ग्रामविकासाचे सृजन सेवा सहयोग

    दिनांक  09-Jul-2019


 


शिक्षण, आरोग्य, वस्ती विकास, महिला सबलीकरण इत्यादी अनेक आयामांमधून सेवेची पंढरी असलेली सेवा सहयोग संस्था काम करत आहे. ग्रामविकास हादेखील त्यातला महत्त्वाचा पैलू. गावाचा विकास करताना व्यक्ती आणि त्याचबरोबर त्याच्या कुटुंबाचा आणि परिसराचा विकास करणारा सेवा सहयोगचा आणखी एक संवेदनशील आणि अर्थपूर्ण उपक्रम म्हणजे 'सृजन'.

 

सृजन कसा मन चोरी.. हे गीत फळाची कामना न करता कर्म करा, सांगणार्‍या भगवान श्रीकृष्णाला उद्देशून आहे. तर निःस्वार्थी सत्कर्म करा, सांगणार्‍या श्रीकृष्णाच्या परंपरेतलाच हा सेवासहयोगचा सृजन उपक्रम. उदा. सफाळा, पालघर वगैरे परिसरामध्ये बहुसंख्य कुटुंबे भाजीफळे पिकवणारी. अथक मेहनत घेऊन दीर्घ चिकाटीने या गावचे लोक पारंपरिक पद्धतीने भाजी-फळं पिकवायची. जिथे पिकते तिथे विकत नाही, हेच सत्य. त्यामुळे भाज्यांना दीडदमडीचा भाव. सेवा सहयोगने या विषयाची गंभीरता जाणली. यात काय करता येईल? असा विचार करत असताना सेवा सहयोगचे संजय हेगडे यांनी ठरवले की, आपल्या मुंबईमध्ये लोकांना ताज्या आणि रासायनिक खतांचा वापर न केलेल्या चांगल्या प्रतीच्या आणि चवीच्या भाज्या मिळतच नाहीत. जर या गावातल्या भाजीपाल्याला शहराशी जोडले तर...

 

चांगली संकल्पना सुचली की करू रे, बघू रे असे न करता तत्काळ अमलात आणायची, हा सेवा सहयोग आणि संबंधित सर्वांचा अंगभूत गुणच. त्यामुळे या गावातील जे शेतकर्‍यांसाठी संजय यांनी अर्थार्जनाची चांगली संधी उपलब्ध करून दिली. त्यानुसार शहरात भाजीपाला विकायची इच्छा असणार्‍या शेतकर्‍याने आठवड्यातून एकदा शहरामधिल सोसायटीत यायचे. आपण काय भाजी घेऊन येणार आहोत, हे आदल्या रात्री कळवायचे. सोसायटीतल्या लोकांना शेतकरी कधी आणि कोणती भाजी घेऊन येणार आहे, हे आदल्या रात्रीच कळवले जायचे. त्यामुळे ज्यावेळी शेतकरी सोसायटीमध्ये येतो, तेव्हा भाजी घेण्यासाठी सोसायटीतल्या लोकांची झुंबड उडते. अवघ्या एका तासात भाजी संपून जाते. यामुळे शेतकर्‍याला कुणाचीही मध्यस्थी न करता हक्काची बाजारपेठ मिळाली, तर दुसरीकडे शहरातल्या लोकांना ताजी आणि हवी ती भाजी घरपोच मिळाली.

 

शिवार ते शहर असे या योजनेचे नाव. ग्रामीण भागातील, तसेच शहरी सेवा वस्तीमधील माणसाच्या जगण्याला माणूसपणाचा आयाम कसा देता येईल, याचा विचार अखंडपणे संजय करत असतात. त्यामुळेच शिवार ते शहर अशी शेतकर्‍याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना असू दे की, 'सृजन'सारखी सर्वकल्याणाची ग्रामविकासाची योजना असू दे, संजय त्यामध्ये नवचेतना आणि गती देतात. ज्या सृजनशीलतेने दुसर्‍याच्या अंधार्‍या आयुष्यात आशेचा किरण चमकतो, ती सृजनशीलता शब्दातीतच म्हणायला हवी. सेवा सहयोगनेही ग्रामविकास करताना अनेक संकल्पना राबवल्या.

 

ग्रामविकासाची जबाबदारी असणार्‍या सेवा सहयोगचे कार्यकर्ते उमेश सावंत यांनी ग्रामविकासच्या संकल्पनेबाबत सांगितले की, ”गावाचा विकास करायचा म्हटले की, पाणी, वीज, रस्ते, शौचालय ते आरोग्य वगैरे वगैरे गोष्टी चटकन डोळ्यासमोर उभ्या राहतात. ग्रामविकास करताना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लोकसहभाग असणे महत्त्वाचे असते. पण भुके पेट भजन न हो गोपाला... हे आपण ऐकले आहे. पुष्कळदा काय होते की, गावामध्ये कित्येक घरात पोट भरायला दोन वेळचे अन्न मिळणेही मुश्किल असते. आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली असते. त्यामुळे गावाचा विकास व्हावा, हे त्यांनाही वाटत असले तरी ते त्यामध्ये सहभागी होत नाहीत. ग्रामविकासामध्ये या खर्‍या अर्थाने गरजू आणि आर्थिक वंचितांचा विचार करायला हवा, असे सेवा सहयोगच्या सर्व वरिष्ठांनी ठरवले. त्यानुसार असे ठरवले गेले की, गावातल्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायला हवे.

 

ते कष्टकरी आहेत, कामाला ना करत नाहीत. पण, रोजगार कौशल्य त्यांच्यामध्ये नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यासाठी सेवा सहयोगने ठरवले की, गावातच इच्छुक लोकांना त्यातही महिलांना काम मिळायला हवे. त्या कामाचे योग्य दामही मिळायला हवे. त्यातूनच मग सेवा सहयोगने महिलांना कौशल्य विकासाच्या दिशा दर्शविल्या. यामध्ये कापडी पिशव्या शिवणे, दिवाळीसाठी सुंदर आकर्षक पणत्या रंगवणे वगैरे शिकवले जाते. आता काही महिन्यात गणेशोत्सव आहे. गणपती मंडळांनी उत्सवा दरम्यान प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरता सृजन उपक्रमाअंतर्गत महिलांनी शिवलेल्या कापडी पिशव्या वापरायला हव्यात. काही गणपती मंडळांनी या कल्पनेसाठी होकारही दिला आहे.”

 

असो, महिलांशी संपर्क साधणे, त्यांना प्रशिक्षण देणे, तसेच कापडी पिशव्यांची डिझाईन बनवणे आणि तशाच पिशव्या महिलांकडून बनवून घेणे, ही जबाबदारी उमेश यांनी लिलया पेलली. पुढे या महिलांना ब्लॉक प्रिटिंगचेही प्रशिक्षण विनामूल्य दिले गेले. त्यामुळे महिला कापडी पिशव्या शिवून त्यावर कलाकुसरही करायला शिकल्या. इथेच 'सृजन' उपक्रम थांबला नाही तर या महिलांनी कार्पोरेट कंपन्यांची शिस्त शिकावी यासाठीही सेवा सहयोगने महिलांना संधी उपलब्ध करून दिल्या. काही कॉर्पोरेट कंपनी सेवा सहयोगबरोबर सीएसआर ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी करतात. एका कंपनीने सुचविले की, आमच्या कंपनीच्या कर्मचारी वर्गाला ब्लॉक प्रिंटिंग शिकवाल का? ग्रामीण भागातील ज्या महिला सेवा सहयोगच्या सृजन उपक्रमामध्ये कापडी पिशव्यांवर सुबक ब्लॉक प्रिंटिंग करत, त्याच महिलांना कंपनीमध्ये प्रशिक्षक म्हणून संधी दिली गेली. या महिलांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचार्‍यांना ब्लॉक प्रिंटिंग शिकवलेच, शिवाय २००० कापडी पिशव्यांवर या कर्मचार्‍यांकडून ब्लॉक प्रिंटिंगही करून घेतले. आता या महिला ब्लॉक प्रिंटिंगच्या निष्णात प्रशिक्षक झाल्या आहेत.

 

महिला सक्षमीकरणाच्या 'सृजन' उपक्रमाबद्दल अक्षय वणे म्हणाले की, “गेल्या वर्षभरात आम्ही महाराष्ट्राच्या ५ जिल्ह्यातील १० तालुक्यातील ग्रामीण भागात, गावपाड्यांवरील आणि पुणे, मुंबई शहर, उपनगरातील सेवा वस्तीत राहणार्‍या महिलांना प्रशिक्षण देत आहोत. आतापर्यंत ५०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे. ३०० हून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे. प्रारंभी महिन्याला किमान १५०० ते २००० रुपये मिळतील, असा आमचा प्रयत्न आहे. सहा खणी पिशवीच्या माध्यमातून आम्ही थेट अमेरिकेतील किम मायग्रेत या समाजसेविकेशी एक कार्यकर्त्याच्या माध्यमातून जोडले गेलो व त्यांनी अमेरिकन डॉलर व भारतीय चलनाप्रमाणे एक पिशवी ७०० रुपये दराने खरेदी करून या महिलांकडून १०० पिशव्या खरेदी केल्या.

 

अनेक कंपन्या सेवा सहयोग सोबत जोडून महिलांना काम कसे देता येईल व त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देता येतील, असा प्रयत्न सुरू आहे. त्यांना लागणार्‍या पिशव्या महिलांकडून बनवून घेत आहेत. यामध्ये दिल्लीची मायक्रोकॉल्स कंपनी असेल, छोट्या डॉक्युमेंटरी बनविणार्‍या कंपन्या असतील, आपल्या चित्रपटांची जाहिरात व्हावी म्हणून महिलांनी बनवलेल्या विविध डिझाईनच्या पिशव्या महिला बनवून देऊ लागल्या आहेत. डी. एस. पी. कंपनीने आम्हाला पिशव्या बनविण्याची संधी दिली आहे. समाजाकडून अधिक सहकार्य मिळाले तर आपण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करू शकू, असा विश्वास आहे.

 

तर अनेक सेवाभावी उपक्रमांशी जोडले गेलेले संस्थेचे रमेश देवळे म्हणाले की, ”गेली २ वर्षे रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ९ गावांमध्ये (सर्वेक्षणानंतर) अभ्यासिका सुरू झाल्या. ४५० हून अधिक मुलं- मुली नियमितपणे अभ्यासिकेत येऊ लागल्या. त्यांच्या बरोबरीने पालक, अन्य गावकर्‍यांचा सहभाग वाढला. विद्यासागर एज्युकेशन फाऊंडेशनने या प्रकल्पामध्ये पूर्ण आर्थिक सहकार्य देण्याचे मान्य केले. सर्वांसोबत होत असणार्‍या चर्चेतून स्थानिक महिलांमधील कलागुणांना अधिक बळकटी देण्याचे ठरले.

 

जाम्बिवली, गौरकामत, वदप, सळोख, बारणे या गावांतील महिलांमध्ये काही प्रशिक्षणाचे उपक्रम २ वर्षांपूर्वी सुरू झाले. महिला सबलीकरण विषयात गेल्या २ वर्षांपासून अनेक प्रशिक्षणाचे आयोजन या गावांमध्ये करण्यात आले. शिवणकला, प्रक्रिया उद्योग (मसाले मेकिंग) कापडी पिशव्या, पेन्सिल पाऊच इ. प्रशिक्षण देण्यात आले. त्यामधील १० महिलांचा एक गट १२ प्रकारचे मसाले निर्मिती करून कर्जत शहरात विक्री करू लागला आहे. महिलांचे कपडे अनेकजणी शिऊ लागल्या. त्यांचा आत्मविश्वासही वाढला. सेवा सहयोगच्या माध्यमातून कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये लागणार्‍या स्टॉलवर मसाल्यांची विक्री होऊ लागली. एक गट उत्तम पौष्टिक आहार तयार करतो. क्रीडा विकास प्रकल्पात खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी येतात, त्यांना रोज जो आहार दिला जातो, तो आहारही या महिला आता बनवून देऊ लागल्या आहेत. या सर्व उपक्रमांतून प्रत्येक महिलेला घर-संसार सांभाळून २-३ हजार रुपये मिळतात. तसेच आर्थिक नियोजन, शासनाच्या योजना, पाणी, ग्रामविकास या विषयावर जनजागृती उपक्रम सेवा सहयोगमार्फत राबविले जात आहेत.”

 

अर्थात किशोर मोघे किंवा संजय हेगडे ज्या 'सेवा सहयोग' संस्थेचे पदाधिकारी आहेत, ती 'सेवा सहयोग' सेवेच्या अमूल्य व्रताशिवाय व्यावसायिकतेचा विडा उचलणार नाही, हे तर नक्की. त्यामुळे 'सेवा सहयोग'ने 'ना फायदा ना तोटा' तत्त्वावर महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पंडित दीनदयाळ यांनी एकात्म मानवतावादाच्या विचारांमध्ये परस्परावलंबिता, परस्परसहभागिता आणि परस्परसमन्वयता या बाबींचा उल्लेख आदर्श समाजरचनेसाठी केला आहे. सृजन या एकात्म मानवतावादाच्या अंत्योदयाची भूमिका घेऊन काम करत आहे.

 

९५९४९६९६३८

संजय हेगडे ९८२००६२४८४

उमेश सावंत ९९२३४५२७७३

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat