खेळ लिंगभेदापलीकडे...

    दिनांक  08-Jul-2019   
मुंबईत स्वत:ची पहिली क्रिकेट अकादमी सुरू करणार्‍या महिला क्रिकेटपटू नीता चापले. अशा या क्रिकेटमध्ये राष्ट्रीयस्तरावर आपल्या खेळाची छाप सोडणार्‍या नीता चापले यांच्या आयुष्याचा हा आलेख...

 

नीता चापले या राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी बजावलेल्या आणि स्वत:ची क्रिकेट अकादमी असलेल्या पहिल्या महिला क्रिकेटपटू. त्याशिवाय नीता या 'महाराष्ट्र युवक व क्रीडा संचालनालय' शाळांमधील क्रिकेट खेळाच्या निवड समितीच्या सदस्या आहेत. १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेटसंघाच्या त्या प्रशिक्षिका होत्या. या मुलींच्या संघाने महाराष्ट्राला पहिल्यांदा रौप्यपदक मिळवून दिले होते. इतकेच काय, नीता यांनी 'क्रिकेटच्या ऐश्वर्या' या पुस्तकाचेही लेखन केले आहे. या पुस्तकामध्ये महिला क्रिकेट तसेच महिला क्रिकेटपटूंबाबतचे वर्णन आहे. आता सध्या त्या एका शाळेमध्ये क्रिकेट प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. वैयक्तिकरीत्या 'पॉवर लिफ्टिंग' या खेळाचा त्या सराव करीत आहेत. 'क्रिकेट मार्गदर्शक ते पॉवर लिफ्टिंग' हे त्यांचे दुसरे पुस्तक. नीता यांच्या यशाचे कौतुक तर वाटतेच, पण त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा पट उलगडला की, त्यांच्यातल्या खेळाडूचे माणूसपण आणि त्या माणसाचे सगळे जगणे, भोगणे प्रकर्षाने जाणवते.

 

नागपूरच्या अ‍ॅड. हरी भोयर आणि निर्मला भोयर यांना दोन अपत्ये. त्यातील एक नीता. घरातले वातावरण सर्वसामान्यच. मुलीने घर सांभाळावे, आईला घरकामात मदत करावी, असेच चारचौघांसारखेच वातावरण. वडिलांना नीताबद्दल कौतुकच. मात्र, रितीरिवाज आणि कर्मठता घरात होती. मात्र, नीता यांचे आजोबा पहिलवान आणि आई शाळेमध्ये असताना खो-खो खेळायची. त्यामुळे नीता यांच्या रक्तातच खेळाचे वेड होते. या वेडाला घरच्या थोड्याबहुत कर्मठपणामुळे सुरुवातीला थोडा चाप बसलाच म्हणा. लहानपणी कबड्डी खेळात गती असतानाही नीता यांनी कबड्डी खेळणे सोडले. कारण, कबड्डी खेळताना हाफ पॅन्ट घालावी लागेल आणि घरातून आपल्याला अजिबात परवानगी मिळणार नाही, याची त्यांना खात्री होती. पण, खेळाची आवड असल्याने नीता यांच्यामध्ये पुढे क्रिकेटची आवड निर्माण झाली. घरून क्रिकेट खेळण्याची परवानगी घेताना वडिलांचे म्हणणे होते की, "तुला क्रिकेट खेळण्यास परवानगी देतो, पण ७ वाजण्याच्या आत तू घरात हवीस आणि कुणी असं म्हणता नये की, भोयरची मुलगी पाहा कशी रंग उधळते. त्यामुळे एक लक्षात ठेव, तुला मुलींच्या सोबतच क्रिकेट खेळण्याची परवानगी आहे."

 

नीता यांनीही भोयर घराण्याचे नाव राखलेच. विदर्भ संघातर्फे खेळताना त्यांनी नाबाद ९१ धावा काढल्या. त्यावेळी नव्वदचे दशक होते. महिला क्रिकेटला तेव्हा इतकी प्रसिद्धी नव्हती. तरीही कित्येक वर्तमानपत्रांमध्ये नीता यांच्या खेळाची बातमी आली. अ‍ॅड. हरी यांचे न्यायाधीशांनी थांबवून अभिनंदन केले की, तुमची मुलगी चांगले क्रिकेट खेळते. त्यावेळी अ‍ॅड. हरींना आनंद झाला. त्यातूनच मग नीता यांना राष्ट्रीयस्तरावर खेळण्यासही घरातून परवानगी मिळाली. मात्र, १९९४ साली काही कारणास्तव नीता यांना क्रिकेटला विश्रांती द्यावी लागली. मग या कालावधीमध्ये नीता यांनी कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे नीता यांचा विवाह मुंबईच्या नितीन चापले यांच्याशी झाला. त्यांनी नीताला क्रिकेटमधील करिअरसंबंधी प्रेरणा दिली. २००५ साली म्हणजे क्रिकेट सोडल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी नीता यांनी स्वत:ची क्रिकेट अकादमी स्थापन केली.

 

त्यावेळी चापले म्हणाले, "तू चांगले यश मिळव. क्रिकेट हे पुरुषबहुल क्षेत्र आहे, पण मी सदैव खंबीरपणे तुझ्या सोबत आहे." त्या कालावधीमध्ये क्रिकेट प्रशिक्षण क्षेत्रात नीता यांनी चांगलाच जम बसवला. त्यांची मुलगी ऐश्वर्याही क्रिकेट शिकू लागली, खेळू लागली. ऐश्वर्याही मग नीता यांना नेहमीच प्रोत्साहन देई. ती म्हणायची, "आई, तू खूप 'क्रिएटिव्ह' आणि 'एनर्जेटिक' आहेस. तू स्वत:ला कुठेही बांधून न घेता खेळाकडे लक्ष दिलेस, तर छान होईल." त्याच कालावधीमध्ये नीता यांचा शिष्य अतुल सिंग राष्ट्रीय संघातून क्रिकेट खेळू लागला. एका महिला प्रशिक्षकाने राष्ट्रीयस्तरावरील पुरुष खेळाडू घडवावा, हे अभिमानास्पदच आहे. ज्या दिवशी तो पहिल्यांदा राष्ट्रीयस्तरावर खेळणार होता, तो दिवस प्रशिक्षक म्हणून नीता यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवसच ठरला असता. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याच दिवशी नीता यांच्या मुलीचा ऐश्वर्याचा अपघाती मृत्यू झाला.

 

एक आई म्हणून नीता पुरत्या कोसळून गेल्या. २००५ साल होते ते. मुलगी ऐश्वर्याच्या आयुष्याला समर्पित म्हणून मग त्यांनी 'क्रिकेटच्या ऐश्वर्या' या नावानेच पुस्तक प्रकाशित केले. मुलीचा मृत्यू विसरणे कदापि शक्य नव्हते. त्यामुळे क्रिकेट पाठी पडले. मात्र, ऐश्वर्याचे बोलणे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ती म्हणाली होती की, "आई, तू कुठेही बांधून न घेता खेळाकडे लक्ष दे." त्यातूनच मग २०१३ मध्ये नीता यांनी पुन्हा वेगळ्या स्तरावर क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले. त्या महाराष्ट्र शालेयस्तरावर क्रिकेट निवड समितीवर नियुक्त झाल्या. स्वत:ची ऊर्जा शोधताना त्यांनी क्रिकेटसोबतच पॉवर लिफ्टिंगचाही सराव सुरू केला. ४८ वर्षांच्या नीता यांनी आयुष्याच्या खेळाला दुसरी संधी दिली. पुढच्या कालावधीमध्ये क्रिकेटसोबतच त्या पॉवर लिफ्टिंगमध्येही भविष्य घडविणार आहेत. 'क्रिकेट ते पॉवर लिफ्टिंग' हा प्रवास यशपूर्ण असेल हे नक्की. आपल्या खेळातील प्रवासाबद्दल बोलताना नीता म्हणतात की, "जे पाहिजे त्याचे मनापासून वेड लागले पाहिजे. केवळ ध्येय निश्चित करूनच चालत नाही, तर त्यासाठी कष्ट करण्याचीही तयारी हवी. मग ते क्षेत्र कोणतेही असो." तसेच महिला क्रिकेटबाबतही नीता फार आशादायी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कोणताही खेळ लिंगभेद करत नाही. निसर्गाने स्त्रीलाही माणूस म्हणून क्षमता दिली आहे. ती क्षमता सिद्ध करणे माणूस म्हणून स्त्रीचे कर्तव्य आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat