तिवरे धरणफुटी : ३० किमीवर दूरवर सापडला मृतदेह!

    दिनांक  04-Jul-2019


 
 

चिपळूण : तिवरे धरणफुटी दूर्घटनेत वाहून गेलेल्यांपैकी ऋतुजा चव्हाण या महिलेचा मृतदेह तिवरे गावापासून तब्बल तीस किमी लांब असलेल्या चिपळूण शहरापाशी सापडला. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराजवळ वाशिष्ठी नदीवरील फरशी पुलाखाली हा मृतदेह सापडला आहे. वशिष्टी नदीच्या पात्रात हा मृतदेह सापडल्याने उर्वरित बेपत्ता जणांचा शोध या भागातही घेण्यात येत आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात तिवरे येथे झालेल्या धरणफुटीनंतर वाहून गेलेल्या २४ नागरिकांपैकी आतापर्यंत १८ मृतदेह हाती लागले असून पाचजण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचे शोधकार्य प्रशासनाकडून अद्यापही सुरूच आहे. गुरूवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार, तिवरे गावात धरणफुटीत वाहून गेलेल्या २४ पैकी १८ मृतदेह शोधण्यात आले होते तर पाचजण अद्यापही बेपत्ता होते. तसेच, बाळकृष्ण चव्हाण हे १८ तासांनंतर आश्चर्यकारकरित्या जिवंत आढळले होते. बुधवारनंतर शुक्रवारीदेखील येथे शोधकार्य सुरूच होते.

 

मंगळवारी रात्री तिवरे येथील लघु पाटबंधारे विभागाचे धरण फुटले आणि लगतच्या भेंडेवाडी भागातील १३ घरांचे प्रचंड नुकसान झाले, तसेच एवढ्या प्रचंड पाण्याच्या वेगवान लोंढ्यात येथील २४ जण वाहून गेले. यानंतर बुधवारी व गुरूवारी युद्धपातळीवर करण्यात आलेल्या शोधकार्यानंतर १८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत व त्यापैकी १७ जणांची ओळख पटली आहे. अद्यापही पाचजण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहे.

 

दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर तिवरे गाव व आजूबाजूच्या गावांवर शोककळा पसरली असून या शोकाकुल अवस्थेतही स्थानिक ग्रामस्थ एनडीआरएफ पथक, पोलीस, विविध सामाजिक संस्था आदींच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat