवास केल्यास १० ते १५ रुपये मोजावे लागत होते. मात्र आता जवळच्या अंतरासाठी पाच रुपये द्यावे लागणार असल्याने मुंबईकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

 
 
 
 
 

नवीन तिकीट दर

कि.मी – साधी बस – एसी बस

५ किमी – ५ रुपये – ६ रुपये

१० किमी – १० रुपये – १३ रुपये

१५ किमी – १५ रुपये – १९ रुपये

 

पास : साधी बस ५० रुपये, एसी बस ६० रुपये
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat