तेलंगण, आंध्र, केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा : अमित शाह

    दिनांक  07-Jul-2019


हैदराबाद : भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचा सध्या देशभरात दबदबा पाहायला मिळत असून रविवारी गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगण, आंध्र आणि केरळ या राज्यांना भाजपचा बालेकिल्ला बनविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

 

हैदराबाद येथे रविवारी भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांना शाह यांनी संबोधित केले. ते म्हणाले, ”तेलंगणमध्ये यावेळी १९ टक्के मते आपल्याला मिळाली आहेत. पण पुढच्या निवडणुकांमध्ये मात्र ५० टक्के मते भाजपच्या पारड्यात पडायला हवी.

 

तुम्हाला हे जमत नसेल तर मी प्रत्येक जिल्ह्यात, गावोगावी जाऊन पक्षबांधणी करीन. तेलंगण असो, आंध्र प्रदेश किंवा केरळ! ही राज्ये भाजपचा बालेकिल्ला व्हायला हवी. या राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळायला हवं. तेव्हा वेगाने पक्षबांधणी करा,” अशी सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना केली.”

 

पक्ष हे सत्ताप्राप्तीचे नव्हे, तर राष्ट्रकार्याचे माध्यम असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी वाराणसीत कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर रविवारी गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दक्षिणेकडील राज्यांना भाजपचा बालेकिल्ला बनविण्याचा कानमंत्र दिला.

 

जलसंधारण आणि वृक्षारोपण करण्याच्या सूचना

भाजप पराभवामुळे खचणारा पक्ष नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अनेक पक्ष पराभवामुळे खचतात. त्या पक्षांचे शेकडो तुकडे होतात. पण भाजप काही असा पक्ष नाही. जाती आणि कुटुंबाच्या आधारावर भाजप उभा नाही, म्हणून भाजप कधीच खचून जाणार नाही.” यावेळी पक्षबांधणीसोबत जलसंधारण आणि वृक्षारोपण करण्याची सूचनाही अमित शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat