वैद्यकीय क्षेत्रातील वाढती व्यावसायिकता चिंताजनक प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचे प्रतिपादन

    दिनांक  07-Jul-2019


 


मुंबई : "आज वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकतेचे वाढते प्रमाण चिंताजनक असून त्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी रविवारी केले. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त, नाना पालकर स्मृती समितीने आयोजित केलेला डॉक्टरांचा सन्मान सोहळा रविवारी दादरमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. अनिक्षसद्ध देशपांडे अध्यक्षस्थानी होते.

 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, ”वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात जेवढी मागणी आहे तेवढ्या जागा नाहीत. सीट मिळाली तर रोजगार नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढते आहे. समाजातील सर्व आर्थिक स्तरांत वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. अशा वंचितांसाठी नाना पालकर स्मृती समितीसारख्या संस्था घेत असलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. संपूर्ण समाजाचे आरोग्य चांगले व्हायला हवे असेल तर तीन गोष्टींची आवश्यकता आहे. रक्ताच्या पिशव्यांची किंमत कमी व्हावी, लोकसहभागातून डायलेसिस मोफत व्हावे आणि स्टेंटच्या किमती आणखी कमी व्हाव्यात. समाजाच्या मुख्य समस्यांचे निराकरण झाले तर, जीवन प्रदान करणे सोपे होईल, ” असेही ते म्हणाले.

 

बंद झालेले आर. एम. पी. सारखे वैद्यकीय अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने या कार्यक्रमात अ‍ॅक्टरेक टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. सुदीप गुप्ता, नागालँडसारख्या दुर्गम भागात जाऊन वैद्यकीय शिबिरे घेणार्‍या डॉ. सुपर्णा निरगुडकर आणि सोहम ट्रस्टचे अध्यक्ष, भिक्षेकर्‍यांचे डॉक्टर म्हणून परिचित असणारे डॉ. अभिजीत सोनावणे यांचा 'राष्ट्रीय डॉक्टर दिवसा’च्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat