मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर मुंबई कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

    दिनांक  09-Jul-2019

 

 
 
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मदत केली नाही: उर्मिला मातोंडकर यांचा आरोप

मुंबई : मिलिंद देवरा यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर मुंबई कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार राहिलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात मदत न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यासंदर्भातील जुने पत्र समोर आले आहे.

 

उर्मिला मातोंडकर यांनी दोन महिन्यांपूर्वी मिलिंद देवरा यांना नऊ पानांचे पत्र लिहिले होते. १६ मे या दिवशीचे हे पत्र असल्याचे उघड झाले आहे. देवरा यांना लिहिलेल्या पत्रात निरूपम यांचे निकटवर्तीय संदेश कोंडविलकर आणि भूषण पाटील यांच्यावर प्रचारात सहाय्य न केल्याचा मातोंडकर यांनी आरोप केला आहे. तसेच लोकसभा निवडणूक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी योग्य प्रकारे हाताळली नसून चुकीची रणनीती आखल्याचेही उर्मिला मातोंडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

 

मुंबई कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

संजय निरूपम यांनी मिलिंद देवरा यांच्यावर ट्विटरवरून नाव न घेता टीका केली आहे. यामध्ये त्यांनी उर्मिला मातोंडकर यांनी १६ मे रोजी मिलिंद देवरांना लिहिलेले पत्र आताच कसे प्रसार माध्यमांना दिले गेले, असा प्रश्न केला. ते आपले मार्गदर्शक जेटलींकडून शिकले आहे का? असा उपरोधिक टोला देखील लगावला आहे.

 
 
 
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat