उपनगरात पावसाचे थैमान; मालाड, अंधेरी, जुहू , सायनचा भाग जलमय

    दिनांक  08-Jul-2019मध्य रेल्वेमार्गावर विक्रोळी-घाटकोपर दरम्यान रुळावर पाणी


मुंबई : दोन दिवसांच्या काहीशा विश्रांतीनंतर सोमवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने सगळ्यांचीच तारांबळ उडवून दिली. सरीवर बरसणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळी ११ ते ११.४५ या दरम्यान मुंबईकरांच्या उरात धडकी भरण्यासारखे थैमान घातले. मात्र त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान वेधशाळेने येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

 

सोमवार १ जुलैच्या रात्रीपासून गुरुवार-शुक्रवारपर्यंत मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळला होता. या पावसात मालाड येथे जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून २७ मृत्युमुखी पडले होते, तर इतर घटनांतही चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवार-रविवारी अधूनमधून सरीवर असणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र सोमवारी पावसाने पुन्हा जोर धरला. सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मनमानेल अशी पावसाने झोड उठवली. जणू पावसाने थैमानच घातले होते. हा पाऊस असाच काही काळ कोसळला तर मंगळवार (२ जुलै) प्रमाणे मुंबई काही काळ ठप्प होते की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र पावणेबारानंतर पावसाचा जोर काहीसा नरमला.

 

सकाळी ८.३० ते ११.३० या दरम्यान कुलाबा येथे १२.२ मिमी, तर सांताक्रूझ येथे १०८.२ मिमी. पाऊस कोसळला. त्यामुळे उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. अंधेरी येथे सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. अंधेरी मालपा डोंगरी येथे एमआयडीसी परिसरात पेपर बॉक्स इंडस्ट्रियल इस्टेटची भिंत कोसळली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातात योगेश पंड्या नावाची व्यक्ती जखमी झाली असून त्यांना ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच पावसात लालबाग उड्डाणपुलावर डिव्हायडरवर डम्पर चढल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसामुळे वाहतूक कासवाच्या गतीने चालली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गांधी मार्केट किंग्ज सर्कल, मिलन सबवे, प्रतीक्षा नगर, नॅशनल कॉलेज आदी ठिकाणी पाणी साचल्याने बसचे ३७ मार्ग बदलण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat