मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा राजीनामा

    दिनांक  07-Jul-2019


 


मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात राजीनामा सत्र कायम आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा काँग्रेसमध्ये नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते आता दिल्लीला जाणार आहेत.

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय निरुपम यांच्या नेतृत्तवात मुंबई कॉंग्रेसमध्ये असलेली धूसफूस चव्हाट्य़ावर आली होती. मात्र, त्यानंतरही निरुपम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरायचे होते. अखेर उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या जागी देवरा मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष बनले. मात्र, आता त्यांनीही राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिल्याने मुंबई कॉंग्रेसला नवा चेहेरा कोण, असा प्रश्न पक्षासमोर आहे.

 

पदाचा राजीनामा देताना त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्ताव पक्षासमोर मांडला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असल्याचे देवरा यांनी राजीनामा देताना मान्य केले आहे.

 

देवरा यांच्या कार्यालयातून एक निवेदन जाहीर करण्यात आले असून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे ही माहीती दिल्याचे म्हटले आहे. यासह मी पक्षाशी एकनिष्ठ असून सामूहीक जबाबदारी म्हणूनही हे पाऊल उचलल्याचेही यात सांगण्यात आले आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat