मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; जगताप आणि निरुपम यांच्यात ट्विटर 'युद्ध'

    दिनांक  08-Jul-2019


 


मुंबई : मुंबई काँग्रेसमधील गटबाजी व अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. याला कारण ठरलं ते मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा राजीनामा. देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांच्यावर टीका केली होती. हा राजीनामा आहे की, मोठ्या पदावर जाण्यासाठीची शिडी? असा सवाल उपस्थित करत निरुपम यांनी ट्विटद्वारे देवरा यांचे नाव न घेता यांच्यावर निशाणा साधला होता.


राजीनामा देण्यासाठी त्यागाची भावना ही अंतर्मनातून येत असते. मात्र येथे तर राजीनामा दिल्यानंतर लगेच राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जाते. त्यामुळे हा राजीनामा आहे की, मोठ्या पदावर जाण्यासाठीची शिडी? असा सवाल निरुपम यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. एवढंच नाही तर काँग्रेसने अशा 'कर्मठ' लोकांपासून सावध राहायला पाहिजे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.


निरुपम यांच्या ट्विटनंतर काहीवेळातच देवरा यांची बाजू घेत भाई जगताप यांनी निरुपम यांच्यावर टीका करणारे ट्विट केले. यात त्यांनी काँग्रेसी असल्याचा दावा करणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करत असल्याचा टोला लावला. ते अन्य नेत्यांचा अपमान करतात आणि त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यानंतरही त्यांचा अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभव होतो. अशा 'कर्मठ' नेत्यांपासूनच सावध राहायला पाहिजे असे म्हणत जगताप यांनी निरुपम यांना प्रतिउत्तर दिले. त्यामुळे या ट्विटरवादावरून मुंबई काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले असून आगामी काळात याचे काँग्रेसवर कसे परिणाम होतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat