कमी पैशात गारेगार प्रवास : बेस्टच्या ताफ्यात लवकरच ४०० एसी गाड्या

    दिनांक  09-Jul-2019


 


मुंबई : मुंबईकरांना आता थोडक्या पैशात मुंबई कोठेही आणि नाममात्र दरात जवळचे अंतरात प्रवास करण्याची सुविधा उपल्ब्ध झाली असताना त्यांचा प्रवास गारेगारही होणार आहे. बेस्टच्या ताफ्यात लवकरच चारशे एसी मिनी बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे एसी गाडीतून प्रवास करणे ही उच्चभ्रूंची मक्तेदारी न राहता त्याच दिमाखात आता सर्वसामान्यही प्रवास करू शकणार आहेत.

 

सध्या बेस्टच्या ताफ्यात ३३०० गाड्या आहेत. मात्र त्यापैकी २९०० बसेस रस्त्यावर धावतात. मात्र रस्त्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस वेळेवर दाखल होत नाहीत. त्यामुळे बेस्ट बसची वाट पाहून कंटाळलेले लांबचे प्रवासी टॅक्सी, ओला-उबेरचा आधार घेतात, तर जवळचे प्रवासी शेअर रिक्षाकडे वळतात. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. प्रवासी बेस्टकडे आकर्षित व्हावे म्हणून बेस्टने प्रवासभाडे कमालीचे कमी केले असून जवळजवळ ते निम्म्यावर आणले आहे. तसेच बेस्ट बसेसचा ताफाही सहा हजारांपर्यंत नेण्याचे धोरण तयार ठेवले आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून ४०० एसी मिनी बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत.

 

ऑगस्ट महिन्यात १०० बसेस दाखल होणार असून ऑक्टोबरमध्ये २०० आणि नोव्हेंबरमध्ये १०० बसेस दाखल होणार आहेत. अँटोनी गॅरेजेस आणि श्री कृपा सर्व्हिसेस यांना हे कंत्राट देण्यात आले असून त्यासाठी ५८७,४९,६०,००० रुपये खर्च येणार आहे. सात वर्षांच्या कालावधीकरिता हे कंत्राट राहणार आहे. सुरुवातीला २०० एसी मिनी, २०० साध्या मिनी आणि ५० साध्या मिडी बसेस खरेदीचा प्रस्ताव होता. मात्र एसी आणि साध्या बसेसच्या तिकीटदरात पहिल्या पाच किलोमीटरसाठी विशेष फरक नसल्याने साडेचारशे बसेस खरेदी करण्याऐवजी चारशे एसी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

 

एसी बसेसबाबत माहिती देताना महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले की, बेस्टमध्ये सुधारणा करण्याचे गेल्या अडीच वर्षांपासूनचे प्रयत्न आहेत. त्यासाठी ताफ्यात १० हजार बसेसचे उद्दिष्ट आहे. मात्र पहिला टप्पा म्हणून सहा हजार बसेसचे लक्ष्य आहे. त्यापैकीच पहिल्यांदा चारशे एसी बेसस ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये याबाबत अँटोनी गॅरेजेस आणि श्रीकृपा सर्व्हिसेस यांना यासाठी देकार देण्यात आला. मात्र मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्यामुळे हा करार पूर्णत्वास जाण्यास विलंब झाला. दरम्यान जुना करार रद्द करून आता नवीन एसी मिनी गाड्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यासाठी दोन्ही पुरवठादारांनी संमती दर्शविली.

 

एसी गाड्यांना पसंती

सध्या वांद्रे ते बीकेसी या मार्गावर एमएमआरडीएच्या एसी बसेस चालत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. त्याधर्तीवर कमी अंतरावरसुद्धा मिनी एसी बसेस चालविल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, याचा विचार करूनच पहिला साध्या मिनी-मिडी बसेसचा करार रद्द करून नवी एसी बसेसचा करार करण्यता येत आहे, असे बागडे यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat