'मालाड'च्या भिंतीचे बांधकाम काळ्या यादीतील ठेकेदाराकडून

    दिनांक  05-Jul-2019 


विरोधी पक्षांतर्फे रवी राजा यांनी केला सत्ताधाऱ्यांवर आरोप

 

मुंबई : सत्तावीस बळी घेणाऱ्या आणि सुमारे १०० जणांना जखमी करणाऱ्या मालाड जलाशयाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम काळ्या यादीतील ठेकेदाराकडून करण्यात आले होते, असा आरोप स्थायी समितीत विरोधी पक्षांतर्फे रवी राजा यांनी केला. विरोधकांच्या या आरोपाला प्रशासनाकडून कोणतेही ठाम उत्तर देण्यात आले नाही.
 

मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री ही भिंत कोसळल्याने लगत असलेल्या झोपड्यांमधील २७ जण दगावले. त्यामध्ये १० बालकांचा समावेश आहे. या भिंतीचा प्रस्ताव २०१५ मध्ये स्टँडिंग समितीसमोर आला होता. डिसेंबर २०१५ मध्ये या भिंतीचा कार्यादेश निघाला आणि २०१७ मध्ये काम पूर्ण झाले. या भिंतीचा हमी कालावधी तीन वर्षांचा असताना दीड वर्षातच ही भिंत कोसळली. या भिंतीसाठी २१ कोटी रुपये खर्च आला होता आणि ओंकार इंजिनिअर्सने ही भिंत बांधली होती.

 

मालाड जलाशयाच्या या भिंतीचा कार्यादेश निघण्याच्या वेळेला २०१६ मध्ये १० ठेकेदार काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यामध्ये ओंकार इंजिनीअर्सचे नाव होते. मात्र मालाड जलाशयाच्या संरक्षक भिंतीचे काम ओंकारकडून जाऊ नये, म्हणून हा अहवाल दडपून ठेवण्यात आला, असा आरोप रवी राजा यांनी केला. रवी राजा पुढे म्हणाले की, काँक्रीटची असणारी ही भिंत कमकुवत होती. तिचा पाया भक्कम नव्हता. त्यामुळे त्यावेळच्या कन्सल्टंटवरही कारवाई झाली पाहिजे. शिवाय यात दोषी असणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली.

 

अहवाल पुढे ढकलणाऱ्यांवर कारवाई करा

 
मालाड जलायशाची संरक्षक भिंंत बांधणारा ओंकार इंजिनीअर्स काळ्या यादीत असणारा अहवाल कोणी दडपला असेल किंवा पुढे ढकलला असेल, तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे अभिजीत सामंत यांनी स्थायी समितीत केली. यावेळी सामंत यांनी केलेल्या प्रश्नांच्या भडिमाराला प्रशासन योग्य उत्तर देऊ शकले नाही. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर अभिजीत सामंत यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की या भिंतीला ठेवण्यात आलेले होल बंद करण्यात आल्याने पाण्याच्या दाबाने भिंत पडली असेल तर प्रशासनातर्फे ते होल मोकळे का करण्यात आले नाहीत?
 
प्रशासनातर्फे २०११ च्या झोपड्या अधिकृत म्हणून मान्यता देण्यात येणार असेल तर मालाडच्या अपघातग्रस्त झोपड्यांना संरक्षण का नाही? हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल ४८ तासात तयार होतो, मग चार दिवस पूर्ण होऊनही मालाडच्या त्या भिंतीप्रकरणी अहवाल तयार करण्यास उशीर का मालाड जलाशयाच्या संरक्षक भिंतीलगतच्या झोपड्या अनधिकृत ठरविण्यात येत असतील तर झोपड्या बांधल्या त्या काळातल्या सहायक आयुक्तांना निलंबित करणार का, असे प्रश्न अभिजीत सामंत यांनी उपस्थित केले. मात्र आयुक्त या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकले नाही. 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat