आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरु राहणार...

    दिनांक  04-Jul-2019


 

 
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरात येत आहेत. प्रत्येक भाविकाला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे विनाविलंब दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने आज गुरुवार पासून देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले केले.
 

विठुरायाचे नवरात्र सुरू होत असल्याने देवाच्या विश्रांतीचा चांदीचा पलंग या नवरात्री काळात काढण्याची परंपरा असल्याने विधिवत पूजा करून हे नवरात्र बसविण्यात आले. आज सकाळी देवाच्या पूजेनंतर देवाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असून आता २४ तास दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये, यासाठी ही व्यवस्था करायची परंपरा आहे. 

 
सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे.
 

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात हजारो भाविक येत असतात. यावेळी मोठी गर्दी होऊन प्रत्येकाला पदस्पर्श दर्शन घेता येत नाही. त्यामुळे मंदिर समितीने प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे यासाठी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 4 ते 22 जुलै दरम्यान विठ्ठल मंदिर चोविस तास तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे. आषाढी यात्रा काळात देवाचे दर्शन घेण्यास १८ ते २० तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी येथे येत असून सध्या ८ ते १० तासात देवाचे दर्शन मिळत आहे. आता आजपासून २४ तास दर्शन व्यवस्था सुरू झाल्याने हाच अवधी कमी होऊ शकणार आहे.

 

असे असतील विठुरायाचे नित्यक्रम

पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल . यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे . याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे .

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat