हे 'बेस्ट'च झालं : भाडेकपात कळताच प्रवासी आनंदी

    दिनांक  09-Jul-2019मुंबई : सकाळी बेस्ट बसमध्ये स्थानापन्न होताच पहिल्या टप्प्यासाठी पाच रुपयांचे आणि लांबच्या प्रवासासाठी २० रुपयांचे तिकीट हातात पडताच प्रवाशांना आनंदाचा धक्काच बसला. कंडक्टरची झोप उडाली नसेल असे म्हणून काहीनी `हे काय, पैसे कमी कसे घेतले?` अशी विचारणा केली. मात्र आजपासून तिकीटदर कमी केल्याचे समजताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.


सध्याच्या महागाईच्या दिवसात खरे तर प्रत्येक गोष्टीचे दर वाढतच असतात. मात्र तिकीट दर कमी आणि तेही निम्म्यान कमी होणे ही ऐतिहासिक घटना आहे. मात्र जास्त गाजावाजा न होता कमी भाड्याचे तिकीट हातात पडल्याने प्रवासी चक्रावूनच गेले.


बेस्ट प्रशासनाने तिकीट दरात कपात केल्याचा निर्णय रात्री उशिरा जाहीर केला. त्यामुळे अनेकांना हा निर्णय माहितीच नव्हता. इतर वेळेला भाडेवाढ होते आणि त्यावर मोठे चर्वितचर्वण होते. त्यामुळे अमुक दिवसापासून भाडेवाढ होणार हे प्रवाशांना माहिती असते. त्याप्रमाणे नाइलाजाने का हाईन, ते भाडे देण्यासाठी तयार असतात. मात्र भाडेकपातीचा प्रवाशांच्याच हिताची माहिती प्रवाशांनाच माहिती नव्हती. सकाळी अपेक्षित किमतीऐवजी कमी किमतीचे तिकीट त्यांच्या हातात पडताच त्यांना त्याबाबत आश्चर्य वाटले.


बेस्ट प्रशासनाने हा चांगला निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. परंतु तिकीट दरात कपात केली असली, तरी बस संख्येत वाढ करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. दरम्यान, तिकीट दर कमी केले, तरी बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर नाराजीच दिसत होती.


बेस्टचे किमान भाडे हे २ किमीसाठी ८ रुपये होते ते आता ५ किमीपर्यंत ५ रुपये तर एसी बससाठी ६ रुपये, १० किमीसाठी पूर्वी २२ रुपये असलेले भाडे आता १० रुपये तर एसी बससाठी १३ रुपये, १४ किमीसाठी २८ रुपये भाडे होते आता १५ किमीसाठी १५ रुपये तर एसी बससाठी १९ रुपये , आणि १५ किमी पेक्षा जास्त अंतरासाठी ६२ रुपयांपर्यंत असलेले भाडे आता सरसकट २० रुपये तर एसी बससाठी २५ रुपये एवढे कमी आकारण्यात येणार आहे.


दैनंदिन बसपास साधारण बससाठी ५० रुपये तर एसी बससाठी ६० रुपये एवढे करण्यात आले आहे. तसेच मासिक, त्रैमासिक बसपासच्या दरातही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला असून साधारण बसने अवघ्या २० रुपयांत तर एसी बसने अवघ्या २५ रुपयांत मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रवास करता येणार आहे.


जिवाची मुंबई


दैनंदिन पासचे दर आता साधारण बससाठी अवघे ५० रुपये तर एसी बससाठी ६० रुपये करण्यात आल्याने या पासच्या जोरावर मुंबईत कोठेही दिवसभर अगदी कितीही वेळा फेरफटका मारण्याची सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे तरुणाईला जीवाची मुंबई करता येणार आहे.


चांगला प्रतिसाद


बस भाडे कपातीच्या पहिल्याच दिवशी बस स्थानकात प्रवाशांची चांगली गर्दी दिसून येत होती. शेअर रिक्षा, टॅक्सीचे प्रवासी बेस्ट बसकडे वळत होते. काही ठिकाणी बस स्थानकात प्रवाशांच्या लांब रांगा निदर्शनास आल्या. तर रिक्षांना मिळणारा प्रतिसाद कुठेतरी कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवत होता.


...
म्हणूनच तातडीने निर्णय

बेस्टची दरकपात करायची होतीच. त्यातच मंगळवारी रिक्षाचालकांनी संप पुरकाला होता. या संपाचा नागरिकांवर परिणाम होऊ नये यासाठी आणि बेस्टची भाडेकपात अमलात आणण्यासाठी हा चांगला मुहूर्त असल्याचे लक्षात येताच राज्य शासनाचा परिवहन विभागाने तातडीने परवानगी दिली. तसेच बेस्टनेही सोमवारी रात्रीच भाडेकपातीची अंमलबजावणी केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat