विराटसेना किवींची शिकार करणार?

    दिनांक  08-Jul-2019 

आज भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामना रंगणार


मँचेस्टर : साखळी फेरीतून पहिल्या स्थानासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रूबाबात प्रवेश करणारा भारतीय संघ आणि क्रिकेटच्या इतिहासातील आपल्या पहिल्यावहिल्या विश्वचषक विजयाची आतुरतेने वाट पाहणारा न्यूझीलंडचा संघ, यांच्यात उद्या म्हणजे मंगळवारी पहिला उपांत्य सामना होणार आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या दोन तगड्या संघांतील या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

 

साखळी फेरीत अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला सहजपणे नमवत ७ विजयांसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने पहिले स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ ५ विजयांसह चौथ्या स्थानी राहिला. द. आफ्रिकेने अखेरच्या सामन्यात पराभूत केल्याने गेले अनेक दिवस पहिले स्थान उपभोगणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दुसरे स्थान मिळाले तर ६ विजयांसह इंग्लंडला तिसरे स्थान मिळाले. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार उपांत्य फेरीतील सामने हे क्रमवारीतील पहिल्या आणि चौथ्या संघांदरम्यान व दुसऱ्या आणि तिसऱ्या संघांदरम्यान खेळवले जाणार आहेत. त्यामुळे भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार असून गुरूवारी बर्मिंगहॅममध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांत दुसरा अंतिम सामना होणार आहे. उपांत्य फेरीत अपेक्षेनुसार हे चार संघ पोहोचल्यामुळे उपांत्य फेरी भलतीच चुरशीची आणि रंगतदार होणार आहे.

 

भारताकडून फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल यांनी जबरदस्त प्रदर्शन केले असून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघात कर्णधार केन विल्यम्सन यालाच स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आली असून अन्य फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी बजावलेली नाही. गोलंदाजीत मात्र लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट इ. यांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या मधल्या फळीचा प्रश्न मात्र अद्यापही सुटताना दिसत नसल्याने भारतीय फलंदाजीची मुख्य मदार ही पहिल्या तीन फलंदाजांवरच असणार आहे. विशेषतः, रोहित शर्माने कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन करत या मालिकेत ५ शतके व सर्वाधिक धावा फटकावल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

 

शमी-चहल इन, भुवनेश्वर-यादव आऊट?

 

भारतीय संघातील गोलंदाजांमध्ये कुणाला स्थान मिळणार, याची सर्वांनाच उत्सुकता असेल. गेल्या काही सामन्यांतील कामगिरीचा विचार करता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना संधी मिळण्याची शक्यता असून भुवनेश्वर कुमार व कुलदीप चहल यांना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमी, चहलला बसवत भुवनेश्वर आणि रवींद्र जडेजाला संधी मिळाली होती. पैकी जडेजाने चांगली कामगिरी केल्याने तसेच त्याचा फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या तीनही आघाड्यांवर उपयोग असल्याने जडेजाला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

जिंकणारच!

प्रत्येक अटीतटीच्या क्षणी भारतीय संघाने स्वतःला सिद्ध केले आहे. उद्याच्या सामन्यातही आम्ही जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार असून तशीच आमची व्यूहरचना असेल.

- विराट कोहली, कर्णधार, भारत