मध्य रेल्वेची डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत, १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु

06 Jul 2019 13:13:26

 

 
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत होऊन १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. मुलुंड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या पडल्या. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन दिशेची म्हणजेच सीएसएमटीवरून कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. झाडाच्या फांद्या हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे.
 

शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा झाडाच्या फांद्या ओव्हरहेड वायरवर पडल्या त्यावेळी लोकल स्थानकात उभी होती. ओव्हरहेड वायर तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे धीम्या मार्गावर झालेल्या या घटनेमुळे लोकल्स जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. डाऊन दिशेच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला असून त्याचा परिणाम काही वेळात अप दिशेच्या लोकल्सवरही झाला. झाडाच्या फांद्या हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली असली तरी रेल्वे सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे आधीच पावसाचा जोर वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. त्यात आता रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे प्रवशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
Powered By Sangraha 9.0