मध्यरात्रीपासून राज्यातील रिक्षाचालक बेमुदत संपावर

    दिनांक  08-Jul-2019

 

 

मुंबई : मुंबईसह राज्यातील २० लाख रिक्षाचालक आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. यामुळे ९ जुलैला राज्यात रिक्षा रस्त्यावर धावणार नाहीत. रिक्षाची भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबेरसारख्या टॅक्सी सेवा त्वरित बंद करणे, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी संप पुकारला आहे. यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

 

राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वेळोवेळी मागण्या मांडल्या. परंतु मागण्या पूर्ण करण्याबाबत सरकारकडून कोणतेही पावले उचलण्यात आली नाहीत, असा रिक्षाचालक संघटनांचा आरोप आहे. या महासंपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. या संपामुळे दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.

 

काय आहेत प्रमुख मागण्या?

* रिक्षा भाडे चार ते सहा रुपयांनी वाढवावे

* ओला, उबर सारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा बंद करावी

* बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथकं नेमावीत

* विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे कल्याणकारी महामंडळात भरले जावेत

* चालक-मालकांना पेन्शन, ग्रॅज्युईटी, पीएफ आणि वैद्यकीय मदत दिली जावी

* हकिम समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ करण्यात यावी

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat