नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प !

    दिनांक  05-Jul-2019


 

 

महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांनी केले 'बजेट'चे स्वागत

 

मुंबई : यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या अर्थसंकल्पातून सादर झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प सादर केल्याबाबत त्यांनी प्रधानमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन करतानाच आभारही मानले आहेत.

 
 

"सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास" अशा आशयाचे ट्विट करत भाजपायुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले. नवभारताचा हा अर्थसंकल्प भारताला जागतिक महाशक्ती बनविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणारा असल्याच्या महाजन म्हणाल्या.


शेतकरी, महिला आणि गाव- शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रस्थानी ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था जी २०१३-१४ ला ११ व्या स्थानावर होती ती केवळ पाच वर्षात सहाव्या स्थानावर पोहोचली. हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील केंद्र सरकारचे ठळक यश आहे. आर्थिक प्रगतीचा हा वेग पाहता येत्‍या काळात ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्‍य निश्‍चितपणे पूर्ण होईल यात मुळीच दुमत नसल्याचे ते म्हणाले.

 
 

गाव, गरीब आणि शेतकरीयांच्या सक्षमीकरणावर भर देणारा २०१९ चा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ, सबका विकासहे ध्येय साकार होणारच याची साक्ष पटवून देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन विनोद तावडे यांनी केले. विकासाची नवी वाट चोखाळणारा हा अर्थसंकल्प राष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजाविणारा या दशकातील महत्त्वाचा अर्थसंकल्प ठरणार असल्याचे ते म्हणाले.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat